नेमाडेंचा देशीवाद हा डाव्या, उजव्या अशा चौकटीत बसवता येत नाही हा अनेकांच्या त्रासाचा भाग आहे. नेमाडे नेमके कोणाचे हे ठरवता येत नसल्याने त्यांचे काय करायचे हा अनेकांसाठी अडचणीचा मुद्दा आहे. ते समजून घ्यायचे तर आधीचे वैचारिक पट्टे उतरवावे लागतात. भीती त्याची आहे. दहशत त्याची वाटते. नेमाडे दहशतवादी ठरतात ते त्यातून.
रा. भालचंद्र नेमाडे, कादंबरीकार, समीक्षक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते. देशीवाद ही त्यांची देणगी. मध्यंतरी ते म्हणाले, या सगळ्या इंग्रजी शाळा बंद केल्या पाहिजेत. लोक त्यावर खो खो हसले. मग ते म्हणाले, म्हणजे पुन:पुन्हा ते हे म्हणतच होते, की अ. भा. साहित्य संमेलन हा रिकामटेकडय़ांचा उद्योग आहे. तर संमेलनप्रेमी उद्योगी लोक चिडून हसले. मग ते म्हणाले, जातिव्यवस्था हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. तर हे अतिशयच भयंकर असे समजून जातिमुक्त झालेली मने पेटून हसली. मग नेमाडे म्हणाले, हे मराठी शुद्धलेखनातले ऱ्हस्व-दीर्घ काढून टाका. त्यांचा हा सल्ला ऐकून तर शुद्ध मराठी लोक तर पोट धरून हसले आणि मग सगळे मिळूनच वृत्तपत्रीय प्रतिक्रिया, समाजमाध्यमे, झालेच तर वृत्तवाहिन्यांवरील १० सेकंदांचा बाइट अशा माध्यमांतून हेटाळू लागले की, हा म्हातारबाबा आता चळला असून, प्रसिद्धीसाठी तो काहीही बोलत असतो. त्यास मनावर घेऊ नये. असे सर्व चालले असताना नेमाडे यांनी गप्प बसावे, तर त्यांनी महाराष्ट्र भूषणच्या वादात उडी घेतली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निष्ठेविषयी शंका नाही, परंतु त्यांचे शिवरायांविषयीचे चित्रण इतिहासाला धरून नाही. तेव्हा त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊ नये. असे मत मांडणे हे म्हणजे अतिच झाले. आता कोणी तरी हे सांगायलाच हवे होते की, नेमाडे हे भयंकरच साहित्यिक दहशतवादी आहेत. ते काम कोण करणार? वाचकांची पत्रे, इंटरनेटवरील ब्लॉग, फेसबुक यांवर लिहिणारी मंडळी तयारच होती, परंतु त्यासाठी माणूस तोलामोलाचा, साहित्यिक शहाण्णव वगरे मोठय़ा कुळाचा पाहिजे. तेव्हा रा. विश्वास पाटील हे थोर कादंबरीकार व शासकीय सेवक पुढे सरसावले. त्यांनी स्पष्टच सांगून टाकले की, होय. हा पुंड म्हणजे साहित्यप्रांतीचा दहशतवादीच. नेमाडेंनी एकदा पंजाबच्या खलिस्तानवादी तरुणांबद्दल सहानुभूती दर्शविली होती. तेव्हा असा हा धर्मनिरपेक्षता, जमातवाद, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रवाद या संकल्पना संकुचित म्हणून झुरळासारख्या झटकून टाकणारा देशीवादी माणूस दहशतवादी असणारच होता. त्यावर आता शासनाच्या वतीनेच शिक्कामोर्तब झाले ते बरेच झाले. यातून आणखी एक झाले की, नेमाडेंचे नेमके काय करायचे, हा जो प्रश्न गेली किमान पाच-सहा दशके या विचारवंत महाराष्ट्राला पडला होता, तो निकाली निघाला. यामुळे नेमाडे नक्कीच गप्प बसतील. खरे तर साहित्यिक, सांस्कृतिक आणीबाणी नसलेल्या आजच्या काळात नेमाडे यांच्यासारख्यांनी गप्प बसावे हेच सामाजिक प्रगतीसाठी पोषक आहे.
नेमाडे यांची चूक आहे. ती ही की, अलीकडे ते अनेकदा बोलताना दिसतात. आता ते काही पट्टीचे वक्ते नाहीत. सूत्रबद्ध, जनप्रिय, सुभाषितांची पखरण असलेले बोलावे व ख्यातीस प्राप्त व्हावे हे त्यांच्या ऐपतीबाहेरचे काम. बोलतात परखड. त्यातही अनेकदा विचारांची गुंतवळ. त्यातून एखादे वाक्य बाहेर येते, की उदाहरणार्थ मी कधी पारितोषिकांच्या मागे धावलो नाही. आता अशी जी वाक्ये असतात ती चमकदार असतात. आशयगर्भ असतातच, पण ती त्यांच्या संदर्भाच्या कोंदणात. ती एकेकटी उचलली, की त्यांचे मातेरे होते. म्हणजे हे ऐकले की लगेच लोक म्हणतात की, यांचा पारितोषिकांना विरोध आहे आणि तिकडे पाहावे तर हे एकापोठापाठ एक पारितोषिके घेत आहेत. तेव्हा ते भोंदू आणि अनैतिक आहेत. वस्तुत: नेमाडेंनी खूप पूर्वीपासूनच हे म्हणून ठेवलेले आहे की, पारितोषिकांचा साहित्यनिर्मितीशी थेट कोणताही संबंध नसतो, पण पारितोषिके लेखकाला फुरसत, उसंत देतात या अर्थाने ती अप्रत्यक्षपणे साहित्यनिर्मितीला पोषक ठरू शकतात. पण हे सविस्तर सांगणार कोण? मध्यंतरी ‘ हिंदू ’ प्रकाशित झाली तेव्हा नेमाडे वृत्तवाहिन्यांवरून मुलाखती देत सुटले होते. अनेकांना ते खटकले. अनेकांना वाटले की म्हणजे नेमाडे तर आता लेखकराव झाले. नेमाडे दहशतवादी आहेत याहून हा आरोप अतिशयच गंभीर. कारण त्याने नेमाडे यांच्या निष्ठांविषयीच शंका निर्माण होते. हा जो लेखकाचा लेखकराव होतो तो प्रतिष्ठा, पसा, समाजातील स्थान याच्याशी तडजोड करून बनतो. दु:ख सोसण्याच्या ताकदीवर साहित्य मोठं होतं. लेखक मोठा झाला की या दु:खापासून दूर जाण्याचा प्रयत्न सुरू करतो, त्याचं भांडवल करू लागतो. नेमाडेंचे लेखक-लेखकराव यांविषयीचे सांगणे हे असते, पण ते लक्षात घेऊन बोलण्याऐवजी जीभ उचलून टाळ्याला लावणे अधिक सोपे असते. मुद्दा असा की, नेमाडे जेव्हा सभांतून वा वाहिन्यांतील मुलाखतींमधून वगरे असे काही बोलतात तेव्हा त्यात त्यांच्या विधानांचा वैचारिक आगापिछा येतोच असे नाही. तो मांडण्याइतका अवकाश सर्वसामान्य श्रोत्यांसमोर केलेल्या भाषणांत सहसा नसतोच. तशात आपली माध्यमे. त्यांना बातमी मिळण्याशी कारण. वाद होण्याची शक्यता असलेल्या वाक्यांचा वास यावा असेच त्यांचे घ्राणेंद्रिय बनलेले असते. तेव्हा ते ही वाक्ये उचलतात, त्यांच्या ब्रेकिंग न्यूज बनवतात, वाद होतो. त्यात हे कोणी ध्यानीच घेत नाही, की नेमाडेंचे म्हणणे हे अधिक खोल आहे, आशयघन आहे आणि हे केवळ नेमाडे यांच्याबाबतच घडते असे नव्हे. ज्याला खरोखरच काही गंभीर विचार मांडायचे असतात त्या सगळ्यांच्याच बाबतीत हा धोका असतो. तो टाळण्याचा उत्तम उपाय म्हणजे लिहिणे. अर्थात त्यातूनही वाद होत नाहीत असे नाही. होतात. नेमाडे यांनी देशीवादाविषयी एवढे लिहून ठेवले आहे. धर्म, जाती, भाषा, साहित्य, संस्कृती, इतिहास याबाबतची त्यांची लिखित मते उपलब्ध आहेत. तरीही वाद होतातच, पण ते माणसाला शेऱ्या-ताशेऱ्यांत तरी गारद करीत नसतात.
असे वाद व्हावेतच. नेमाडेंचा देशीवाद म्हणजे काही अंतिम सत्य नाही, पण ते वाद तुकडा तुकडा आभाळ घेऊन त्यालाच ब्रह्मांड म्हणणारे नसावेत, ही अपेक्षा तर वावगी नाही. देशीवादाविषयी हे सातत्याने घडताना दिसते. त्याबद्दल मोठाच गोंधळ दिसतो. अनेकांचा आक्षेप तर त्यातील ‘ हिंदू ’ या शब्दालाच आहे. डाव्यांना तो धार्मिक अस्मिता जोपासणारा प्रतिक्रियावादी शक्तींच्या जवळ जाणारा दिसतो. त्याने हिंदू राष्ट्रवाद्यांनी खूश व्हावे, तर तेही चिडलेले असतात. कारण नेमाडेंचा हिंदू हा मुळात िहदुत्ववाद्यांच्या अर्थाने नसतोच. प्रतिगामी िहदुत्वाचा नायनाट केल्याशिवाय आपल्या देशाला तरी पर्याय नाही, नाही तर आपण पुन्हा त्याच गत्रेत जाऊ अशी भीती त्यांनी बोलून दाखविलेली आहे. त्यामुळे नेमाडेंचा देशीवाद हा हिंदुत्ववाद्यांचा शत्रूच राहतो. ‘ हिंदू ’ कादंबरीवरील टीकालेखांच्या चळती चाळल्या तरी हे शत्रुत्व दिसेल, पण स्वत:ची िहदू ओळख सांगताना त्याही आधी आपण वारकरी आहोत, असे सांगणारे नेमाडे दुसरीकडे सर्वधर्मसमभाव या समाजवाद्यांच्या लाडक्या तत्त्वाची पोकळ संज्ञा म्हणून संभावना करतात. कम्युनिस्टांच्या आंतरराष्ट्रीयवादाच्या विरोधात देशीवाद सांगतात. आज प्रादेशिक अस्मितेला नावे ठेवणारे काल संयुक्त महाराष्ट्र मागत होते ही विसंगती समोर आणून सरळ सरळ प्रादेशिकवादाची भलामण करतात. प्रादेशिक अस्मिता आणि देशीयता यांचे निकटचे संबंध आहेत, असे ठासून सांगतात तेव्हा समाजवाद्यांनाही झिणझिण्या येतात. श्रेणीव्यवस्थेतील उतरंड, ही उच्च-नीचता म्हणजे जातीयता किंवा वर्णव्यवस्थेत कोंबून बसवलेली जातिव्यवस्था. हे सगळे ऊध्र्वस्तर वगळून जातीकडे एक मानववंशशास्त्रीय वस्तुस्थिती म्हणून पाहिले पाहिजे, असे म्हणतात तेव्हा पुरोगाम्यांना झिणझिण्या येतात. एकंदर नेमाडेंचा देशीवाद हा डाव्या, उजव्या अशा चौकटीत बसवता येत नाही हा अनेकांच्या त्रासाचा भाग आहे. नेमाडे नेमके कोणाचे हे ठरवता येत नसल्याने त्यांचे काय करायचे हा अनेकांसाठी अडचणीचा मुद्दा आहे. ते समजून घ्यायचे तर आधीचे वैचारिक पट्टे उतरवावे लागतात. भीती त्याची आहे. दहशत त्याची वाटते. नेमाडे दहशतवादी ठरतात ते त्यातून.
आता हे सगळे समजून घेण्यापेक्षा नेमाडेंचे एकेक वाक्य घ्यावे. उदाहरणार्थ- मराठीतील ऱ्हस्व-दीर्घ काढावेत. त्यातून किती घोळ होतील हेही यास कळू नये म्हणजे काय मूर्ख म्हातारा आहे, असे म्हणून त्यावर फेसबुकमधून, ब्लॉगमधून हसावे. असे हसताना हा म्हातारा साहित्यिक आहे. भाषाशास्त्राचा अभ्यासक आहे वगरे किरकोळ गोष्टी ध्यानात घ्यायची गरज नसते, हे किती छान!
ravi.amale@expressindia.com