स्टीफन झ्वाईग या गेल्या शतकातील महत्त्वाच्या जर्मन लेखकाच्या कथा- लघुकादंबऱ्यांनी मराठीतल्या मोठय़ा लेखकांना आकर्षित केले होते. झ्वाईग यांच्या एका कथेचा अनुवाद फग्र्युसन कॉलेजमधील जर्मनचे प्राध्यापक डॉ. न. का. घारपुरे यांनी ‘आमोक- उर्फ वेडापिसा’ या नावाने केला होता. त्याची दोन वैशिष्टय़े म्हणजे- अनुवादकाने तो मूळ जर्मनमधून केला आहे. दुसरे- त्याचे प्रकाशन महाराष्ट्राबाहेरच्या धार संस्थानातील ‘तरुण साहित्यमाला’ या संस्थेने केले होते. मालेचे आश्रयदाते धार-देवासमधील तत्कालीन संस्थानिक व प्रतिष्ठित मराठीजन होते. पुस्तकाला प्रस्तावना श्री. नि. चापेकर यांनी लिहिली आहे. त्यात त्यांनी अनुवादाला तुच्छ, कमी प्रतीचे लेखणाऱ्या टीकाकारांचा समाचार घेतला आहे आणि त्याचाबरोबर मराठी/ संस्कृत वाङ्मयातील कथा/ आख्यान/ उपाख्यान व इंग्रजीतील story/ tale narrative यांमधील साम्य-भेदांचा आढावा घेतला आहे.
अमोकची कथा मानवी स्वभावाच्या विविध छटा व त्यात प्रसंगानुरूप होणारे बदल प्रामुख्याने मांडते. मुख्य व्यक्तिरेखा एका डॉक्टरची आहे. उष्ण कटिबंधातील प्रदेशात काम करताना एका युरोपिअन स्त्रीचा गर्भपात करायला तो नकार देतो. ती निराशेने अघोरी उपाय करते. मृत्युपंथाला लागल्यावर ती त्याला पुन्हा बोलावते. तो तिला वाचवू शकत नाही, कारण अतिशय अनारोग्यपूर्ण वातावरणात तिच्यावर अकुशल लोकांनी उपचार केल्यामुळे तिचा जीव धोक्यात आलेला असतो. तिच्या मृत्यूनंतर डॉक्टरची नोकरी जाते. कारण मयत स्त्रीच्या इच्छेप्रमाणे त्याने बेटावरल्या मुख्य सर्जनकडून दबाव टाकून खोटे सर्टिफिकेट मिळवलेले असते. त्यामुळे संशयातून चौकशी होते. खोटा पासपोर्ट मिळवून तो ज्या बोटीने प्रवास करतो त्याच बोटीवर त्या स्त्रीची शवपेटी असते. तिचा नवरा शवपेटी घेऊन युरोपला चाललेला असतो. ती शवपेटी मोठय़ा बोटीतून छोटय़ा होडीत उतरवत असताना अपघात होतो. शवपेटी समुद्रात बुडते ती कशामुळे, याबद्दल प्रवाद होतात. मात्र, त्याच वेळी नायकाचे प्रेत नेपल्स बंदरात सापडते. त्याचा संबंध शवपेटी प्रकरणाशी कोणीच जोडत नाही.
मूळ कथानक हे एवढेच आहे. पण त्यातील महत्त्वाच्या घटना घडताना नायकाची बदललेली मन:स्थिती कशी असते आणि स्वत:च्या मन:स्थितीचे पृथक्करण तो कसे करतो, हे पाहणे रंजक ठरते. बोटीवरचे डच वसाहतीतील युरोपिअन व स्थानिक रहिवाशी यांच्या जीवनातला फरक, युरोपिअनांची इतरांकडे बघण्याची वृत्ती याचे प्रत्ययकारी चित्रण मोजक्या शब्दांत येते. मानवी स्वभावाच्या विविध छटा व त्यातले परिवर्तन लेखक प्रभावीपणे मांडतो. मानवी मनाची परिवर्तने आणि विविध नमुने दाखवताना लेखकाने सर्व कहाणी नायकाच्या तोंडून वदवली आहे. पण कुठेही नायकाबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला नाही.
गर्भपात करून घ्यायला आलेल्या स्त्रीला नायक नकार देतो कारण तिला त्याबद्दल कुठलीच खंत वाटत नसते. तो तिचा हक्क असल्याचे ती मानत असते. त्यासाठी ती भरपूर पैसा मोजायला तयार असते. गर्भपात करणे बेकायदेशीर आहे हे माहीत असूनही ती नायकाला खरेदीची वस्तू मानते. आपल्यावर दया करा, असे तिने म्हणावे अशी डॉक्टरची इच्छा असते. कारण त्याला ‘मदत’ केल्याचे मानसिक समाधान हवे असते. ती अशा याचनेला नकार देते. तेव्हा त्याच्या वृत्ती बदलतात. तो तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करतो. ती त्याचा अधिक्षेप करून निघून जाते. तो पिसाळतो. तिचा पाठलाग करतो. पण तरीही त्याची इच्छा तिला मदत करण्याचीच असते. तिच्या नवऱ्याला तिचे रहस्य कळू नये अशी त्याची इच्छा असते. याचा उलगडा आपण कसा करायचा? नायक स्वत:ही त्या इच्छेला अविचार समजतो. त्याची मदत घ्यायला ती नकार देते तेव्हा तो स्वत:च्या बदलीची विनंती वरिष्ठांना करतो. त्याच्या मनाच्या कर्कश आणि मृदू छटा आपल्याला बुचकळ्यात टाकतात.
मूळ जर्मन भाषेतून अनुवाद करताना लेखकाने तिचे रूपांतर न करता साऱ्या घटना, प्रसंग, स्थळे, परिवेश तसेच ठेवले आहेत. क्वचित कोठे शब्दप्रयोग खटकतात. उदा. ‘थिल्लर हवा.’ संपूर्ण हकिकतीत कुठल्याही व्यक्तिरेखेचे नाव येत नाही. त्यांचे मूळ देश, त्यांची समाज-साखळीतली जागा, पोशाख आणि सुसंगत हालचाली येतात; पण नावे मात्र येत नाहीत. कथावस्तूची सार्वकालिक आणि सार्वत्रिक स्वीकार्हता त्यातून जाणवते.
स्टीफन झ्वाईग यांचा परिचय करून घेतला तर त्यांच्यानंतर मराठीत जी मनोविश्लेषणात्मक कथा अधिकाधिक दिसू लागली ती समजून घ्यायला निश्चितच मदत होईल.
german author stefan zweig Amok Short story transelation
स्टीफन झ्वाईग यांच्या Amok ‘ या लघुकादंबरीचा अनुवाद,
अनुवादक- न. का. घारपुरे. प्रकाशन- १९३६.
प्रकाशक- तरुण साहित्य माला, नवापुरा, संस्थान- धार (म. प्र.) ल्ल
vazemukund@yahoo.com
आमोक उर्फ वेडापिसा
जर्मन लेखकाच्या कथा- लघुकादंबऱ्यांनी मराठीतल्या मोठय़ा लेखकांना आकर्षित केले होते.
Written by झियाऊद्दीन सय्यद
आणखी वाचा
First published on: 13-12-2015 at 01:10 IST
मराठीतील सर्व विस्मृतीत गेलेली पुस्तके बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amok short stories by stefan zweig