एकेकाळी मॉडेल म्हणून जाहिरात क्षेत्र त्याने गाजवले आहे, पण आता तो फक्त मॉडेल नाही. त्याने हिंदी, मराठी, तमिळ, तेलगू अशा प्रादेशिक चित्रपटांबरोबरच स्वीडीश, इंग्लिश चित्रपटही केले आहेत तरीही तो स्वत:ला अभिनेता म्हणवत नाही की चित्रपटक्षेत्राशी चिटकून राहणेही त्याला परवडत नाही. चाळिशीच्याही पुढे असलेल्या मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमणला सध्या वेड लागले आहे ते धावण्याचे आणि जगाला धावण्यासाठी प्रेरित करण्याचे. ‘संहिता’ या सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित चित्रपटाच्या निमित्ताने मिलिंद पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. त्यानिमित्ताने त्याच्या या कधी तळ्यात, कधी मळ्यात प्रवासाविषयी केलेली बातचीत..
‘संहिता’ चित्रपटात मिलिंदने संस्थानिकाची भूमिका केली आहे. अर्थात एखाद्या संस्थानचा राजा तोही आधुनिक काळातील राजा साकारण्यासाठी लागणारा देखणा राजबिंडा चेहरा ही सगळ्यात मूल्यवान गोष्ट अजून मिलिंदने जपलेली आहे. त्यामुळे तो या भूमिकेत चपखल बसतो. ‘हो..‘संहिता’ चित्रपटात माझी संस्थानिकाची भूमिका आहे. संस्थाने खालसा झाल्यानंतरचा काळ आणि त्या नावापुरती उरलेल्या संस्थानांमध्ये जन्मलेल्या राजाची भूमिका मी करतो आहे. मी स्वत: अशा राजांना भेटलेलो आहे. त्यामुळे त्यांचा वावर, व्यक्तिमत्त्वातला रुबाब, बोलण्या-चालण्यातली अदब या सगळ्या गोष्टी मी जवळून पाहिलेल्या आहेत. त्याचाच फायदा मला या भूमिकेसाठी झाला’, असे मिलिंदने सांगितले. ‘संहिता’ हा चित्रपट म्हणजे चित्रपटात पुन्हा एक चित्रपट सुरू असतो, अशा स्वरूपाची ही कथा आहे, मिलिंद पुढे सांगतो. एक संस्थानिक ज्याचं आपल्या पत्नीशी असलेलं नातं फार चांगलं किंवा जिव्हाळ्याचं नाही. उलट, ज्या नायकिणीकडे तो जातो तिच्यावर त्याचे जिवापाड प्रेम आहे. ही दोन परस्परविरोधी नाती एकीकडे आणि दुसरीकडे या राजावर चित्रपट करण्यासाठी आलेली एक तरुणी (देविका दफ्तरदार) राजावर संशोधन करता करता ती त्याच्या या दोन नात्यांचे संदर्भ आपल्या आयुष्यातील नात्यांशी जोडू पाहते आणि मग एकाच वेळी चित्रपटात दोन समांतर कथानकं उलगडू लागतात..अशा शब्दांत मिलिंद चित्रपटाची ‘संहिता’ मांडण्याचा प्रयत्न करतो. पण मिलिंदला पाहिल्यानंतर त्याचं मॉडेल असणं हे त्याच्यातल्या अभिनेत्यापेक्षा जास्त उठून दिसतं आणि मग नकळत प्रश्न त्याच्या सुरुवातीच्या दिवसांकडे वळतो.
मॉडेल म्हणून ज्या जाहिरात क्षेत्रात मी नाव कमावलं त्याच्याबद्दल सुरुवातीला मला एक अक्षरही माहीत नव्हतं, असं मिलिंद सांगतो. पहिली जाहिरात ही त्याने शर्टाच्या ब्रॅण्डसाठी केली होती. त्याचा गमतीदार किस्साही तो सांगतो. ‘मॉडेल म्हणून सुरुवात केल्यानंतर एक दोघेजण माझ्याकडे आले आणि त्यांनी आमच्या शर्टाची जाहिरात करणार का, असं विचारलं तेव्हा कशी करतात जाहिरात? असा उलट प्रश्न मी त्यांना केला होता. म्हणजे मला काय करायचंय त्यासाठी हा माझा पहिला प्रश्न होता. त्यांनी सांगितलं, तुला आम्ही १५-२० शर्ट्स देऊ. ते घालायचे आणि एकीकडे तुझी छायाचित्रे काढली जातील. मग तुम्ही आधी असं केलंय का, हा माझा दुसरा प्रश्न होता. आणि याचे पैसे देता का? हा माझा तिसरा प्रश्न होता. सगळ्यांची उत्तरे मिळाल्यानंतर मी मागितली ती रक्कम त्यांनी दिली. मीही शर्ट घालून दाखवले आणि अशा रीतीने माझी जाहिरात क्षेत्राची सुरुवात झाली. पण आता मात्र जाहिरात क्षेत्र इतकं सोपं उरलेलं नाही’, असेही तो कबूल करतो. मॉडेल म्हणून नाव कमावल्यानंतर तू चित्रपटही केलेस. हिंदी-मराठी, आंतरराष्ट्रीय चित्रपटही केलेस पण तू इथेही फार काळ रुळला नाहीस असं का? यावर मला चित्रपटांसाठी फारसा कोणी पाठपुरावा केला नाही आणि तीस-चाळीस दिवस एकाच चित्रपटासाठी काम करत राहणं हा माझा पिंड नाही, त्यामुळे मी स्वत:हून कोणाच्या मागे धावत राहिलो नाही, असं सरळसोट उत्तर देऊन मिलिंद मोकळा होतो. तीन तास एका जागेवर बसून चित्रपट पाहायला मला आवडत नाही. त्यामुळे कुठले चित्रपट आले-गेले याची फारशी माहितीही मला नसते. मी चित्रपट वर्तुळात फारसा वावरतही नाही. जे निर्माते-दिग्दर्शक माझ्याकडे चित्रपट घेऊन आले त्यांच्यापैकी कोणालाही मी नकार दिला नाही. सगळ्यांकडे काम केले, असे मिलिंदने सांगितले. पण निर्माता-दिग्दर्शकांच्या मागे न धावणारा मिलिंद सध्या एक उत्कृष्ट धावपटू म्हणून ओळखला जातो. तो धावण्याचे प्रशिक्षणही देतो. खरं म्हणजे, धावणे हेच त्याच्या फिटनेस आणि अजूनही तरुण दिसण्याचे रहस्य असल्याचे तो सांगतो. ३० दिवसांत दीड हजार किलोमीटर्स धावण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा आहे. ‘धावणे हे तुमच्या प्रकृतीसाठी खूप चांगले आहे. कर्करोगासारखे आजार दूर ठेवण्यासाठी धावण्याचा उपयोग होतो, हे जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हा धावणे हे माझे वेड बनले. स्त्रियांना अनेक आजारांवर मात करण्यासाठी धावण्याचा फायदा होऊ शकतो’, असे मिलिंदने सांगितले. तो सध्या धावण्याचे प्रशिक्षणही देतो. एकाच वेळी तो चार-चार वेगवेगळ्या कंपन्याही चालवतो आहे.
जेव्हा चांगला चित्रपट येईल तेव्हा तो करायचा. इतर कोणत्याही गोष्टीच्या मागे न धावता केवळ स्वत:साठी म्हणून धावत राहायचं हा वसा घेऊन वावरणारा हा देखणा मॉडेल म्हणूनच अजूनही तितकाच सुंदर दिसतो. त्याच्या या सुंदर दिसण्याला आता अनुभवातून आलेल्या शहाणपणाचंही कोंदण मिळालं आहे. मराठी ‘संहिते’मुळे त्याच्या जीवनपटाच्या आताच्या या संहितेत फारसा बदल होईल..हे खुद्द त्यालाही पटणारे नाही.

 

Story img Loader