अचानक चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली.. साथीच्या आजारांमुळे रुग्णांची संख्या वाढली.. एखादा अपघात झाला.. या व यांसारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रुग्णांना किमान प्राथमिक उपचार मिळावेत या दृष्टीने वैद्यकीय विभागासह अन्य विभाग काय भूमिका निभावतील यावर शुक्रवारी जिल्हा आपत्कालीन कक्ष आणि पुणे येथील यशदा संस्थेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरांत १०० हून अधिक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. आगामी सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर वैद्यकीय अधिकारी, पोलीस, महापालिका, स्वयंसेवक, नर्सिग, राष्ट्रीय सेवा योजना यासह अन्य शाखांचे महाविद्यालयीन विद्यार्थी परस्परांच्या सहकार्याने स्थिती कशी हाताळू शकतात यावर प्रकाशझोत टाकण्यात आला.
कार्यशाळेत यशदाच्या डॉ. पद्मनाभ केसरकर यांच्यासह आपत्कालीन कक्षाचे प्रशांत वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. पहिल्या टप्प्यात धार्मिक उत्सव, जत्रा आणि कुंभमेळ्यासारख्या मोठय़ा पर्वणीत देशात काही विपरीत घटना घडल्या, त्या कशामुळे झाल्या, ही परिस्थिती कशी टाळता आली असती याविषयी ‘व्हिडीओ क्लिप’ दाखवून चर्चा करण्यात आली. अशा महोत्सवांत चेंगराचेंगरी होण्याची भीती अधिक असते. यामुळे कुठल्या ठिकाणी अशा घटना घडू शकतात, अशी ठिकाणे शोधत त्या जागेवर वैद्यकीय पथकासह पोलीस, स्वयंसेवक अन्य यंत्रणा कशी राबवता येईल, या ठिकाणी रुग्णवाहिकेची व्यवस्था कशी तातडीने पोहोचली पाहिजे, त्याचे नियोजन कसे असावे याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच हवामानातील बदलामुळे जर काही साथीचे आजार उद्भवले आणि आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढू लागला तर काय करता येईल, एखादा बालक, व्यक्ती पाण्याची पातळी वाढल्याने किंवा पाय घसरून पडल्यामुळे पाण्यात बुडताना दिसला तर त्याला कृत्रिम पद्धतीने श्वासोच्छ्वास कसा द्यायचा, अन्नातून विषबाधा, अपघात यांसारख्या विविध आप्तकालीन परिस्थितीत रुग्णांना आराम मिळावा म्हणून रुग्णाला वैद्यकीय सेवा देण्यापूर्वी किमान त्याच्यावर प्राथमिक उपचार कशा पद्धतीने होतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे हे पटवून देण्यात आले. अशा स्थितीत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काय करायला हवे, रुग्णाला ‘स्ट्रेचर’वर कसे घ्यावे आदींची प्रात्यक्षिकांद्वारे माहिती देण्यात आली.
कोणतीही दुर्घटना घडू नये, गर्दीचे नियंत्रण कसे करता येईल या दृष्टीने नियोजनावर भर देण्यास सुचविण्यात आले. संदर्भ सेवा रुग्णालयात ५० वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, तर इंडियन रेड क्रॉस सोसायटी येथे सुरू असलेल्या कार्यशाळेत ७० विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

‘आपत्कालीन’ यंत्रणा
आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास काय करता येईल याची माहिती देण्यासाठी ‘प्रोजेक्टर’चा वापर करण्यात आला. कार्यशाळा सुरू असतानाच प्रोजेक्टर काही तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक बंद पडला. काही वेळाने यंत्रणा पूर्ववत झाली. आपत्कालीन कक्ष यंत्रणा बंद पडल्यावर किती तत्परतेने पर्यायी व्यवस्था उभी करू शकतो याचा प्रत्यय उपस्थितांना आला.

Story img Loader