कीड लागल्याने आणि देखभालीअभावी पर्णराजीने बहरलेले मुंबईतील हजारो वृक्ष बोडके होत असताना मलबार हिलच्या टोकावर तब्बल ३७ एकर जमिनीवर वसलेल्या ‘राजभवना’तील वनसंपदेत मात्र गेल्या सहा वर्षांत दुपटीने भर पडली आहे.
राजभवन हे महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे निवासस्थान आणि कार्यालय आहे. २००८ साली झालेल्या वृक्षगणनेत राजभवनाच्या परिसरात २९९४ झाडे होती. नव्या वृक्षगणना अहवालानुसार ही संख्या ५५९० वर गेली आहे. म्हणजे गेल्या सहा वर्षांत येथील झाडांची संख्या २,५९६ने वाढली आहे. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त एस.व्ही. आर. श्रीनिवास यांनी राज्यपाल सी विद्यासागर राव यांना हा अहवाल सादर केला. पालिकेच्या वतीने २७ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत जीपीएस प्रणामी वापरून वृक्षगणना करण्यात आली होती.
राजभवन परिसरातील वनसंपदा वाढविण्यासाठी माजी राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी पुढाकार घेतला होता. सध्याची वाढलेली वृक्षांची संख्या हे त्यांच्या प्रयत्नांना आलेले यश म्हणता येईल. ताज्या वृक्षगणनेनुसार येथील परिसरात रतनगंज (९२७), गुलमोहर (५७५) व भेंड (३०३) या जातीची झाडे सर्वाधिक आहेत. तर हिरडा, अर्जुन, चायनिज पाम, डाळींब, निर्गुणी, पपनस, वायुपर्ण या व इतर काही जातीची एकेक झाडे आहेत. तसेच, नारळाची २७१, चिंचेची १११, सुपारीची १८१, देशी बदामाची ७९, फणसाची ४४, जांभळाची २९ झाडांनी या परिसराच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम केले आहे.
हा परिसरच मुळात जैवविविधतेने नटलेला आहे. मोरासह अनेक पक्ष्यांचे अधिवास राजभवनात असून एकूण १३० प्रजातीची झाडे आहेत. त्यामध्ये पाच प्रजाती दुर्मीळ आहेत. दुर्मीळ प्रजातींपैकी गोरखचिंच या दर्शनी भागात असलेल्या वृक्षाचा बुंधा ५८४ सेंटीमीटर इतका मोठा असल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे. तर साधारण १५ मीटरपेक्षा अधिक उंच असलेली ७४ झाडे आहेत.
वृक्षारोपणासोबत ठिबक सिंचनाद्वारे वृक्षसंवर्धनाकडे विशेष लक्ष दिल्यामुळे झाडांच्या संख्येत वाढ झाल्याचे राज्यपालांचे परिवार प्रबंधक वसंत साळुंखे यांनी सांगितले. तसेच जीपीएस प्रणालीमुळे प्रत्येक वृक्षाचे अक्षवृत्त व रेखावृत्तानुसार नेमके ठिकाण समजले आहे. पालिकेच्या वृक्षगणनेत झाडाचे प्रचलित नाव, शास्त्रीय नाव, उंची, बुंधा, पालवीचा विस्तार, बहरण्याचा महिना, कुटुंब प्रकार यासह सोळा बाबी नोंदविण्यात आल्या आहेत, असे पालिकेचे उद्यान अधीक्षक विजय हिरे आणि वृक्षगणना प्रकल्पाचे योगेश कुटे यांनी सांगितले.
राजभवनातील वनसंपदेची वर्गवारी
फळ झाडे – ११११
औषधी झाडे – ७९
शोभेची झाडे – ३२१८
मसाल्याची झाडे – ५
भाजीपाला – २९
रानटी झाडे – १०८९
गजरा फुलांची झाडे – १०
राजभवनातील वनसंपदा दुपटीने बहरली
कीड लागल्याने आणि देखभालीअभावी पर्णराजीने बहरलेले मुंबईतील हजारो वृक्ष बोडके होत असताना मलबार हिलच्या टोकावर तब्बल ३७ एकर जमिनीव
आणखी वाचा
First published on: 28-04-2015 at 06:17 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doubled the plants in rajbhavan in the last six years