रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणारे हल्ले थांबवण्यासाठी निवासी डॉक्टरांनी सातत्याने केलेल्या आंदोलनाला पालिकेकडून प्रतिसाद मिळाला असून केईएम, नायर आणि सायन या पालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये  सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत पालिकेच्या उच्चाधिकाऱ्यांकडून होकार मिळाला आहे. राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये अजून पाहणी सुरू असताना पालिकेने मात्र सीसीटीव्ही लावण्यासाठी प्रक्रिया सुरू केली.अपुऱ्या सुविधा आणि डॉक्टरांची कमतरता यामुळे मेटाकुटीला आलेले रुग्णांचे नातेवाईक एखाद्या वाईट घटनेनंतर िहसक होतात आणि त्यातून डॉक्टरांना मारहाणींच्या घटना घडतात. वॉर्डमध्ये काम करणारे निवासी डॉक्टरांनाच हे हल्ले सहन करावे लागतात. डॉक्टरांवरील हल्ले थांबवण्यासाठी गेल्या सात ते आठ वर्षांत वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करण्यात आले. त्यात रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टरांच्या समुपदेशनापासून जास्त सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यापर्यंत उपाय झाले मात्र तरीही हल्ल्यांची संख्या प्रत्येक वर्षांगणिक वाढत असून मुंबईसोबतच राज्यभरातील विविध रुग्णालयात डॉक्टरांवर राग निघत आहे. या हल्ल्यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) सातत्याने आंदोलने केली मात्र तरीही सरकारकडून आश्वासनांखेरीज काही मिळत नसल्याने जूनमध्ये मार्डने बेमुदत संपाची हाक दिली. राज्यभरातील पालिका व सरकारी सेवा कोलमडल्यानंतर सरकारला जाग आली आणि सर्व वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या रुग्णालयांमधील सुरक्षेचा आढावा एका महिन्यात घेण्याची सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. मात्र ही सूचना येऊनही राज्य सरकारच्या केवळ तीनच रुग्णालयांनी आतापर्यंत सुरक्षा अहवाल तयार केला आहे.

एकीकडे हे चित्र दिसत असतानाच पालिकेच्या तीनही प्रमुख- सायन, नायर आणि केईएम रुग्णालयांमध्ये सीसीटीव्हीची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय पालिकेच्या उच्चाधिकाऱ्यांनी घेतला आहे. या तीनही रुग्णालयांच्या अधीक्षकांनी याबाबतची माहिती पालिकेला कळवली आहे. त्यानुसार सीसीटीव्ही लावण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून वर्षभरात प्रत्येक रुग्णालयात दीडशे ते दोनशे कॅमेरा बसवण्यात येणार आहेत.

Story img Loader