आपण लिहिलेलं आपल्या मर्जीने ‘पब्लिश’ करण्याचं स्वातंत्र्य ब्लॉगवर मिळतं. लेखनाला ‘कॉपीराइट’ मिळतो. लिहिलेला मजकूर संग्रही राहतो. त्यामुळे एक प्रकारे लेखनाचा ‘टेक्नो’ ट्रेंड पाहायला मिळतोय. ब्लॉग लिहिण्याचा ‘व्यक्त होणं’ हा एकच उद्देश नसून प्रत्येक ब्लॉगच्या स्वरूपाप्रमाणे त्याचे उद्देश वेगळे ठरतात. मराठी ब्लॉग्जच्या एकूण गोतावळ्यात ललित लेख लिहिणाऱ्यांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. त्यातही अनुभवलेखन अधिक केलं जातं. एखादा वेगळा विचार किंवा वेगळी संकल्पना मांडली जाते. अनेक ब्लॉग्ज कवितांचे असतात, तर काही ललित लेख आणि कविता असे संमिश्र स्वरूपाचे असतात. तरुणाईची सध्याची लाडकी अभिनेत्री आणि ‘बालश्री’ मिळालेली कवयित्री स्पृहा जोशी ‘कानगोष्टी’ या नावाने ब्लॉग लिहिते. तिच्या ब्लॉगमध्ये कविता आणि ललित लेखांचा समावेश आहे. स्पृहाची लेखनशैली सहज-सोपी आणि आजच्या काळात रिलेट करता येण्याजोगी आहे. काही ठिकाणी तिच्या लेखनाची आध्यात्मिक बाजूही दिसते. अवधूत डोंगरे हा तरुण नवोदित लेखक ‘एक रेघ’ या नावाने ब्लॉग लिहितो. या ब्लॉगवर साहित्य, चित्रपट, पत्रकारिता, राजकारण अशा विषयांवर नेमके लिखाण आहे. त्याच्या लेखनातून विचारांमधला स्पष्टपणा जाणवतो. या ब्लॉगलाही बरंच फॅन फॉलॉइंग आहे. तंत्रज्ञानाविषयी माहिती पुरवणारा ‘मराठी टेक टीचर’ हा एक माहितीपर ब्लॉग. यात विज्ञान शाखेच्या शिक्षकांसाठी काही उपयुक्त वेबसाइट्स, माहितीधिष्टित शालेय शिक्षणातील नावीन्यता अशा अनेक विषयांवर लेखन आढळतं.
ब्लॉगिंगच्या प्रथेची सुरुवात होऊन फार काळ लोटलेला नसला तरी मध्यमवयीन पिढीनेही ‘ब्लॉग’ला आपलंसं केलेलं दिसतं. मुंबईच्या अपर्णा संखे यांचा ‘माझिया मना’ हा असाच एक ब्लॉग. अपर्णा संखे या पेशाने इंजिनीयर आहेत. त्यांच्या ब्लॉगवर खाद्यपदार्थ, पर्यटन स्थळांविषयीही काही नोंदी आढळतात. ललित लेख, पत्रलेखन आणि ‘गाणी आणि आठवणी’ असा एक फोल्डरही या ब्लॉगवर दिसतो. काही ब्लॉग्ज हे फक्त कथांना वाहिलेले दिसतात. ‘मोगरा फुलला’ हा संपूर्णपणे कथांना वाहिलेला असाच एक ब्लॉग. या ब्लॉगच्या अनुक्रमणिकेत कौटुंबिक, सामाजिक कथा, रहस्य कथा, प्रेम कथा, विनोदी कथा असे अनेक विभाग आहेत. ब्लॉगअड्डय़ावरती लोकप्रिय ब्लॉग्जच्या नोंदींमध्ये ‘माझिया मना’ आणि ‘मोगरा फुलला’ या ब्लॉग्जचा समावेश आहे. रवी आमले यांचा ऐतिहासिक कंगोरे वेगळ्या पद्धतीने समोर आणणारा ‘खट्टा मीठा’ हा एका वेगळ्याच धाटणीचा ब्लॉग. पुस्तकाप्रमाणे लेखांच्या शेवटी त्यांनी संदर्भसूची दिलेली आढळते.
ब्लॉगिंगमधलं वैविध्य आणि ब्लॉगचा दिवसेंदिवस वाढणारा वाचक आणि लेखक वर्ग पाहता आगामी काळात ‘ब्लॉग’ची एक नवा साहित्यप्रकार म्हणून गणना केली जाऊ शकते. त्यामुळे ‘माहिती तंत्रज्ञानाच्या रेटय़ात मराठीचं भवितव्य काय?’ वगैरे सतत चर्चिल्या जाणाऱ्या प्रश्नांना या मराठी ‘ब्लॉगर्स’नी चोख उत्तर दिलेलं दिसतं.
ब्लॉगर्समधलं वाचावंच असं काही :
१. अनप्लग्ड होण्याचा अधिकार – कानगोष्टी (स्पृहा जोशी)
२. नरेंद्र दाभोलकर : एक नोंद, दुसरी नोंद, तिसरी नोंद – एक रेघ (अवधूत डोंगरे)
३. टिळक- आगरकरांची वृत्तपत्रीय परंपरा : दुसरी बाजू – खट्टा मीठा (रवी आमले)
४. गाणी आणि आठवणी – माझिया मना (अपर्णा संखे)
५. गॉड ब्लेस यू – मोगरा फुलला
‘ब्लॉगर्स’ची बोलू कौतुके
आपण लिहिलेलं आपल्या मर्जीने ‘पब्लिश’ करण्याचं स्वातंत्र्य ब्लॉगवर मिळतं. लेखनाला ‘कॉपीराइट’ मिळतो. लिहिलेला मजकूर संग्रही राहतो.
आणखी वाचा
First published on: 27-02-2015 at 01:53 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Benefits of having a blog