अवकाळी पाऊस, गारपीठ, ढगाळ वातावरण आणि कमी उत्पादन याचा फटका कोकणातील हापूस आंब्याला बसला आहे. यंदा गुजरात हापूस आंब्याचीही आवक घटणार असल्याचे लक्षणे दिसू लागली आहेत. सर्वसाधारणपणे कोकणातील हापूस आंबा बाजारात येणे बंद झाल्यावर गुजरातहून येणाऱ्या हापूस आंब्याचा हंगाम सुरू होतो. या आंब्याला लंडन, सिंगापूर या परदेशात मोठी मागणी आहे.
कोकणातील हापूस आंब्यावर या वर्षी अस्मानी संकट ओढवले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशात त्यावर चर्चा होऊन नुकसानभरपाई देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. शुक्रवारी कोकणातील हापूस आंब्याच्या ५७ हजार पेटय़ा तुर्भे येथील फळबाजारात आल्याची नोंद आहे पण याच काळात या पेटय़ांचे प्रमाण गत वर्षी सव्वालाखाच्या घरात असल्याचे व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले. आवक कमी असल्याने भावदेखील जास्त असून डझनाला २०० ते ८०० इतका भाव आहे. किरकोळ बाजारात हा आंबा गेल्यानंतर त्यात आणखी दरवाढ होत असून तो विक्रीच्या ठिकाणावर अवलंबून आहे. खराब मालामुळे हापूस आंब्याला या वर्षी म्हणावा तसा उठाव नाही. आंबा कापल्यानंतर तो आतून खराब असल्याचे ग्राहकांना आढळून आले आहे. फळाला पाणी लागल्याने असे होत आहे. आंब्याचा हा हंगाम मे महिन्याच्या माध्यापर्यंत राहण्याची शक्यता असून शेवटच्या टप्प्यात काही चांगला आंबा व्यापाऱ्यांच्या पदरात पडेल अशी आशा व्यापाऱ्यांना आहे. हे प्रमाण जास्त नसून केवळ पंधरा टक्के राहणार आहे.
देवगड तालुक्यातील हापूस आंब्याकडे उत्तम गुणवत्ता म्हणून पाहिले जाते. येथील आंबा आता लवकरच संपणार आहे. त्यानंतर तळकोकणातील आंब्याच्या पेटय़ा सुरू होणार आहेत. कोकणातील हापूस आंब्यानंतर गुजरातमधील हापूस आंब्याची आवक सुरू होते. सर्वसाधारपणे दिवसाला ५० ते ६० ट्रक भरून येणारा हा आंबा यंदा कमी प्रमाणात येणार आहे. ती आवक ५० टक्क्यांनी घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हापूस आंब्यावर वर्षभराचे गणित मांडणाऱ्या आंबा बागायतदार व व्यापाऱ्यांचे गणित या वर्षी कोलमडले असून ते चिंताग्रस्त आहेत. गुजरातच्या हापूस आंब्याचा हंगाम एक महिना राहणारा या वर्षी लवकर संपणार आहे. परदेशात या आंब्याला जास्त मागणी आहे. त्याची चवही कोकणातील हापूस आंब्यासारखीच असल्याचे पानसरे यांनी स्पष्ट केले.

Story img Loader