राज्यातील १३० शहरांत विशेष सेवा केंद्र

ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने गतिमान विद्युत विकास सुधारणा कार्यक्रमांत समाविष्ट राज्यातील १३० शहरांमध्ये ‘महावितरण’ विशेष सेवा केंद्र स्थापन करणार आहे. ग्राहकांच्या तक्रारी, नवीन जोडणी, यंत्रणेची देखभाल, दुरुस्ती, वीजबिलांची वसुली या महत्त्वाच्या विषयांशी संबंधित या योजनेत विशेष यंत्रणा कार्यरत राहणार आहे.
शहरी भागामध्ये शाखा कार्यालयांमध्ये ही यंत्रणा कार्यरत राहणार आहे. त्यासाठी स्वतंत्र वाहन व अन्य साधने, सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. भविष्यात सर्वत्रच ही यंत्रणा लागू करण्याचा ‘महावितरण’चा प्रयत्न राहणार आहे. १३० शहरांमधील ही केंद्र मध्यवर्ती कॉल सेंटरला (क्र. १८००२३३३४३५) जोडली जाणार आहेत. या ठिकाणी तक्रार नोंदविल्यानंतर संबंधित ठिकाणी ती कळविली जाणार आहे. तक्रार सोडविण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त कालावधी लागल्यास ते वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले जाईल. ग्राहकांना नेहमीप्रमाणे उपविभागीय कार्यालयातही तक्रार नोंदविण्याचा पर्यात खुला राहणार आहे.
‘महावितरण’ने मे महिन्यापासून राज्यातील अहमदनगर, कोल्हापूर, धुळे, नांदेड, चंद्रपूर व अमरावती या शहरांमध्ये अशी केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. त्यातून ग्राहकांच्या सेवेमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. यंत्रणेत काम करण्याची कर्मचाऱ्यांची जबाबदारीही वाढली आहे. सध्या शाखा कार्यालयात नवीन जोडण्या देणे, तक्रारी सोडविणे, देखभाल-दुरुस्ती करणे, वीज बिलांची वसुली करणे ही कामे केली जातात. ही कामे सामूहिकपणे केली जात असल्याने त्यात प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित करणे शक्य नव्हते. नवीन यंत्रणेत प्रत्येक कामासाठी स्वतंत्र गट कार्यरत राहणार आहे. त्यामुळे सेवेत बदल होण्याबरोबरच कर्मचाऱ्यांची जबाबदारीही वाढणार असल्याचे ‘महावितरण’ने म्हटले आहे.      

Story img Loader