जून महिना संपला आणि जुलैचा मध्यान्ह उजाडला तरीही पावसाचे संकेत नाहीत. त्यामुळे शेतकरी पावसाच्या सरींची जेवढी आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे, तेवढीच प्रतीक्षा चातक या पक्ष्यालासुद्धा आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच आफ्रिका खंडातून येणाऱ्या चातकाचे थवे आकाशात घिरटय़ा घालताना दिसतात. केवळ पावसाचेच पाणी पिणारा चातक मात्र यावेळी पावसाअभावी दिसेनासा झाला आहे. त्याचवेळी पावसाची चाहूल देणारे पावश्या, वादळी पाखरू यांचीही हालचाल यावर्षी दिसेनाशी झाली आहे.
मान्सून जेथे तेथे चातकाचे स्थलांतर ठरलेले आहे. आफ्रिका खंडामधून भारताकडे मान्सूनसोबतच या पक्ष्याचे आगमन होते. चातक पक्ष्याचे आगमन झाल्याबरोबरच शेतकऱ्यांनाही मान्सूनची चाहूल लागते. मात्र, यावर्षी शेतकरी या पक्ष्याच्या पूर्वसूचनापासून वंचित झाला असून आकाशाकडे पावसासाठी मदतीची याचना करीत आहे. पावसाचे पाणी झाडावर पडल्यानंतर पानाच्या टोकाला चोच लावून हा पक्षी पाणी पितो. तसेच, ऑक्टोबरनंतर पाऊस कमी झाल्यानंतर तळयातील पानांवरील दवबिंदू टिपतो. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबरनंतर चातक पक्षाच्या स्थलांतराला सुरुवात होते. याच चातक पक्ष्याला पावसाळी पाहुणा म्हणून संपूर्ण राज्यात तसेच, मध्य भारतात ओळखले जाते. हा पक्षी स्वत:चे घरटे बांधत नाही. सात बहिणी या पक्षाच्या घरटय़ातच तो अंडी देतो. आकाराने मैना या पक्ष्यासारखा हा पक्षी दिसत असून लांब शेपटी, सुंदर तुरा असलेला काळा व पांढरा कोकीळ, शेपटीचे पांढरे टोक, पंखाखालील गोलाकार पांढरा डाग उडताना स्पष्टपणे दिसून येतो.
मृग नक्षत्राला सुरुवात होताच पावश्या हा पक्षीसुद्धा शेतकऱ्यांना मान्सून येत असल्याची चाहूल देतो. पाऊस आल्याचा संदेशही शेतकऱ्यांना या पक्ष्याकडूनच मिळतो. संपूर्ण विदर्भात आढळणारा हा पक्षी भंडारा जिल्ह्यात खिवा तर नाशिक जिल्ह्यात पायवेडा या नावाने ओळखल्या जातो. आकाराने कबुतराएवढा असलेल्या पावश्या या पक्ष्याची शेपूट लांब, अंगावर उदिरंगाचे पट्टे, नर आणि मादी दिसायला सारखेच त्यामुळे शिकारा या पक्ष्यासारखाही तो दिसतो. पेरते व्हा.. पेरते व्हा.. असा आवाज करणारा हा पक्षी ‘पेरते व्हा’ या नावानेसुद्धा ओळखला जातो.
कोकणामध्ये पाऊस किंवा वादळाची चाहूल देणारा पक्षी म्हणून वादळी पाखरू परिचित आहे. हा पक्षी दिसताच कोळी बांधव त्यांच्या बोटी समुद्र किनाऱ्याला लावतात. समुद्रातील मासे किनाऱ्यावर येऊन उडय़ा मारताना दिसतात. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. या पक्ष्यांप्रमाणेच कावळयाच्या घरटय़ावरूनदेखील पावसाची चाहूल लागते. करज, आंबा यासारख्या स्निग्ध झाडाच्या पूर्वेला किंवा पश्चिमेला कावळयांनी घरटे बांधले तर पाऊस पडतो आणि बाबुळ, सावध अशा काटेरी झाडावर बांधले तर पाऊस कमी पडतो असाच सर्वसाधारण ग्रामीण भागात समज आहे.
पावसाचा संकेत देणारे पक्षीच दिसेनासे!
जून महिना संपला आणि जुलैचा मध्यान्ह उजाडला तरीही पावसाचे संकेत नाहीत. त्यामुळे शेतकरी पावसाच्या सरींची जेवढी आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे, तेवढीच प्रतीक्षा चातक या पक्ष्यालासुद्धा आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच आफ्रिका खंडातून येणाऱ्या चातकाचे थवे आकाशात घिरटय़ा घालताना दिसतात.
First published on: 12-07-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birds who giving rain indications get vanish