गोटय़ा धावडे खूनप्रकरणात राहुल लांडगे याची कबुली
गोटय़ा धावडे खून प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल अंकुश लांडगे याने सोमवारी पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांच्या साक्षीने पत्रकारांसमोरच गुन्ह्य़ाची कबुली दिली. ‘सहा वर्षांपूर्वी माझ्या डोळ्यासमोर गोटय़ाने वडील अंकुश लांडगे यांचा खून केला. त्याचा सूड घेण्यासाठीच गोटय़ाचा खून केला,’ असे तो म्हणाला.
‘वडिलांवर हल्ला झाला तेव्हा मी लहान होतो. त्यांना वाचवायला गेलो, माझ्यावरही वार केले. त्यानंतर माझ्या कुटुंबीयांना सतत दमदाटी, शिवीगाळ करून त्रास दिला गेला. मित्रांना मारहाण केली. घरावर व गणपती मंडळांच्या मिरवणुकीवर दगडफेक केली. इतकेच नव्हे तर माझ्या चुलत भावाला मारण्याचाही त्याचा कट होता. तडिपारी संपवून पालिका निवडणुकीच्या वेळी गोटय़ा भोसरीत आला होता. अलीकडे तो एकटा बाहेर पडत होता. तो घरातून बाहेर कधी पडतो, कुठे जातो व बरोबर कोण असते, याची माहिती घेण्यासाठी आठवडाभर पाळत ठेवली. २९ नोव्हेंबरला तो एकटा घरातून निघाल्याचे दुर्बिणीतून पाहिल्यानंतर खात्री पटली. तेव्हा त्याच्यावर कोयते, तलवारीने व पिस्तुलीने हल्ला चढवला. त्यात गोटय़ा संपला. मात्र, तेव्हा झालेल्या झटापटीत चुकून गोळी लागल्याने आमच्यापैकी एक अंकुश लकडे मारला गेला. नंतर आम्ही देहूत गेलो व इंद्रायणी नदीत हत्यारे टाकली. तेथून नगरकडे गेलो. मुंबईला जाण्यासाठी निगडीत आलो असताना आम्हाला पोलिसांनी पकडले,’ असे त्याने सांगितले.
‘खुनाच्या घटनेपूर्वी भोसरी तळ्याजवळ बसून प्लॅन केला. ४० हजार रुपये देऊन दोन पिस्तुली घेतल्या. एक नारायणगावातून, तर दुसरी बिहारमधून मिळवली. १५ काडतुसे आणली होती. पालिकेच्या बॉडी आर्ट जीममध्ये गोळ्या झाडण्याचा सराव केला. तेव्हा आवाज येऊ नये म्हणून म्युजिक सिस्टीम लावली होती. िपपरीतून माकड टोप्या आणल्या. टेम्पोची व्यवस्था केली. लहानपणाचे मित्र बरोबर घेतले. गोटय़ाने त्यांनाही त्रास दिला होता. त्याला मारल्याचा कोणताही पश्चाताप नाही, उलट वडिलांच्या हत्येचा बदला घेतल्याचा गर्व वाटतो,’ असे तो म्हणाला.
दरम्यान, याप्रकरणी सात जणांना अटक केली असून त्यांना सात डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्य़ामागे कोणत्याही टोळीचा हात असल्याचे वाटत नाही. गुन्ह्य़ात वापरलेली हत्यारे व मोटारी जप्त केल्या आहेत, असे उमप यांनी सांगितले. यावेळी सहायक पोलीस आयुक्त सुधीर चौगुले, पोलीस निरीक्षक सुधीर अस्पात, मोहन विधाते आदी उपस्थित होते