दोनच दिवसात सेवानिवृत्त होत असलेल्या िपपरी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विष्णू जाधव यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला असून त्यांच्या काळात आर्थिक अनियमितता व नुकसान झाल्याचे चौकशीत सिध्द झाल्यास त्यांच्याकडून ते वसूल करण्याची भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे.
विष्णू जाधव यांच्याकडे शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशा दोन विभागांची जबाबदारी आहे. ३० नोव्हेंबरला ते सेवानिवृत्त होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याविषयी तक्रारींचा सपाटा सुरू असून त्याची दखल पालिका प्रशासनाने घेतली आहे. अलीकडील काही तक्रारीनंतर जाधव यांच्याकडे खुलासा मागण्यात आला होता. जाधव यांनी दिलेल्या उत्तरात हे आरोप फेटाळून लावले. तथापि, प्रशासनाला त्यांचा दावा पटला नाही म्हणून योग्य पुरावे सादर करून पुन्हा खुलासा करण्याचे आदेश जाधवांना देण्यात आले आहेत. त्यामध्ये शिक्षकांची संख्या कशी वाढली, भरती प्रक्रिया पारदर्शक का नव्हती, माध्यामिक विभागाच्या ५० पेक्षा अधिक तुकडय़ांना मान्यता नाही का, पर्यवेक्षक जादा का भरले, अवैध जातप्रमाण पत्र स्वीकारून भरती केली का, पालिकेचे कोटय़वधी रुपयांचे अनुदान बुडाले का, बूट व गणवेश खरेदीत भ्रष्टाचार झाला का, वाकड येथील महालक्ष्मी कंपनीस दरवर्षी काम का दिले जाते, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या संदर्भात, तातडीने आपली बाजू मांडण्याचे आदेश जाधवांना देण्यात आले आहेत. या संदर्भात, सहआयुक्त अमृत सावंत यांना विचारले असता, जाधव यांच्याविषयी असलेल्या तक्रारींची चौकशी सुरू आहे, असे ते म्हणाले. तथापि, अधिक भाष्य केले नाही.   

Story img Loader