१९६३ ते १९९८ या कालावधीत तब्बल ६३५ हिंदी चित्रपटांना लोकप्रिय संगीत देणारी जोडी म्हणजे लक्ष्मीकांत-प्यारेलाल! सर्वाधिक यशस्वी संगीतकार म्हणून याच जोडीचे नाव चित्रपटसंगीताच्या इतिहासात नोंदलं गेलं आहे. या जोडीतील प्यारेलाल यांनी गेल्या मंगळवारी ७४ व्या वर्षांत प्रवेश केला, तसेच ‘पारसमणी’ या त्यांच्या पदार्पणातील चित्रपटाला यंदा ५० वष्रे पूर्ण झाली. यानिमित्त प्यारेलाल यांनी ‘लोकसत्ता’च्या वाचकांशी खास संवाद साधला.
‘पारसमणी’ प्रदर्शित झाला तेव्हा मी केवळ २३ वर्षांचा होतो, तर लक्ष्मी माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा होता. एवढय़ा लहान वयात आम्ही ही अचाट कामगिरी कशी केली, याचं आजही अनेकांना आश्चर्य वाटतं. मात्र त्याचं उत्तर आमच्या साधनेत आहे. आम्ही दोघंही लहानपणापासून अनेक वाद्ये वाजविण्यात पारंगत होतो. माझं सांगायचं तर माझ्या रक्तातच संगीत होतं. वडील प्रख्यात ट्रंपेटवादक व संगीतकार रामप्रसाद शर्मा, त्यांनी अनेक वादक घडविले. मला आठवतंय माझा आठवा वाढदिवस झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी मला पाश्चिमात्य नोटेशन शिकविण्यास सुरुवात केली. त्यांची शिस्त फार कडक होती. टाळाटाळ व कामचुकारपणा त्यांना बिलकूल खपत नसे. त्यामुळेच केवळ चार दिवसांत मी व्हायलीन व पियानोवरील ती नोटेशन्स शिकलो.
पुढे १९५१मध्ये वयाच्या ११व्या वर्षी हृदयनाथ मंगेशकरांशी मत्री झाली. हृदयनाथ, तसेच मयेकर, शिर्के, नायडू आणि लक्ष्मीकांत असा आमचा कंपू जमला. आम्ही सर्वानी मिळून ‘सुरेल बाल कला केंद्र’ या नावाने वाद्यवृंद स्थापन केला व त्या लहान वयात अनेक कार्यक्रम केले. लक्ष्मीकांत व माझी मत्री जमली ती त्याच काळात. हृदयनाथने सुरुवातीच्या काळात संगीतबद्ध केलेल्या ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’ या तसंच अन्य काही गाण्यांचं वाद्यवृंद संयोजन मी केलं आहे.
यातून आम्ही घडत गेलो. मी व लक्ष्मी आघाडीचे वादक झालो नंतर कल्याणजी-आनंदजींकडे सहाय्यक या नात्याने काम करू लागलो. त्यावेळी सहाय्यक संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल असं नाव पडद्यावर झळकत असे. हे नाव आपण कायम ठेऊ असं लक्ष्मीकांत म्हणत असे, आणि नेमकं तसंच झालं.
‘पारसमणी’ हा चित्रपट आम्हाला मिळाला, त्यातील सर्व गाणी लोकप्रिय झाली आणि आम्ही संगीतकार म्हणून प्रस्थापित झालो. ‘पारसमणी’नंतर आलेल्या ‘दोस्ती’तील गाणीही लोकप्रिय झाली. त्या वर्षी ‘संगम’, ‘वो कौन थी’ असे चित्रपट फिल्मफेअरच्या स्पध्रेत होते, या चित्रपटांतील गाणीही उत्तम होती, मात्र हा पुरस्कार ‘दोस्ती’साठी आम्हाला मिळाला. त्यावेळी तो पुरस्कार खूप प्रतिष्ठेचा होता.
यानंतर आम्ही ‘मि. एक्स इन बॉम्बे’, ‘मिलन’, ‘पत्थर के सनम’, ‘शागीर्द’, ‘आये दिन बहार के’, ‘फर्ज’ असे असंख्य हीट चित्रपट देत होतो, मात्र कारकीर्दीला कलाटणी मिळाली ती ‘बॉबी’मुळे. राजजींचा चित्रपट! अर्थात हे काही एकाएकी झालं नाही, ‘दोस्ती’नंतर राजजींचं आमच्या कामाकडे बारीक लक्ष होतं, त्यांना आमचं कौतुक होतं. आमच्या नियमित भेटीही होत असत. ‘बॉबी’च्या आधीच जयकिशन यांचं निधन झालं होतं, शंकरजी असताना राजजींचा चित्रपट करणं योग्य होणार नाही, असं आम्हाला वाटलं. मात्र मुकेशनी आमची समजूत घातली. हा चित्रपट तुम्हाला मिळतोय म्हणून शंकरजींना ते चित्रपट देणारच नाहीत, असं नाही. त्यांना ते चित्रपट देणार आहेतच. मात्र हा चित्रपट तुम्ही करावा अशी राजजींची इच्छा आहे, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. शिवाय या चित्रपटासाठी कल्याणजी-आनंदजी आणि राहुलदेव बर्मन यांची नावंही चच्रेत असल्याचं कानावर येत होतं. तेव्हा आम्ही विचार केला की शंकरजी आम्हालाच सर्वात जवळचे आहेत, मग बाकीच्यांनी ते करण्यापेक्षा आपणच का करू नये आणि तो चित्रपट स्वीकारला. पुढचा इतिहास सर्वाना ठाऊक आहे.
रेकॉर्ड्सच्या सर्वाधिक खपासाठी तेव्हा प्रथमच गोल्ड डिस्क देण्याची कल्पना पुढे आली आणि ‘बॉबी’साठी ती डिस्क आम्हाला शंकरजींच्या हस्ते देण्यात आली. हा आमचा खूप मोठा गौरव होता. राजजींच्या ‘सत्यय शिवम सुंदरम’ आणि ‘प्रेमरोग’ या चित्रपटांनाही आम्ही कथेनुसार चांगलं संगीत दिलं. सुभाष घई, मनोजकुमार यांनाही गाण्याची चांगली जाण होती. लता, आशा, रफी, किशोर अशा सर्वच आघाडीच्या गायकांनी आमच्याकडे भरपूर गाणी गायली. हे असे गायक आहेत की त्यांच्या तोलामोलाची गाणी करण्याचं आव्हान नेहमी आमच्यासमोर असे. गीतकार आनंद बक्षी यांच्यासोबत आमचे सूर जुळले होते. आम्हाला काय हवं आहे, हे त्यांना नेमकं ठाऊक असे.
लक्ष्मीजींच्या निधनानंतर आमचं काम थांबलं. तरीही गेल्या वर्षी माझा ‘आवाज दिल से’ हा नवा अल्बम आला आहे. भविष्यातही चांगली ऑफर आली तर संगीत द्यायला नक्कीच आवडेल. रसिककश्रोत्या चाहत्यांचं प्रेम बघून मन भरून येतं. परवा वाढदिवसाला सर्व एफएम रेडिओवर दिवसभर म्हणजे सकाळी सहापासून रात्री बारापर्यंत माझ्या मुलाखती व आमची गाणी सुरू होती. चाहत्यांचं प्रेम तसंच आई-वडिलांचा व सरस्वतीचा आशीर्वाद यामुळेच आम्ही यशस्वी झालो, अशी माझी नम्र भावना आहे.
‘दोस्ती’ का वास्ता
जागतिक कीर्तीचा व्हायलीन वादक व्हायचं, अशी माझी महत्त्वाकांक्षा होती, त्यामुळे सिंफनी शिकण्यासाठी व्हिएन्नाला जाऊन तेथेच स्थायिक होण्याचा निर्णय मी १९५७ मध्ये घेतला. मात्र लक्ष्मीने मला रोखलं. तिकडे जाऊन तू फार तर चांगला व्हायलीनवादक होशील, परंतु आपल्याला यशस्वी संगीतकार व्हायचं आहे आणि आपल्यासाठी ते अशक्य नाही, असं सांगत त्याने मला तिकडे जाऊ दिलं नाही.. त्याचं भाकीत खरं ठरलं!