सध्या सर्वत्र फ्लॅट संस्कृती जन्माला येऊ लागली आहे. त्यामुळे व्हरांडय़ात, गच्चीवर, जागा असल्यास बागेत जमेल तेवढी झाडं, वनस्पती, भाजीपाला लोक लावतात. निसर्गावर आपण सर्वजण खूप प्रेम करतो. हा निसर्ग घरात फुलवावा, ही पण प्रत्येकांची मनोमन इच्छा असते. पर्यावरण स्वच्छ करणं हे प्रत्येकानं आपलं कर्तव्य समजायला पाहिजे. दिवसेंदिवस पर्यावरण जागृतीही वाढत आहे, ही आनंदाची बाब आहे. लोकांमध्ये वृक्ष लागवडीबरोबरच वृक्ष संवर्धनाची आवड निर्माण होताना दिसत आहे. त्यातल्या त्यात आपल्या दैनंदिन भोजनासाठी आवश्यक असलेला भाजीपाला निर्माण करण्याची त्यांच्यातील प्रवृत्ती स्वागतार्ह आहे. समतोल आहार घेण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करतो. प्रथिने, जीवनसत्वे, क्षार भरपूर देणाऱ्या भाज्या, आपल्याला आवश्यक असलेला भाजीपाला आपल्या किचन गार्डनमध्ये कशा लावाव्यात, हे आज बघू.
भाजीपाला आणि स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वनस्पतींची जिथं लागवड केली जाते त्या भागाला किचन गार्डन म्हटलं जातं. घरच्या बागेत, व्हरांडय़ात, बाल्कनीत, टॅरेसवर हे किचन गार्डन आपण करू शकतो. जागा भरपूर असेल तर पालेभाज्या, कंद, शेंगा, वेली, फळझाडे, भाज्या वगैरे लावता येतील. फळझांडामध्ये नारळ, लिंबू, कढीलिंब ही झाडं रोजच्या उपयोगाची असल्यामुळे जरूर लावावीत. फळभाज्यांमध्ये फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, वांगी, भेंडी, ढोवळी मिर्ची लावता येतील. कंद भाज्यांमध्ये रताळी, मुळे, बटाटे, कांदे, वगैरे लावता येतील. पालेभाज्यांमध्ये मेथी, अंबाडी, चवळी, पालक, चाकवत, आंबटचुका, माठ, शेपू या भाज्या घ्याव्यात. शेंगांमध्ये गवार, मटार, चवळी, वालाच्या शेंगा परसबागेत घेता येतील. वेलीच्या भाज्यांमध्ये लाल भोपळा, दुधी, कारली, दोडके घेता येतील. हिरवी मिरची, आले, कोथिंबीर, लसूण यापैकी जमतील तेवढय़ा जास्तीत जास्त भाज्या किचन गार्डनमध्ये लावाव्यात. आपल्याला वरील भाज्यांपैकी, जागेनुसार कोणत्या भाज्या लावायच्या ते आधी ठरवावं. भिंतीजवळ मोठी झाडं लिंबू, कढीपत्ता, नारळ ही लावावीत, वेलींच्या भाज्यांसाठी मंडप घालावा. ऊन्हं भरपूर येत असेल अशाच ठिकाणी फळभाज्या लावाव्यात, पण पालेभाज्या मोठय़ा झाडाच्या सावलीतही येऊ शकतात. तीन फुटांचे वाफे करावे म्हणजे दोन्हीकडून खुरपी करायला सोपं जाईल. वाफ्यातील किंवा कुंडीतील मातीची खोली एक ते दीड फूट असावी. जागा बऱ्यापैकी असेल तर विटांनी वाफे बनवावे. मातीची ढेकळं असल्यास ते पाणी देऊन विरघळू द्यावे. बारीक माती आणि खत, रेतीचं मिश्रण वाफ्यात घालावं. कमी अधिक प्रमाणात वर्षभर भाज्या येत असल्या तरी ठराविक मोसमात काही भाज्यांचं पीक चांगलं येतं. म्हणजे, कीड रोगही कमी प्रमाणात राहते.
वेलींच्या भाज्या सर्वसाधारणपणे पावसाळ्यात लावतात. फळभाज्या हिवाळ्यात चांगल्या लावतात. सर्व भाज्यांची प्रथम रोपं तयार करून घ्यावी लागतात. रोपं प्रथम कुंडय़ांमध्ये तयार करून घ्यावी. पावसापासून रोपांचं संरक्षण होईल, अशा ठिकाणी ठेवावी. बी पेरताना हातात चमचाभर कोरडी बारीक माती घेऊन त्यात बी घोळून ते पेरावं. रोपं तयार व्हायला एक महिना वेळ लागतो. पाच-सहा इंचाची रोपं झाल्यावर वाफ्यात लावावी. फ्लॉवर, टोमॅटो, मिरची, वांगी, कोबी ही रोपं एक ते दीड फूटांच्या अंतरावर लावावी. रोपं आठ दहा इंच वाढली की, शेणखत भरपूर घालावं. पानांची वाढ होण्यासाठी थोडा युरिया शिंपडावा, वांग्याची रोपं अध्येमध्ये कापत राहिल्यास व खत दिल्यास वर्षभर वांगी येत राहतात.
एकाच प्रकारच्या भाज्या एकाच वाफ्यात दरवर्षी लावू नये. पालेभाज्यांना खत वगैरे लागत नाही. त्या वर्षभर चांगल्या येऊ शकतात. भाजी खुडून घेतली तर ती बऱ्याच दिवस मिळू शकते. कंदभाज्या मातीखत मिश्रण करून लावाव्यात. कांद्यांची रोपं सहा इंच उंचीची झाल्यावर ओळीनं वाफ्यात लावावी. बटाटे ओळीत लावावेत. रताळय़ाची वेल जमिनीवर पसरू द्यावी. घरामागं जागा नसेल तर खोक्यात, कुंडय़ात पालक, मेथी, सांबार, अंबाडी, चवळी या प्रकारच्या भाजीपाला लावता येतात. लिंबाच्या झाडाला भरपूर लिंबू येण्याकरिता हड्डीखत चार महिन्यातून एकदा घालावं. परसबागेतील भाज्यांचे किडीपासून नुकसान होते. या कीडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक विषारी कीटकनाशकानं फवारणी करता येत नाही, कारण दररोज भाज्या खाण्यासाठी लागतात. परसबागेत नेहमी झेंडू, पुदिना, लसून, कांदा ही पीकं घ्यावीत. त्यामुळे सूत्रकृमींचं नियंत्रण होतं आणि कीडी पिकांपासून लांब राहतात. पेस्टीसाईड जर वापरली तर ही भाजी काही दिवस खाण्यासाठी वापरू नये. आठ-दहा दिवसानंतर वापरता येईल.
याप्रकारे जर आपण पालेभाज्या, फळभाज्या, लावल्या व त्याचं संगोपन केलं तर दैनंदिन भोजनासाठी आवश्यक असलेला भाजीपाला घरीच तयार करू शकतो. या बागेच्या छंदातून आरोग्याचं रक्षण आपण करू शकतो. वेळ सत्कारणी लागल्याचा आनंदही मिळतो. या किचन गार्डनसाठी दैनंदिन प्रयत्नांची खूप आवश्यकता असते. मनापासून इच्छा असली आणि मेहनत घेतली की, आपल्याला आवश्यक असलेला भाजीपाला आपल्या बागेत सहज घेता येतो, एवढंच या निरोपाच्या लेखात सांगू इच्छिते.
गार्डनिंग : किचन गार्डन
सध्या सर्वत्र फ्लॅट संस्कृती जन्माला येऊ लागली आहे. त्यामुळे व्हरांडय़ात, गच्चीवर, जागा असल्यास बागेत जमेल तेवढी झाडं, वनस्पती, भाजीपाला लोक लावतात. निसर्गावर आपण सर्वजण खूप प्रेम करतो.
आणखी वाचा
First published on: 30-12-2012 at 01:56 IST
मराठीतील सर्व विदर्भरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gardening kitchen garden