राज्याच्या पोलिस दलाला अद्यापही कर्मचाऱ्यांची टंचाई असल्यामुळे या वर्षी पोलिस उपनिरीक्षकांची २५०० आणि ६२ हजार पोलिसांची रिक्तपदे येत्या दोन वर्षांत भरण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शनिवारी केली.
सांगली जिल्ह्यातील तुरची येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील ३११ पोलिस उपनिरीक्षकांचा दुसरा दीक्षान्त सभारंभ गृहमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास गृहराज्यमंत्री सतेज पाटील, राज्याच्या पोलिस प्रशिक्षण विभागाचे संचालक बर्वे, तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्राचे अधीक्षक महेश मेंगाडे , सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप सावंत, कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक विजयसिंह जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत नारनवरे आदींसह वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या वेळी १ वर्षांच्या प्रशिक्षण कालावधीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलिस उपनिरीक्षकांचा सत्कारही करण्यात आला. तसेच ३११ पोलिस उपनिरीक्षकांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. राज्याच्या पोलिस दलाकडे १५६५ पोलिस अधिकारी नव्याने मिळाले आहेत. आजवर नाशिक प्रशिक्षण केंद्राकडून ४ हजार अधिकारी पोलिस दलाला मिळाले आहेत. अजूनही पोलिस दलाला २५०० पोलिस उपनिरीक्षकांची कमतरता आहे तर राज्याच्या पोलिस दलात अजूनही ६२ हजार पोलिसांची आवश्यकता आहे. येत्या दोन वर्षांत ही पदे भरली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात १२ हजार पोलिसांची भरती या वर्षी केली जाणार असल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले. या वेळी ते पुढे म्हणाले, की नूतन पोलिस उपनिरीक्षकांना आता जनतेबरोबर मालमत्तेचेही रक्षण करावे लागणार आहे. कायद्यापुढे कोणीही मोठा किंवा लहान नाही हे समजून काम करावे लागेल. महिला अधिकाऱ्यांच्या संख्येत महाराष्ट्र देशात नंबर १ वर आहे. राज्यातील महिला आणि मुलगी ही बारबालापेक्षा वीरबाला बनू इच्छिते आणि अशीच इच्छा मुलींनी बाळगली पाहिजे. आमच्या भगिनी कामाबाबत कुठेही कमी पडत नाहीत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या वेळी बोलताना गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, की नव्या पोलिस अधिकाऱ्यांनी राज्यात शांतता आणि सुव्यस्था राखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. २१ व्या शतकात गुन्ह्याचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे बदलत्या अभ्यासक्रमाची माहिती घेण्याची गरज आहे. पोलिस दलात अधिकारी म्हणून काम करीत असताना कॉन्स्टेबल हा केंद्रिबदू मानून आणि जनताभिमुख काम करण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. त्यामुळे नव्या अधिकाऱ्यांनी भूमिका स्वीकारावी असे आवाहनही सतेज पाटील यांनी केले.
जर कोणी नेता अथवा अधिकारी शासकीय कामासाठी पशाची मागणी करीत असेल, तर लाचलुचपत विभागाकडे तक्रार करावी. त्याची दखल तर घेतली जाईल पण त्याचबरोबर तक्रार देणाऱ्याची माहिती गुप्त ठेवली जाईल असे गृहमंत्री आर आर पाटील यांनी सांगितले.
तुरची येथील ३११ पोलिस उपनिरीक्षकांच्या दीक्षान्त सभारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी आर. आर. पाटील यांनी लाचलुचपत विभागाने गेल्या सहा महिन्यांत केलेल्या कारवाईचे कौतुक करून आता या कामात जनतेनेही पुढे आले पाहिजे असे आवाहन केले. लाचलुचपत विभागाने आपल्या कारवाईत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना पकडले आहे. त्यामुळे या विभागात सर्वानाच समान कायदा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी पोलिसांच्या घराबाबत बोलताना श्री. पाटील म्हणाले, की राज्यातील पोलिसांच्या निवासाचा प्रश्न गंभीर आहे. पोलिसांच्या घरासाठी असणाऱ्या जागा या अपुऱ्या आहेत. त्यामुळे आता पोलिसांच्या घरासाठी हडकोकडून १ हजार कोटींचे कर्ज घेण्याचा सरकारचा विचार आहे. याबाबतचा कर्जाचा प्रस्ताव लवकरच हडकोला सादर केला जाई. त्यामुळे पोलिसांना लवकरच उत्तम प्रतीची घरे मिळतील असेही आर. आर. पाटील यांनी सांगितले.
पोलिस दलातील रिक्त पदे दोन वर्षांत भरणार – आर. आर.
राज्याच्या पोलिस दलाला अद्यापही कर्मचाऱ्यांची टंचाई असल्यामुळे या वर्षी पोलिस उपनिरीक्षकांची २५०० आणि ६२ हजार पोलिसांची रिक्तपदे येत्या दोन वर्षांत भरण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शनिवारी केली.
First published on: 29-09-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fill vacancy in two years to police wing r r patil