एकूण २७१ अत्याधुनिक रुग्णवाहिका लवकरच उपलब्ध
रुग्णांना तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, याकरिता शासनाने आता ठोस पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्या अनुषंगाने शासकीय रुग्णालयांना अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त अशा खास रुग्णवाहिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत नाशिक विभागात एकूण २७१ अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहेत. प्रामुख्याने ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने रुग्णालयात नेता यावे, याकरिता रुग्णवाहिकांची व्यवस्था सक्षम करण्याच्या प्रक्रियेत काही खाजगी संस्थांचाही आधार घेण्यात येणार आहे.
ग्रामीण तसेच शहरी भागातील आरोग्य स्थिती पाहता बऱ्याचदा सरकारी सोयी-सुविधा उपलब्ध असल्या तरी त्या विषयी असणाऱ्या अनास्थेमुळे रुग्ण शासकीय सेवेचा लाभ घेण्यास फारसा उत्सुक नसतो. रुग्णाच्या मानसिकतेला ‘अपुरी वाहतूक व्यवस्था’ ही खतपाणी घालत असल्याने ग्रामीण भागातील आरोग्याच्या प्रश्नांवर नियंत्रण मिळविण्यात शासनाला यश आलेले नाही. यामुळे ग्रामीण भागात घरीच प्रसृती होणे, कुपोषण, क्षय, संसर्गजन्य आजार यांचे प्रमाण ‘जैसे थे’ आहे. आरोग्य व्यवस्थेचा भाग असलेल्या आशा किंवा अंगणवाडी सेविकांमार्फत या विषयी वेळोवेळी प्रबोधन करण्याचा प्रयत्न होत आहे. या शिवाय, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पातळीवर आरोग्याच्या गरजा भागविण्यासाठी सुविधा पुरविणे व संदर्भसेवा उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न केला जात आहे. सरकारच्या या प्रयत्नांतर्गत ग्रामीण भागातील रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने राष्ट्रीय ग्रामीण अभियानात काही उपक्रम हाती घेतले आहे. या उपक्रमांतर्गत रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी नवीन अत्याधुनिक रुग्णवाहिका ताफ्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत अत्यावश्यक सोयीसुविधा तात्काळ पुरविण्यासाठी राज्यात ९३७ रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. नाशिक विभागाचा विचार करता नाशिक, धुळे, जळगांव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांसाठी २७१ रुग्णवाहिका नव्याने उपलब्ध होणार आहे. या रुग्णवाहिकांमध्ये शासनाने खासगी संस्थांची मदत घेण्यावर भर दिला आहे. म्हणजे, एकूण रुग्णवाहिकांपैकी काही रुग्णवाहिकांसाठी शासन स्वत: निधी खर्च करणार असून उर्वरित रुग्णवाहिका खासगी संस्थांकडून भाडे तत्वावर घेतल्या जातील.
आपत्कालीन परिस्थितीत देण्यात येणाऱ्या मात्र खाजगी संस्थावर भर असलेल्या रुग्णवाहिकांमध्ये धुळे १६, जळगाव ३५, नाशिक ४६, अहमदनगर ३९, नंदुरबार १३ अशा विभागात एकूण १४९ रुग्णवाहिका उपलब्ध होतील. या सोबत शासनाकडून
नाशिकसाठी ५१, धुळे १०, जळगांव ३९, अहमदनगर १५ आणि नंदुरबारसाठी ७ अशा एकूण १२२ अत्याधुनिक रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत. रुग्णवाहिकांचा एवढा मोठा ताफा उपलब्ध झाल्यानंतर रुग्णांची आपत्कालीन परिस्थितीत वाहतूक सुसह्य होईल, अशी अपेक्षा आहे. सद्यस्थितीत म्हणजे २००८ ते ११ या कालावधीत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिकला २१, धुळे ५, जळगांव २०, नंदुरबार ३०, नाशिक २१ आणि अहमदनगर जिल्ह्यात २० रुग्णवाहिका आहेत. आता नव्याने त्यात २७१ रुग्णवाहिकांची भर पडणार आहे.
वंचित घटकांनाही मिळणार लाभ
आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ आरोग्य सेवा पुरविण्याच्या दृष्टीकोनातून या नव्या रुग्णवाहिकांची
संकल्पना मांडण्यात आली आहे. अत्याधुनिक यंत्रणा, औषधांचा पुरेसा साठा, तज्ज्ञ वैद्यकीय चमू आदींचा त्यात अंतर्भाव राहणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य परिस्थिती नियंत्रणात आणण्याबरोबर आरोग्य सेवा विकसित करून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे जीवन चक्र सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
या विशेष सेवेचा लाभ स्थलांतरित, शरीर विक्री करणाऱ्या महिला, एच.आय.व्ही. बाधित रुग्ण, अनाथ व एकटय़ा राहणाऱ्या महिला, मतिमंद व
तृतीयपंथीय या घटकांना विशेषत्वाने दिला जाईल. तसेच या माध्यमातून गंभीर रुग्णांना रुग्णालयात नेणे, प्रसुतीसमयी वेदनेच्या काळात महिलांना आरोग्य सेवेपर्यंत पोहोचविणे तसेच नियमितपणे रुग्णांची ने-आण करणे या कामांना
मुबलक रुग्णवाहिका उपलब्ध राहतील.

Story img Loader