भारतीय लिपीकडे कलेबरोबरच व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहिले जावे, त्यासाठी अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफीतर्फे १२ ते १८ ऑगस्ट या कालावधीत मुंबईत भारतीय लिपी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात विविध प्रदर्शने, व्याख्याने आणि प्रात्यक्षिकांचा समावेश आहे.
‘कॅलिफेस्ट-२०१४’चे आयोजक अच्युत पालव यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. भारताला विविध भाषा, लिपी यांचा खूप मोठा वारसा लाभला असून जागतिक पातळीवर कलाक्षेत्रातही भारतीय लिपींना महत्व आहे. या उत्सवाचे उद्घाटन १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नेहरू सेंटर, वरळी येथे होणार आहे. त्यानंतर होणारी व्याख्याने आणि प्रदर्शन आदी कार्यक्रम १३ ऑगस्टपासून रचना संसद, प्रभादेवी येथे होणार असल्याचे पालव यांनी सांगितले.
या कालावधीत ईर्शाद हुसेन फारुकी (उर्दू कॅलीग्राफी), प्रा. श्रीकुमार (मल्याळम लिपी), प्रा. सिद्धार्थ वाकणकर (हस्तलिखितांचे महत्व), कमलजित कौर (गुरुमुखी लिपी) यांची व्याख्याने आणि प्रात्यक्षिक होणार आहे. अच्युत पालव यांच्याही प्रात्यक्षिकाचा विशेष कार्यक्रम या वेळी होणार आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी http://www.apsc.net.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

Story img Loader