सोलापूरचे माजी खासदार तथा भाजपचे नेते लिंगराज बालईरय्या वल्याळ यांचे सोमवारी सकाळी १.४० वाजता येथील अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार घेत असताना ह्दयविकाराने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. गेली दहा वर्षे ते पक्षाघाताने आजारी होते. त्यातच ह्दयविकाराचा त्रास बळावल्याने अखेर त्यांचे निधन झाले. सायंकाळी उशिरा अक्कलकोट रस्त्यावरील पद्मशाली स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
वल्याळ यांच्यावर पक्षाघाताच्या आजारामुळे बंगळुरू येथील खासगी रुग्णालयात नियमित तपासणी तथा उपचार चालू होते. गेल्या आठवडय़ात त्यांना तपासणीसाठी बंगळुरू येथे नेण्यात आले असता त्यांना ह्दयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर तेथेच उपचार सुरू झाले असता कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊनही उपचारात फारशी प्रगती झाली नाही. त्यामुळे अखेर त्यांना सोलापुरात परत आणून अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथेही उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. सोमवारी सकाळी अखेर त्यांचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले.
लिंगराज वल्याळ हे १९७८ पासून राजकारणात सक्रिय होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यांच्यावर प्रभाव होता. कुरूहिनशेट्टी समाजातील एका गरीब कुटुंबात जन्माला आलेले वल्याळ हे १९८५ साली सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन समाजवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या पुलोद प्रयोगात निवडून आले होते. पहिल्याच वर्षी पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. या संधीचे त्यांनी सोने करीत राजकीय वाटचाल सुरू केली असता पुढे १९८९ साली सोलापूर लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली. त्यानंतर पुढच्या वर्षी १९९० साली विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून ते प्रथमच भाजपच्या तिकिटावर निवडून आले. नंतर १९९५ सालच्या निवडणुकीत ते पुन्हा विधानसभेवर दुसऱ्यांदा निवडून गेले. काँग्रेसचा बालेकिल्ला भेदून विधानसभेवर निवडून गेलेले वल्याळ हे पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे पहिले आमदार म्हणून परिचित होते. पुढे दुसऱ्याच वर्षी १९९६ साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या. तेव्हा वल्याळ यांना सोलापुरात पक्षाची उमेदवारी मिळाली व ते निवडून आले. दरम्यान युती शासनाच्या काळात वल्याळ यांनी पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले होते.
आपल्या राजकीय उभरत्या काळात वल्याळ यांनी सोलापूर शहर जिल्ह्य़ात भाजपची बांधणी नेटाने करून त्यावर स्वत:ची मजबूत पकड बसविली होती. पक्षात दबदबा ठेवताना त्यांनी लक्ष्मी-विष्णू कापड गिरणीच्या प्रश्नावर उपोषणही केले होते. त्यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मरणार्थ दंत महाविद्यालयाचीही उभारणी केली होती. वल्याळ यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, एक कन्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भाजपचे नगरसेवक नागेश वल्याळ यांचे ते वडील होत. वल्याळ यांच्या निधनाचे वृत्त समजताच भाजपचे आमदार विजय देशमुख, माजी खासदार सुभाष देशमुख, माजी महापौर किशोर देशपांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक दामोदर दरगड यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, उद्योग, व्यापार आदी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भवानी पेठेतील ‘ललितराज’ बंगल्यात धाव घेऊन वल्याळ यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आदींनी वल्याळ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Apr 2013 रोजी प्रकाशित
भाजपचे माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे सोलापुरात निधन
सोलापूरचे माजी खासदार तथा भाजपचे नेते लिंगराज बालईरय्या वल्याळ यांचे सोमवारी सकाळी १.४० वाजता येथील अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार घेत असताना ह्दयविकाराने निधन झाले.

First published on: 23-04-2013 at 03:35 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp former mp lingaraj walyal passed away