छोटय़ा पडद्यावर एकाच वेळी एका मालिकेचं लेखन आणि दुसऱ्या मालिकेत अभिनय करणं तिला लीलया जमतं. दोन्ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असतात. त्याच वेळी ती चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेत असते आणि त्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळवते. नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही प्रकारच्या लेखनशैलीतला फरक लक्षात घेत या तिन्ही आघाडय़ांवर तिचं लेखन सुरू असतं. मधुगंधा कुलकर्णी या नव्या पिढीच्या, ताज्या दमाच्या लेखिका- अभिनेत्रीचा प्रवास गेल्या बुधवारी दादरला रंगलेल्या ‘व्हिवा लाउंज’मधून उलगडला. अरुंधती जोशी आणि रोहन टिल्लू यांनी मधुगंधाला बोलतं केलं आणि मालिकांची गणितं, चित्रपटाची भाषा, नाटकातली आव्हानं असे अनेक विषय रंगले. या गप्पांमधून टिपलेले काही बोलके क्षण.. (शब्दांकन : कोमल आचरेकर, लीना दातार)
पंढरपूर ते मुंबई व्हाया पुणे</strong>
छोटय़ा शहरांतल्या मुलांना पुण्या- मुंबईच्या मुलांइतकं एक्सपोजर मिळत नाही. पंढरपुरातही खूप पारंपरिक वातावरण होतं तेव्हा. आत्ता कुठे मनोरंजन क्षेत्राकडे बघण्याचा या लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. पण तेव्हा सिनेमा, नाटक या क्षेत्रात मुलींनी जाऊ नये, त्यांचं तिथे शोषण होईल असे समज तिकडे होते. मीदेखील अगदी अशाच साध्या, मध्यमवर्गीय घरातून आलेली आहे. अभिनयाची, मनोरंजन क्षेत्रातली अजिबात कौटुंबिक पाश्र्वभूमी नाही. खरं तर मला डॉक्टर व्हायचं होतं. अगदी काही टक्क्यांनी माझी मेडिकलची अॅडमिशन हुकली, तेव्हा मला फार वाईट वाटलं. मग बीएस्सी करतानाच माझ्या हे लक्षात आलं की यात एवढी गोडी वाटत नाही. मी चौदाव्या वर्षांपासून लिहीत होते. लेखन चालूच होतं. त्यामुळे त्याकडे कल वाढत गेला. मग पदवीनंतर मी पुण्याला येऊन एम .ए नाटय़शास्त्र करण्याचं ठरवलं. ते झाल्यावर मुंबईत आले आणि स्थिरावले.
पुणे, नाटक आणि मी
पुण्यात आल्यावर बऱ्याच गोष्टी समजल्या. तिथल्या वातावरणाने, शिक्षणाने विचारसरणीत बराच बदल घडला. आईचा कायम पाठिंबा मिळाला. आईने माझ्यात नि माझ्या भावात कधीही दुजाभाव केला नाही. सुरुवातीला मध्यमवर्गीय पालकांप्रमाणे आईचं म्हणणं होतं की, तू लेखिका हो पण नटी नको, नटय़ांचं आयुष्य फार काही चांगलं नसतं, असं तिचं मत होतं. पण आईने प्रशांत दामलेसोबतचं ‘गेला माधव कुणीकडे’ पाहिलं आणि तिने मला कधीच नाही म्हटलं नाही.
शालेय जीवनात कधीच नाटक केलं नव्हतं. पुण्याच्या ललित कला केंद्रात नाटय़शास्त्र शिकत असताना पाहिलेल्या नाटकांनी एकूणच माझ्या विचारसरणीत बदल घडवून आणला. नाटक बघायला मी तिथे शिकले, नाटक कळायला लागलं, दाद द्यायला शिकले. तरी नाटक लिहायला लागले नव्हते. त्यासाठी बराच काळ जावा लागला. मी अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली. ‘लाली लीला’ आलं, आणखीही नाटकं केली. पण आपल्या वाटेला चांगली लिहिलेली नाटकं येत नाहीत ही खंत सतत वाटायची. चांगली नाटकं लिहिलीच जात नाहीत असा दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा आपल्याला एवढं वाटतं तर आपणच लिहावं नाटक असं म्हणून ‘त्या एका वळणावर’ हे पहिलं नाटक लिहिलं. खरं तर त्याचं नाव ‘सुखी माणसाचा सदरा’ असं होतं. त्या नाटकासाठी नंतर मला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट लेखिकेचा सन्मानही मिळाला.
भाषेच्या पलीकडले..!
‘एलिझाबेथ एकादशी’ हा निर्माती आणि लेखिका म्हणून माझा पहिलाच चित्रपट. देशातल्या आणि परदेशातल्या अनेक फिल्म फेस्टिवलसाठी हा चित्रपट सिलेक्ट झाला. आम्ही तो बाहेरच्या प्रेक्षकांपर्यंत घेऊन गेलो. नुकताच ‘एलिझाबेथ एकादशी’ लॉस एंजेलिस फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला गेला. जेव्हा या चित्रपटाचा खेळ झाला तेव्हा जरा टेन्शन होतं, कारण सगळीच भारतीय माणसं नव्हती. मराठी न कळणारी अमेरिकन माणसं होती. चित्रपटातला विनोद कळण्यासाठी खरं तर त्या भाषेची ओळख, त्या कल्चरची ओळख असणं आवश्यक असतं. पण तरीही या लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चित्रपट पाहताना तिथले लोक विनोदांच्या सर्व जागांवर हसले. म्हणजे त्यांना त्यातला विनोद कळला. टाळ्यांच्या जागी टाळ्या वाजत होत्या. चित्रपट संपल्यानंतर लोक भारावून गेले होते. त्यामुळे चित्रपट समजायला भाषा हे बंधन राहत नाही, हे पुन्हा एकदा मला जवळून अनुभवायला मिळालं. अपेक्षेपेक्षा खूप जास्त प्रतिसाद अमेरिकेत मिळाला आणि तेव्हा जाणवलं की, तुमच्या चित्रपटाचं हेच वैशिष्टय़ ठरतं. भाषा, स्थळ, काळ यापलीकडे तो नेतो.
पंढरपूरकरांची वारी
वयाची १८ ते १९ वर्षे माझी पंढरपूरमध्ये गेली आहेत. माझं पदवीपर्यंतचं शिक्षण तिथेच झालं. ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटाचा माझ्या पूर्वायुष्याशी कनेक्ट निश्चित आहे. मला या विषयी कुणी विचारलं तर ऑकवर्ड होतं. पण खरंच माझं आणि माझ्या भावाचं बालपण या चित्रपटातल्या भावंडांच्या जवळ जाणारं होतं. तितकीच गरिबी मी अनुभवली आहे. लेखक जेव्हा लिहितो तेव्हा ते असं अचानक उगवत नाही, ते त्याच्या अनुभवविश्वातून आलेलं असतं. जगलेलं असतं, अनुभवलेलं असतं. याचा अर्थ असा नाही की, लेखकाने लिहिलेली कथा नेहमीच स्वत:चा अनुभव असते. लेखकाचे डोळे आणि कान सतत उघडे असतात. पण ‘एलिझाबेथ..’ची कथा माझ्या भावविश्वातून आली आहे, हे खरं. आजपर्यंत अनेक चित्रपटांतून पंढरपूरची वारी दिसली. पण ती वारकऱ्यांच्या नजरेतून पाहायला मिळाली. ‘एलिझाबेथ एकादशी’तून प्रथमच ही वारी पंढरपूरवासीयांच्या नजरेतून पाहायला मिळते.
लेखनाचं गुपित
लेखिका होण्यासाठी कुठल्याही फॉर्मल ट्रेनिंगची गरज नाही. इन्फॉर्मल ट्रेनिंग चालूच असतं. मुळात हे माहीत असायला हवं की तुम्ही लेखक आहात. तुम्ही लिहिलेलं काही दिवसांनी वाचून जर तुम्ही स्वत इंप्रेस झालात तर तुम्ही लेखक असता. माध्यमं शिकता येतात. लेखन शिकता येत नाही. तुम्ही नाटकात, बॅकस्टेजला काम करून, नाटकं वाचून नाटय़लेखन शिकू शकता. मालिकांमध्ये काम करून मालिकालेखन शिकू शकता. फक्त तुम्ही त्या त्या माध्यमात गुंतून राहणं महत्त्वाचं असतं.
प्रत्येकाची एलिझाबेथ
बालपणात प्रत्येकाची कशाशी तरी किंवा कुणाशी तरी स्ट्राँग अटॅचमेंट असतेच. एक भावनिक नातं निर्माण झालेलं असत. मग ते काहीही असू शकतं.. कुणासाठी ती आज्जी असेल, कुणी दुसरा नातेवाईक, शाळा, नदी, पर्यावरण, कधी कुत्रा असेल, गाय, म्हैस किंवा सायकल काहीही..ज्यावर पॅशनेटली प्रेम असतं. त्या पॅशनसाठी लहान मुलं कुठपर्यंत आणि कोणत्याही पातळीपर्यंत जाऊ शकतात.. ती त्यांची एलिझाबेथ असते. आम्ही ती सायकल दाखवली. एलिझाबेथ हे एक रिप्रेझेंटेटिव आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात लहानपणी सायकल आलेलीच असते. त्यामुळे चित्रपटात सायकल वापरली आहे.
दोन पातळ्यांवरचा संघर्ष
दोन प्रकारचे स्ट्रगल असतात, असं मी मानते. एक क्रिएटिव्ह स्ट्रगल आणि दुसरा प्रोफेशनल स्ट्रगल. क्रिएटिव्ह म्हणजे मला एखादी भूमिका करायची आहे किंवा लिहायचं आहे त्यासाठी स्वत:चं असं वेगळेपण किंवा इनपुट्स द्यावे लागतात. तो स्वत:शी असा संघर्ष असतो. प्रोफेशनल स्ट्रगल म्हणजे तुम्ही एक काम मिळवलंय ते काम यशस्वीपणे करणं आणि त्या कामातून दुसरं काम मिळवणं. हे दोन्ही तितकंच अवघड आहे. पण मला कधी डिप्रेशन येत नाही. मी निसर्गावर खूप विश्वास ठेवते आणि निसर्गाशी कनेक्ट होते. माझं लेखन ही निसर्गाने दिलेली देणगी आहे, असं मी मानते. मी मूर्तीतला देव मानत नाही. मी निसर्ग नावाची शक्ती खूप मानते. मला त्यातूनच प्रेरणा मिळते. मी कधीच खचत नाही.
मालिका कशी लिहिली जाते?
साधारण वर्षभराचं कथाबीज तयार असतं. त्यापुढे काय होणार याची कुणालाच कल्पना नसते. प्रेक्षकांच्या प्रतिसादावरच सगळं अवलंबून असतं. बरेच लोक ‘होणार सून..’ला आता कंटाळवाणी म्हणत असले तरी अजूनही त्या मालिकेचा टीआरपी सर्वाधिक आहे. पहिल्या वर्षीच्या विक्रमी प्रतिसादानंतर आता दुसऱ्या वर्षी ही मालिका जास्त लोक अॅप्रिशिएट करताहेत. माझी स्वत:ची भूमिका कोणतीही मालिका एका वर्षांत संपावी अशी होती. पण आता येणारा रिस्पॉन्स पाहता ती लिहीत राहावी, असं वाटतंय. कारण याचा अनेक लोकांवर प्रभाव आहे. त्यातून एखादी चांगली गोष्टदेखील आपण सांगू शकतो. जान्हवीला मुलगी होतेय असं दाखवा, असं सांगणारा एक मेल मला एका प्रेक्षक तरुणीकडून आला होता. या मुलीच्या वहिनीला दुसरी मुलगी झाल्याने सासू-सासरे नाराज होते आणि आजी-आजोबा त्या नव्या बाळाचं तोंड पाहायलाही तयार नव्हते. या आजी-आजोबांना ‘होणार सून..’ फार आवडते आणि मालिकेचा त्यांच्यावर प्रभावही आहे. म्हणून तुम्ही जान्हवीला होणाऱ्या मुलीचं सगळं कौतुक करतात, असं दाखवा. कदाचित जान्हवीच्या मुलीचं होणारं कौतुक बघून आजी-आजोबा मत बदलतील, अशी तिची आशा होती. असा रिस्पॉन्स पाहून मला मोटिव्हेशन मिळतं आणि मालिका सोडू नये, हा निर्णय कायम केला जातो.
कायम ‘गुड गर्ल’चीच गोष्ट का?
लेखक म्हणून माझी दोन नाटकं झाली आहेत आणि एक चित्रपट. या तीनही गोष्टी मला काही तरी स्ट्राँगली म्हणायचं होतं. ते सांगितल्याशिवाय राहावत नव्हतं म्हणून मी लिहिल्यात. चित्रपट- नाटकांमध्ये लेखक म्हणून केवळ तुमचा कंट्रोल असतो. मालिकेतही तुम्हाला हवं ते म्हणता येतं, पण त्यावर केवळ तुमचा कंट्रोल नसतो. इतर अनेक कंट्रोलिंग फॅक्टर असतात. आपल्याकडे नेहमी एका आदर्श मुलीची.. ‘गुड गर्ल’ची गोष्ट सांगितली जाते. तीच लोकांना आवडते. त्यापलीकडेही सामान्य माणसाचं आयुष्य असतं आणि त्याबद्दलही आपण लिहू-बोलू शकतो. पण ते प्रेक्षकांना रुचणार नाही, असा आरोप प्रेक्षकांवर केला जातो आणि पुन:पुन्हा आदर्श मुलीची गोष्ट सांगितली जाते. मला यात नेमका कुणा एकाचा दोष वाटत नाही. एकूणच लेखकांची दृष्टी, वाहिन्यांचा दृष्टिकोन, प्रेक्षकांची मानसिकता सगळ्यांनीच थोडंसं बदललं पाहिजे. मालिकांमध्ये यापेक्षा चांगले विषय नक्की येतील, अशी मला आशा आहे. आता ते प्रेक्षकांच्या रेटय़ामुळे होईल की लेखकांनी काही स्टॅण्ड घेतला तर की मालिकांच्या निर्मात्यांनी त्यावर काही वेगळा विचार केला तर ते मला माहिती नाही. पण मालिका हे माध्यमही खूप बदलू शकतं. रंजक होऊ शकतं. सगळ्यांनीच तो बदल सामावून घ्यायला पाहिजे. परदेशात वेगवेगळ्या जॉन्राच्या मालिका येतात. खूप वेगळे विषय टेलिव्हिजनवर येतात. पुन:पुन्हा आपण आपल्या समाजाच्या परिपक्वतेकडे येतो. आपला समाज अशा नवीन गोष्टींसाठी तेवढा परिपक्व झालेला आहे का? याचं उत्तर मला माहिती नाही.
सहज मिळालेलं काम
मी एमए (नाटय़शास्त्र) पूर्ण केलं तेव्हा मला नेमकं काय करावं हे माहीत नव्हतं. वर्किंग वुमन होस्टेलमध्ये राहत होते, पण कामासाठी संघर्ष न करता खूप सहजपणे मला संधी मिळाली. माझ्या मैत्रिणीला केदार शिंदेंना भेटायचं होतं तिच्यासोबत मी सुद्धा गेले होते. तिथे प्रशांत दामले बसले होते. खूप मोठे अभिनेते असल्यामुळे त्यांच्याशी कसं बोलायचं असं झालं. केदार शिंदेंनी तुला सीरिअलमध्ये नाही का काम करायचं? असं विचारलं. पण नुकतंच एम. ए. नाटय़शास्त्र केल्यामुळे मालिका वगैरे नाही करायचं, असं माझं मत होतं. नंतर मला प्रशांत दामलेंनी बोलावून घेतलं आणि ‘एका लग्नाची गोष्ट’मध्ये रिप्लेसमेंट लागणार होती तर काम करणार का म्हणून विचारलं? मी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. पण काही कारणाने ते काम करू शकले नाही. पण नंतर मी ‘गेला माधव कुणीकडे’मध्ये काम करू लागले. अरुण नलावडे, संतोष पवार यांनी काम पाहून त्यांच्या नाटकात कामं दिली मग अशी एकापाठोपाठ एक काही संघर्ष न करता मला कामं मिळत गेली.
हवीहवीशी मालिका नकोनकोशी वाटते तेव्हा..
लांबण लावलेल्या मालिका बघणं ही एक शिक्षाच असते, असं वाटत असेल तर बघू नका. तुमच्याकडे चॉइस असतो. चॅनेल बदलण्याचा, पर्याय ठरवण्याचा. माहिती- मनोरंजन दोन्ही देणारी वाहिनी अगदीच काही नाही. तर टीव्ही बंद करा. घरातल्या माणसांशी संवाद साधा. पुस्तकं वाचा. मालिकेतले प्रसंग लांबतात, तेव्हा कुठेही प्रेक्षकांच्या भावनांशी खेळण्याचा हेतू नसतो. नॉर्मली रिलेशनशिपमधला गुंतागुंतीचा प्रवास मालिकेत ठरलेला असतो. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जान्हवी प्रेग्नंट असल्याचा एक मेसेज करून ती श्री ला सहज सांगू शकते. पण सांगत नाही याचं कारण या दरम्यानच मालिकेला जास्त टीआरपी मिळतो. टीआरपी हे एकमेव कारण नाही. इतरही काही गणितं असतात. ‘होणार सून मी हय़ा घराची’ ही मालिका वाहिनीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. याचदरम्यान एखादी नवीन मालिका लॉन्च होणार असेल किंवा दुसऱ्या महत्त्वाच्या मालिकेचा महत्त्वाचा टप्पा असेल, तर इतर कुठल्याही गोष्टीशी क्लॅश होऊ न देण्याची जबाबदारी चॅनेलवर असते. आयपीएलसारखे इव्हेंट आहेत, तर त्यामध्ये टीआरपी कायम राहावा म्हणून ते प्रसंग लांबवले जातात. पण आता लवकरच जान्हवी प्रेग्नंट आहे हे श्रीला कळणार आहे.. छान पद्धतीने कळणार आहे.
हुशार दिग्दर्शक ते जोडीदार
परेशची मी अनेक नाटकं पहिली होती. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून तो मला आवडला होता. त्याच्यासोबत काम करायला मिळावं अशी इच्छा होती. मी पहिलं नाटक लिहिलं तेव्हा या हुशार माणसाचं मत घ्यावंसं वाटलं आणि त्याला फोन केला. त्यावेळी तो आमीर खानच्या कुठल्याशा प्रोजेक्टसाठी कोकण दौऱ्यावर होता. परत आल्यावर बोलू असं म्हणाला. मला तो आल्यावर आपणहून फोन करेल अशी अपेक्षा नव्हती. पण त्याचा फोन आला आणि माझं नाटक ऐकवण्यासाठी मी त्याला भेटले. मला अशी शब्द पाळणारी माणसं आवडतात. अशा माणसांबद्दल एक फ्रेंडली अप्रोच निर्माण होतो. तसाच त्याच्याविषयी वाटू लागला. आमचं काम संपलं तरी भेटीगाठी होतच राहिल्या. तेव्हा जाणवलं की, आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडतो आहोत आणि मग प्रेमात पडलेली इतर माणसं वागतात तसं आमच्याबरोबरही झालं आणि आमचं लग्न झालं. माझं पहिलं नाटक खरं तर परेशला अजिबात आवडलेलं नव्हतं. जेमतेम पाच प्रयोग होतील, असं त्याचं मत होतं. पण मी माझ्या कामावर ठाम होते.
पर्यावरण दायित्व
समाजासाठी, पर्यावरणासाठी काम करण्याकडे माझा जास्त कल आहे. झाडं तोडू नका, कागदाचा आणि लाकडाचा वापर कमी करा, अशी जागृती मला लोकांमध्ये निर्माण करायची आहे. मालिकांच्या लिखाणातून अप्रत्यक्षपणे मी ती करत असते. मला प्राण्यांसाठी अनाथालय सुरू करायचं आहे. पण, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी वेळ लागणार आहे. सध्या माझं बारीकसारीक पातळीवर सामाजिक काम सुरू आहे. गोदावरीचं प्रदूषण आणि त्यासंबंधी काही गोष्टी करण्यासाठी मी ‘गोदावरी बचाव’साठी जाणार आहे. अशी एक वेळ नक्की येईल जेव्हा मी माझी कला थोडीशी बाजूला ठेवून सामाजिक कार्यासाठी स्वत:ला पूर्णपणे वाहून घेईन. माझं नाव, पैसा आणि चेहरा याचा उपयोग मला पर्यावरणासाठी करता आला तर मी अत्यंत समाधानी असेन.
दृढ सहजीवन
तुमचं जमण्यासाठी तुम्ही सारखं असण्याची गरज नसते, असं मला वाटतं. परेशची आणि माझी लाइफस्टाइल खूप सारखी आहे. म्हणजे कपडे, कार, दागिने याची मलाही आणि त्यालाही फार आवड नाही. या गोष्टींमुळे आमचं आयुष्य खूप सोपं झालंय. कलेच्या पातळीवर आम्ही फार विरुद्ध टोकाची माणसं आहोत असंही नाही. आमची काही बाबतीतली मतं सारखी असतात. पण एखाद्या बाबतीत परेशचं मत जर वेगळं असलं तर त्यातून त्या गोष्टीकडे बघण्याचा एक वेगळा पस्र्पेक्टिव्ह मिळतो. मी खूप फोकस ठेवून माझं करिअर करू शकतं याचं श्रेय मी परेशला देते. तो मला सर्व प्रकारे मदत करतो. जबाबदाऱ्या घेतो. त्याच्या पाठिंब्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते.
रायटर्स इन डिमांड
मला लिहिता येतं यासाठी मी निसर्गाची खूप ऋणी आहे. सध्या लेखक कमी असल्यामुळे लेखकांना प्रचंड मागणी आहे आणि उत्तम पैसेही मिळतात. आज हजारोंमध्ये एक लेखक मिळतो पण एखाद्या रोलसाठी हजारो अभिनेते तयार असतात. सध्या जुनीच नाटकं नव्याने रंगभूमीवर येताहेत. तरुणांच्या सेन्सिबिलिटीचं किंवा मला जे माझं वाटेल असं नाटक लिहिलं जात नाहीये. त्यामुळे तरुणाई रंगभूमीकडे आकृष्ट होत नाही. काही वर्षांपूर्वी नाटक हे एकच माध्यम होतं. आता लेखकांना अनेक माध्यमं उपलब्ध झाल्यामुळे जिथे जास्त पैसा मिळेल तिथे जाण्याकडे लेखकांचा कल अधिक असतो. लेखक आणि सेन्सिबिलिटी कमी असल्यामुळे हे होत असावं. पण हे चित्र नक्की बदलेल.
क्रेडिट गोज टू..
मालिकालेखनात प्रवेशाचं श्रेय मी चिन्मय मांडलेकरला देते. ‘पांगिरा’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान चिन्मयनी मालिका लेखनात को-रायटर म्हणून काम करशील का विचारलं? को-रायटरच आहे. मला नाहीच सुचलं तर चिन्मय असेलच, असा विचार करून मी ते काम स्वीकारलं पण काही कारणास्तव चिन्मयला ते जमलं नाही आणि मग पहिल्या भागापासूनच मी ‘पिंजरा’ मालिका लिहायला घेतली. त्यानंतर मला या माध्यमाशी ओळख झाली, त्यातले बारकावे समजले. लोकांना काय आवडतं, स्ट्रेंथ आणि वीकनेस काय मग मी आत्मविश्वासाने ‘होणार सून मी हय़ा घरची’चं काम हाती घेतलं.
.. शेवटी हा बिझनेस आहे
मालिकानिर्मिती हा शेवटी बिझनेस आहे. प्रेक्षकांना काय आवडेल ते चाचपूनच मालिका आखली जाते. ‘वीक टू वीक’ टीआरपी येतो. त्यानुसार मालिकेमधून काही बदल केले जात असतील. ऐन वेळी अॅक्टर्स उपलब्ध नसतील तर बदल होतात. हाच पॅटर्न आहे या माध्यमाचा. सुदैवानं माझा आणि दिग्दर्शक मंदार देवस्थळी याचा चांगला रॅपो असल्यानं क्रिएटिव्ह तडजोड करण्याची वेळ माझ्यावर तरी येत नाही. मी १५ दिवसांची एपिसोड्सची बँक देते. त्यामुळे असे आयत्या वेळचे बदल होत नाहीत. मुळात मी या माध्यमासाठी लिहायला लागले तेव्हा फार भ्रामक समजुती घेऊन मी आलेली नव्हते. या माध्यमाच्या काही मर्यादा आहेत, काही स्ट्रेंथ आहेत आणि या व्यवसायाशी निगडित लोकांनी केलेला रिसर्च आहे. त्यातून काही चांगलं करण्याची धडपड आम्ही करत आहोत. सासू-सुनेचा टिपिकल छळ यापासून काही तरी वेगळं करायचं होतं नि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
कथालेखनाचा छंद
माझ्या डोक्यात निसर्गाने एक चिप टाकलीय, असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे मला लिहावंसं वाटतं, सुचतं. डोळे- कान उघडे ठेवले की आपोआप मला कॅरॅक्टर्स दिसायला लागतात आणि कथा सुचते. वयाच्या चौदाव्या वर्षांपासून लिहीत होते. वयाच्या सोळाव्या वर्षी माझी कथा सर्वोत्कृष्ट कथा म्हणून ललित नावाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. त्याचे पैसेही मिळायचे. त्यानंतर मला लेखनाचा छंद लागला. मी दर दिवाळी अंकाला पाठवायचे नि दरवेळी माझी कथा सर्वोत्कृष्ट कथा म्हणून छापून यायची. त्याचे दीडशे दोनशे रुपये मिळायचे. मी तेव्हा विशीही पार केली नव्हती आणि माझ्या कथा वाचून लोकांची पत्रं यायची. श्रीमती मधुगंधा कुलकर्णी नावाच्या कुणी पोक्त बाई आहेत, असं समजून लिहिलेली पत्रं.. मला अजूनही त्याची गंमत वाटते. पण तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं की मला हे करायला आवडतंय आणि मी लिहिलेलं लोकांनाही आवडतंय हे लक्षात आलं.
मेंदूचं डायलॉग मॅनेजमेंट
मी सध्या पॅशनेटली फक्त ‘होणार सून मी हय़ा घरची’ या मालिकेचं लेखन करतेय. ‘जुळून येती रेशीमगाठी’चं शूटिंग चालू असताना माईंशी चाललेल्या संवादात मला आई-आजींसाठी लिहिलेले संवाद आठवलेत, असं कधीही झालेलं नाही. संवादांच्या बाबतीत असा घोळ निदान माझ्याबाबतीत तरी होत नाही कारण, त्या दृष्टीने मेंदू तयार झालेला असतो. जुळून येती..च्या सेटवर शूटिंगच्या दोन शॉट्सच्या मध्ये जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी लेखन करते.
(शब्दांकन : कोमल आचरेकर, लीना दातार)- viva.loksatta@gmail.com