बनावट दस्तावेज तयार करून मातोरी येथील २०४ एकर जमीन पंच व दलालांनी राजकीय मंडळींना विक्री करत ग्रामस्थांची फसवणूक केली असून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि ग्रामीण पोलीस मुख्यालयासमोर निदर्शने केली. ही जमीन खरेदी करणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, भाजपचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांच्या नातलगांचा समावेश असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या संदर्भात पोलिसात तक्रार देण्यात आली असून त्या अनुषंगाने कारवाई करण्याचे निवेदन आंदोलकांनी जिल्हा प्रशासनास दिले. पंच व जमीन खरेदीदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर सोमवारी निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिले आहे. दरम्यान, एका बांधकाम व्यावसायिकाच्या सांगण्यावरून संबंधितांकडून हे आंदोलन केले जात असून त्यांच्याविरुध्द अब्रु नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा जमीन खरेदीदारांनी दिला आहे.
मातोरी येथे अनेक शेतकऱ्यांच्या मालकीचे हे गायरान आहे. सर्व माळराण २८८ शेतकऱ्यांनी एकत्र येत गावातील प्रमुख पंच नेमून ही जागा सहा पंचांच्या नावे केली होती. काही काळानंतर ही मिळकत शेतकऱ्यांची बैले व गुरे कमी झाल्या कारणाने विक्री करण्याचे ठरले. सहा पंचाच्या नावे ही सगळी मिळकत असल्याने पंचांना विक्रीचे अधिकार देण्यात आले. मात्र त्यावेळी पंच केरू हगवणे, रामचंद्र धोंडगे, संतोष पिंगळे, रामदास सूर्यवंशी, प्रभाकर पिंगळे, वाळु पिंगळे-पाटील या पंचानी २०१० मध्ये विवाहायवेज प्रा. लि या कंपनीच्या संचालकांबरोबर व्यवहार केला, अशी तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. दहा लाख रुपये प्रती एकर प्रमाणे एकुण दोनशे चार एकरची मिळकत संबंधित कंपनीला विकण्यात आली. पंचांनी २५ लाख रुपये टोकण स्विकारत दोन कोटी ९७ लाख रुपये एका बँकेत जमा झाल्याचे सांगून शेतकऱ्यांना दस्त करण्यास सांगितले.
त्यात तुकाराम पिंगळे व त्र्यंबक कातड, वाल्मिक पिंगळे, दिलीप बर्वे, विठ्ठल चारसकर, संतोष चारसकर, भानुदास तांजळे या दलालांनी मदत केल्याचा आंदोलकांची तक्रार आहे. आमच्या नावे पैसे जमा आहेत असे पंच व दलालांनी सांगुन शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचे निवेदनात म्हटले आहे. २०० हून अधिक शेतकऱ्यांना दुय्यम निबंधक कार्यालयात बोलावून विवाहायवेजच्या नावाखाली खरेदी खत तयार न करता त्रयस्त व्यक्तींना ही जमीन विकण्यात आली. ही जमीन खरेदी करणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, भाजपचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांच्या नातलगांचा समावेश असल्याचे आंदोलकांनी जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या संपूर्ण व्यवहारात शेतकऱ्यांना पैसे न देता त्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांविरुध्द अब्रु नुकसानीचा दावा
एका बांधकाम व्यावसायिकाच्या इशाऱ्यावरून हे सगळे होत आहे. आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला धनादेशाद्वारे व्यवहाराची रक्कम देऊनही नाहक आरोप करून बदनामी केली जात असून संबंधितांविरोधात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला जाणार आहे. याच विषयावर मंगळवारी मातोरी येथे स्थानिक शेतकऱ्यांची बैठकही बोलाविण्यात आली आहे. – अजय बोरस्ते, (महानगरप्रमुख, शिवसेना)
मातोरीतील गायरान जमीन व्यवहाराविरोधात निदर्शने
बनावट दस्तावेज तयार करून मातोरी येथील २०४ एकर जमीन पंच व दलालांनी राजकीय मंडळींना विक्री करत
First published on: 24-03-2015 at 06:56 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demonstration