लोकसभेची जालना व औरंगाबादची जागा आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडेच राहणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केले. जालना जिल्ह्य़ातील भोकरदन येथे जनजागरण यात्रेनिमित्त आयोजित सभा त्यासाठीच असल्याचे सांगून अप्रत्यक्षपणे या दोन्हींपैकी एकही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटय़ाला जाणार नसल्याचे त्यांनी या वेळी सूचित केले.
काँग्रेसच्या वचनपूर्ती जनजागरण यात्रेचा जालना जिल्ह्य़ातील प्रारंभ शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते भोकरदन येथे झाला. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे होते. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली, हे जनतेला सांगण्यासाठी राज्यात काँग्रेसच्या वतीने जनजागरण यात्रा सुरू करण्यात आली आहे. जालना शहराचा पिण्याच्/ा पाण्याचा प्रश्न सोडविण्यास, तसेच दुष्काळासंदर्भातील अन्य योजना पूर्ण करण्यास राज्य सरकारने जालना जिल्ह्य़ास ९०० कोटींचे अर्थसाह्य़ केले.
शिवसेना-भाजपची मंडळी केवळ शहरी भागाचा विचार करणारी आहे, अशी टीका करून चव्हाण यांनी, आघाडी व यूपीए सरकार मात्र ग्रामीण भाग व शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारे असल्याचा दावा केला. राज्यात व देशातील जनतेसमोर उभे राहणारे जातीयतेचे आव्हान जनतेला समजून सांगण्यासाठी जनजागरण यात्रा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांच्यामुळे काँग्रेस पक्षात उत्साह संचारला असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठवाडय़ासारख्या मागासलेल्या भागात दुष्काळ निवारणाचे कार्य, तसेच विकासासंदर्भात सूचना करण्यासाठी राज्य सरकारने विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली. समितीचा अहवाल आल्यानंतर केलेल्या शिफारशींप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
माणिकराव ठाकरे यांनीही शिवसेना-भाजप युतीवर टीका केली. युतीजवळ विकासाचा कोणताही कार्यक्रम नाही. त्यामुळे ते जातीय विचार पसरवीत आहेत. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशावर चालणारा पक्ष आहे, असा आरोप त्यांनी केला. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे आदींची भाषणे झाली.
संग्रहित लेख, दिनांक 29th Sep 2013 रोजी प्रकाशित
जालना, औरंगाबाद काँग्रेसकडेच!
लोकसभेची जालना व औरंगाबादची जागा आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडेच राहणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केले. अप्रत्यक्षपणे या दोन्हींपैकी एकही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटय़ाला जाणार नसल्याचे त्यांनी या वेळी सूचित केले.

First published on: 29-09-2013 at 01:56 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress keeps jalana aurangabad with itself c m