संगीतकला हा अथांग महासागर आहे. संगीतातील नाना तऱ्हा, तसंच त्याच्याशी संबंधित अनवट, अपरिचित गोष्टींबद्दल गप्पागोष्टींच्या रूपात अवगत करणारं पाक्षिक सदर..
१९३१ साली भारतीय चित्रपट बोलू लागला. भारतीयांना संगीताची आणि संगीत नाटकांची आवड असल्यामुळे गाणी हा चित्रपटांचाही अविभाज्य घटक बनला. साधारण सुरुवातीचे एक दशक संपूर्णपणे भारतीय सुरावट आणि वाद्यमेळ असलेल्या गाण्यांचा हिंदी, मराठी आणि बंगाली चित्रपटांमध्ये अंतर्भाव असायचा. ४० व्या दशकात पाश्चात्त्य वाद्यांनी हिंदी-मराठी चित्रपट संगीतसृष्टीत शिरकाव केला. पियानो, व्हायोलिन, चेलो, डबल बेस, व्हायब्रोफोन, गिटार, ट्रंपेट अशी वाद्ये आपले संगीतकार वापरू लागले. अनिल बिस्वास, नौशाद, हुस्नलाल भगतराम, सी. रामचंद्र, एन. दत्ता यांसारख्या संगीतकारांनी या वाद्यांचा आपल्या गाण्यांमध्ये समावेश केला. पण ही वाद्ये वाजवणाऱ्या वादकांना भारतीय लिपी (सरगम) वाचता येत नसे. ते फक्त पाश्चात्त्य लिपी (स्टाफ नोटेशन) वाचत असत. संगीतकारांना हे नोटेशन लिहिणाऱ्या माणसांची गरज भासू लागली. गाणे चालू असताना गायकाच्या मागे ग्रुप व्हायोलिन्स वाजत असतील तर ती परफेक्ट हार्मनीमध्ये वाजावीत याकरिता पाश्चात्त्य संगीताचा सखोल अभ्यास असावा लागे.
फ्रॅन्क फर्नाड, चिक चॉकलेट, ख्रिस पेरी, सबॅस्टियन डिसुझा, जॉनी गोम्स, अ‍ॅन्थनी गोन्साल्विस यांसारखी पाश्चात्त्य संगीत अवगत असणारी गोयंकार मंडळी मुंबईत येऊन दाखल झाली. हे पाश्चात्त्य संगीतातले दिग्गज चित्रपटातील गाण्यांसाठी नोटेशन लिहू लागले, वाद्यवृंदाचे संयोजन करू लागले. हळूहळू ही मंडळी नुसती स्वरलिपी लिहिणारे लिपिक राहिले नाहीत, तर दोन अंतऱ्यांच्या मधले पीसेसही कम्पोज करू लागली. संगीतकारांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागली. माझा मित्र तौफिक कुरेशी याच्या मते, भारतीय आणि पाश्चात्त्य संगीताचे फ्यूजन खऱ्या अर्थाने याच जमान्यात सुरू झाले! रॉक, जॅझ, ब्लूज अवगत असलेले हे कलाकार हाताशी असल्यामुळे संगीतकारांनीही नवनवीन स्टाईल्स आजमावायला सुरुवात केली.
जॉनी गोम्ससाहेबांनी अरेंज केलेलं ‘इना मिना डिका’ हे सी. रामचंद्र यांचं १९५७ सालचं गाणं आजही आपल्या ओठांवर आहे. (याच गोम्ससाहेबांनी पुढे दत्ता डावजेकरांचं ‘पाठलाग’ चित्रपटातील ‘या डोळ्यांची दोन पाखरे’ या गाण्याचं म्युटेड ट्रंपेटसारखं वेगळंच वाद्य वापरून वैशिष्टय़पूर्ण संगीत संयोजन केलं.) संपूर्ण भारतीय सुरावट असलेल्या गाण्यांमध्येही पाश्चात्त्य कोरस (कॉइर), स्ट्रिंग आणि ब्रास सेक्शनचा सढळ वापर होऊ लागला. सबॅस्टियन डिसुझा हे एक प्रतिभावान म्युझिशियन होते. त्यांनी अरेंज केलेलं पहिलं गाणं ओ. पी. नय्यर यांचं ‘प्रीतम आन मिलो’ (१९५५)! सबॅस्टियनसाहेबांनी नय्यरसाहेबांच्या अनेक गाण्यांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीतातील सारंगी आणि पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतातील चेलो या वाद्यांचं कॉम्बिनेशन वापरून कमाल केली. पुढे त्यांनी शंकर-जयकिशन यांच्यासाठी (१९५५ ते १९७५) संगीत संयोजक म्हणून काम केलं. शंकर-जयकिशन यांच्या अनेक गाण्यांमधल्या बहारदार व्हायोलिन्सच्या पीसेसचे जनक डिसुझासाहेब होत! अशा उत्तम मिलाफाची अनेक उदाहरणे आहेत. हे फ्यूजन नुसतेच लोकप्रिय झाले नाही, तर बहुतांश गाण्यांचा अविभाज्य घटक बनले. अर्थात कुठलेही गाणे संगीतकार आणि अरेंजरचे उत्तम टय़ुनिंग असल्याशिवाय जमून येत नाही.
लक्ष्मीकांत-प्यारेलाल ही अशीच एक जोडी. १९६३ सालचा ‘पारसमणी’ हा या जोडीचा पहिला स्वतंत्र चित्रपट. त्याआधी दहा वर्षे दोघांनीही कल्याणजी-आनंदजी यांच्याकडे साहाय्यक म्हणून काम केले. अनेक अरेंजर्सना चित्रपटात त्यांचे ‘साहाय्यक’ असे टायटल कमीपणाचे वाटत असे. म्हणूनच कदाचित लक्ष्मीकांत कुडाळकर आणि प्यारेलाल शर्मा या दोघांनी जोडीनेच संगीत द्यायचे ठरवले असावे. अनेक वर्षे साहाय्यक म्हणून काम केलेल्या लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या नावांचा फॉन्ट साइझ १६ चा एकदम ४४ झाला! पुढे जाऊन ‘बिग साऊंड’ ही कन्सेप्ट लक्ष्मी-प्यारे या जोडीने हिंदी चित्रपट संगीतात आणली. एकाच गाण्यात १०० ते १२० वादकांसाठी प्यारेभाई म्युझिक स्कोअर लिहीत असत. अ‍ॅन्थनी गोन्साल्विस हे प्यारेलाल शर्मा आणि पंचमदा यांचे संगीत संयोजनातले गुरू. (प्यारेभाईंनी ‘अमर अकबर अ‍ॅन्थनी’ या चित्रपटात ‘माय नेम इज अ‍ॅन्थनी गोन्साल्विस’ हे गाणे खास आपल्या गुरूला सलामी देण्यासाठी केले होते!)
गाण्यामध्ये वाद्यमेळ काय असावा, हे संगीतकार आणि अरेंजर दोघे मिळून ठरवतात. कधी कधी संगीतकाराच्या डोक्यात इंटरल्युड म्युझिक असतंही; पण बहुसंख्य वेळा ते अरेंजरच कम्पोज करत असतो. म्हणूनच अरेंजर्सना विविध वाद्यांच्या रेंजची किंवा आवाक्याची, ते वाद्य कुठल्या पद्धतीनं वाजतं, त्याच्या मर्यादा काय, याची पूर्ण माहिती असावी लागते. शिवाय वेगवेगळे प्रयोग करून बघण्याची कल्पकताही त्याच्यापाशी असावी लागते. असाच एक कल्पक गायक/ वादक/ संगीत संयोजक/ संगीतकार म्हणजे आर. डी. बर्मन!
राहुल देव बर्मन आणि त्यांच्या मातोश्री मीरा देव बर्मन यांनी सचिन देव बर्मन यांना अनेक चित्रपटांत संगीत साहाय्य केले. ‘ज्वेलथीफ’मधील ‘होठों में ऐसी बात’ हे एस. डी. बर्मन यांचं सदाबहार गाणं. (१९६७ साली ध्वनिमुद्रित झालेलं हे गाणं आजही लायटिंगच्या गणपतींसमोर वाजल्याशिवाय लायटिंग पाहिल्याचं समाधान मिळत नाही!) ‘होठों में ऐसी बात’ची चाल तर जबरदस्त आहेच; पण त्याची अरेंजमेंट नवोदित संगीतकारांसाठी एक धडाच आहे. तबला तरंग, डुग्गी तरंग, घुंगरू, डफ, ढोल, ढोलक, तबला, खोळ, चंडा यासारखी विविध चर्मवाद्ये आणि व्हायोलिन्स, फ्लूट्स, क्लॅरिनेट्स, कोरस यासारखा भव्य वाद्यसमूह घेऊन आठ मिनिटांचं हे अजरामर गाणं अरेंज केलं आहे आर. डी. बर्मन, मारुतीराव कीर, बासू चक्रवर्ती आणि मनोहारी सिंग यांनी. (पुढे उर्वरित तिघांनी आजन्म आर. डीं.चे अरेंजर्स म्हणून काम पाहिलं.)
मराठी चित्रपट व सुगम संगीतातही अरेंजमेंटच्या विविध कल्पना संगीतकार आजमावायला लागले. अर्थात सगळ्याच गाण्यांना पाश्चात्त्य सुरांचं किंवा शंभर वादकांनी वाजवलेल्या संगीताचं कोंदण असायचंच असं नाही. अगदी मोजक्या वाद्यांमधली, आपल्या मातीतली मराठमोळी गाणीही भरपूर होत असत. वसंत प्रभू, वसंत पवार, वसंत देसाई, राम कदम, सुधीर फडके, दत्ता डावजेकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर या प्रतिभावान संगीतकारांनी अत्यंत अवीट गोडीची गाणी साध्या, सोप्या वाद्यमेळ्यात श्रोत्यांसमोर ठेवली आणि ती कमालीची प्रभावी ठरली.
त्या काळातल्या आघाडीच्या मराठी संगीत संयोजकांपैकी एक म्हणजे शामराव कांबळे. शामरावांनी सर्वाधिक काम बाबूजींबरोबर केलं. शामराव स्वत: उत्तम हार्मोनियम आणि व्हायब्रोफोनवादक होते. ‘बाई मी विकत घेतला शाम’मध्ये त्यांची बोटे हार्मोनियमवरून अशी काही फिरली आहेत, की क्या बात है! आणि हार्मोनियमचा अत्यंत योग्य आणि नेमका वापर गाण्यामध्ये केला गेला आहे. हेही भान राखणं अवघडच असतं. कारण सोपी चाल किंवा अरेंजमेंट करणं महाकर्मकठीण असतं. प्रतिभावंतांनाच ते जमू शकतं. संगीतकार अशोक पत्की स्वत: उत्तम संगीत संयोजक आहेत आणि शामरावांना ते आपले गुरू मानतात.
संगीत संयोजकाला भारतीय आणि पाश्चात्त्य- दोन्ही प्रकारच्या संगीताची जाण असेल तर तो अरेंजर म्हणून सर्वोत्तम काम करू शकतो यात शंकाच नाही. या दोन्ही प्रकारांत पारंगत असलेले एक संगीतकार/ संगीत संयोजक- ज्यांनी त्यांच्या परिसस्पर्शाने अनेकविध प्रकारच्या हिंदी-मराठी गाण्यांचं सोनं केलं आहे, ‘तेरे मेरे मीलन की ये रैना’ (अभिमान), ‘अरे दीवानों मुझे पहचानो’ (डॉन), ‘पहला नशा पहला खुमार’ (जो जिता वोही सिकंदर), ‘असा बेभान हा वारा’, ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे’, ‘भेटी लागी जीवा’ अशांसारख्या अनेक वैविध्यपूर्ण अजरामर गाण्यांचे ते संगीत संयोजक होते- ‘‘संगीत संयोजक इंटीरिअर डेकोरेटरसारखा असतो. संगीतकार बंगला बांधतो; पण तो सजवायचं काम अरेंजरचं असतं,’’असं ज्यांचं प्रांजळ मत होतं ते, सहा दशके हिंदी-मराठी संगीतसृष्टी गाजविलेले संगीत संयोजक- अनिल मोहिले..!
rahul@rahulranade.com

Story img Loader