वृत्तपत्र चालवणे हे आज व्रत न राहता त्याचा व्यवसाय होऊ पाहात आहे. त्यात चांगल्या कामाला, विचाराला प्रसिद्धीऐवजी भडक गोष्टींना प्राधान्य मिळत असून, समाजालाही ते आवडत असल्याची खंत व्यक्त करताना अशा विपरीत परिस्थितीमध्ये समाज बदलण्याचे काम वृत्तपत्रांचे असल्याने त्यासाठी वृत्तपत्रे ही व्रतपत्रे म्हणूनच चालवली गेली पाहिजेत, असे आवाहन साप्ताहिक आपले जगचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार वसंतराव आपटे यांनी केले.
कराड जिमखान्याचे संस्थापक दीपक शहा यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त दीपक स्मृती सद्भाव मेळाव्यात ‘आजची पत्रकारिता’ या विषयावर ते बोलत होते. दीपक शहा मित्रपरिवाराच्या वतीने येथील कन्या प्रशालेत पार पडलेल्या या सद्भाव मेळाव्यात येथील जागृती प्रतिष्ठानच्या संस्थापिका विजयाताई पाटील यांना वसंतराव आपटे यांच्या हस्ते दीप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. एस. व्ही. उमर्जीकर, महेंद्रकुमार शहा यांची या वेळी उपस्थिती होती.
आपटे म्हणाले, की वैद्यकीय व्यवसाय व्रत म्हणून चालत होता. तोपर्यंत ठीक होते, पण त्याचा व्यवसाय झाल्यावर चित्र बदलले. सध्या वृत्तपत्रांचेही तसेच होत आहे. एखाद्या संस्थेने किंवा व्यक्तीने केलेले कार्य समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम माध्यमांचे असून, या कार्याचे तत्त्वज्ञान, प्रयोजन, ज्ञान व त्याचा हेतू चिरंतन साध्य होतो का असा सवाल त्यांनी केला.
गेली ३४ वष्रे आपण किलरेस्करवाडीसारख्या ठिकाणी राहून ‘आपले जग’ हे साप्ताहिक व्रत्तस्थपणे चालवत असून, या कामाबद्दल आपटे यांनी समाधान व्यक्त केले. या कार्याच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाणांची दिल्लीत झालेली तासाभराची भेट, शरद पवारांची विमानात घेतलेली मुलाखत, यशवंतराव मोहितेंनी मुलाखतीवर खूश होऊन भेट दिलेले पेन, पंतप्रधान वाजपेयींच्या घरी आपल्या संपादित पुस्तकाचा झालेला प्रकाशन समारंभ अशा आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
भरवी व मधुरा किरपेकर यांच्या गीत सुमनांजलीने कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रास्ताविक डॉ. एस. व्ही. उमर्जीकर यांनी केले. विवेक ढापरे यांनी वसंतराव आपटे यांची ओळख करून दिली. कश्मिरा शहा, सुधीर एकांडे, अभय पाडळकर उपस्थित होते.

 

Story img Loader