प्रत्येक भाषेची, प्रत्येक लिपीची एक विशिष्ट बांधणी असते. मराठीची लिपी ही स्वर आणि व्यंजनांच्या रचनाबद्ध गुंफणीतून बहरते. ही बोली लिहायला आणि वाचायला सोपी असली, तरी आजतागायत टाइप करायला मात्र ती एक कोडे बनून राहिली आहे. एरवी सर्रास संगणक वापरणारे टेक-सॅव्ही लोकही मराठीत चार ओळी टाइप करायच्या झाल्या की मराठी टंकलेखकाकडे धाव घेतात. मोबाइल फोनवर मराठी भाषा येऊन दशकाहून अधिक काळ लोटून गेला तरी मराठी टायिपग स्थिरावलेली दिसत नाही. यामुळेच अनेकांना अपल्या भावना मराठीतून व्यक्त करावयाच्या असल्या तरी त्या व्यक्त करणे त्यांना केवळ टायपिंग येत नाही म्हणून जमत नाही.
आयआयटी मुंबईची एक टीम बऱ्याच दिवसांपासून या समस्येवर काम करीत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वरचक्र नावाचा टचस्क्रीन कीबोर्ड अँड्रॉइड फोनसाठी तयार केला. स्वरचक्र भारतीय लिप्यांच्या मूलभूत रचनेनुसार संकल्पित केलेला असल्यामुळे त्याने मराठीत टाइप करणे सहजसोपे होऊन जाते. स्वरचक्रमध्ये अक्षरांची मांडणी ही मराठीच्या बाराखडीच्या रचनेवर आधारित आहे. त्यामुळे अक्षरे चटकन सापडतात. सामान्यत: एखाद्या व्यंजनाला काना, मात्रा अथवा वेलांटी लावायची असेल, तर कीबोर्डवरील किमान दोन बटणे तरी दाबावी लागतात. उदाहरणार्थ जर ‘थो’ लिहायचा असेल तर ‘थ’ आणि ‘ो’ अशी वेगवेगळी बटणे दाबावी लागतात. पण स्वरचक्रमध्ये एखाद्या व्यंजनाच्या (उदा. ‘थ’च्या) बटणाला स्पर्श करताच त्या बटणाच्या भोवती सर्व काना, मात्रा, वेलांटय़ा लावलेल्या व्यंजनांचे पर्याय (था, थि, थु, थू, थे, थ, थो, थौ) एका चक्रात उमटतात. यातील हवा असलेला पर्याय आपण बोट सरकवून एकाच स्पर्शात निवडू शकतो. यामुळे आपला वेळ वाचतो, अशी माहिती हे अॅप तयार करणाऱ्या संघाचे प्रमुख आणि आयआयटी मुंबईचे प्राध्यापक अनिरुद्ध जोशी यांनी दिली.
ज्यांना थोडंफार मराठी टायिपग करायला येतं त्यांनाही जोडाक्षरे (स्व, च्या, क्ति) लिहिणे सर्वात कठीण जाते. पण स्वरचक्र वापरून जोडाक्षरे लिहिणेही सोपे झाले आहे. चक्रात एखाद्या व्यंजनाचा, उदाहरणार्थ स चा, पाय मोडला (स्) की कीबोर्डमधील सर्व व्यंजनांच्या समोर अर्धा स जोडला जातो. यातून आपण आपल्याला जो कोणता जोड शब्द तयार करायचा आहे तो अगदी जलद तयार करू शकतो. तर अशा प्रकारे स्वरचक्राच्या सुलभ आणि स्वाभाविक रचनेमुळे अँड्रॉइड फोनधारकांना मराठी लिहिणे सुलभ झाले आहे. स्वरचक्र कीबोर्ड डाऊनलोड करण्यासाठी अँड्रॉइड फोनवरून गुगल प्लेमध्ये जा. त्यात इंग्रजीत Swarachakra असे लिहून शोधा. मराठी स्वरचक्र अॅप डाऊनलोड करून इन्स्टॉल करता येईल, असेही जोशी यांनी स्पष्ट केले. आय. आय. टी. मुंबईची स्वरचक्राचा संघ स्वरचक्रामध्ये अजून सुधारणा करण्यासाठी संशोधन करत आहे. हे अॅप तयार करण्यासाठी २५हून अधिक जणांनी मेहनत घेतली आहे. सध्या यावर १७ विद्यार्थी काम करत आहेत. मराठीव्यतिरिक्त स्वरचक्र सध्या हिंदी, गुजराती, पंजाबी, बंगाली, ओडिया, कानडी, तेलुगु आणि मल्याळम या भाषांमध्येही उपलब्ध आहे. स्वरचक्र डाऊनलोड करण्यासाठी play.google.com/store/apps/details?id=iit.android.swarachakraMarathi या लिंकलाही भेट देता येईल.
आता अँड्रॉइड फोनवर मराठी टायिपग सहज शक्य
प्रत्येक भाषेची, प्रत्येक लिपीची एक विशिष्ट बांधणी असते. मराठीची लिपी ही स्वर आणि व्यंजनांच्या रचनाबद्ध गुंफणीतून बहरते.
आणखी वाचा
First published on: 24-05-2014 at 01:43 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi typing easily possible on android phone