नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युतीबाबत सन्माननीय तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली असून भाजपच्या घासाघिसीला यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नाईक साम्राज्याला धक्का देऊन कोणत्याही स्थितीत पालिकेवर भगवा फडकविण्यासाठी यावेळी कमळाबाई बरोबर समझोता करण्याच्या मनस्थितीत असणाऱ्या शिवसेनेने भाजपला ४३ जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे शिवसेना ६८ प्रभाग लढविणार असून भाजपला जादा जागा गेल्याने सेनेत बंडखोरीला उधाण येणार आहे. राष्ट्रवादीतून आलेल्या आयारामांच्या प्रभागांसाठी प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या नेत्यांबाबत सेनेत मोठय़ा प्रमाणात नाराजी पसरली असून काँग्रेस बरोबरची दोस्ती टिकविण्यासाठी सेनेने अगोदरच १० प्रभागांत कच्चे उमेदवार देण्याचा शब्द दिला आहे.
युती झाल्यानंतर पसंतीचे प्रभाग न दिल्यास भाजपचेही कार्यकर्ते काम करणार नसल्याने युतीत वरून कीर्तन आतून तमाशा असे चित्र आहे तर आघाडीत गेल्या वीस वर्षांतील विळ्या भोपळ्याचे वैर कायम ठेवण्यात आले असून काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी करण्यास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांनी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आळीमिळी गुपचिळी अशी स्थिती उमेदवारांची झाली असून निवडणुकीनंतर आघाडी करण्याचा आश्वासन दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दिले आहे. दरम्यान रिपाइंने १७ उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात राष्ट्रवादीचे कास सोडलेले रबाले येथील नगरसेवक सुधाकर सोनावणे यांचाही समावेश आहे. याशिवाय शेकाप, फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे.
नवी मुंबई पालिका निवडणुकीला आता केवळ १६ दिवस शिल्लक राहिले असून मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे हे दोन दिवस सर्व पक्षाचे उमेदवार ठरणे क्रमप्राप्त आहे. त्यात युतीचे त्रांगडे अजून सुटलेले नाही. सेना दोन पावले मागे जाण्यास तयार असून ४० टक्के जागा देण्यास तयार झाली आहे. रविवारी मुंबईतील सेनाभवनात झालेल्या संयुक्त बैठकीत ४३-६८ जागा वाटपाचे सूत्र ठरविण्यात आले आहे, पण भाजप अद्याप ४५ जागांसाठी आडून बसला आहे. हा तिढा सुटला तरी कोणते प्रभाग देणार यावर गेली बरीच दिवस चर्चा सुरू आहे. सेनेत निवडणुकीच्या तोंडावर १३ नगरसेवक राष्ट्रवादीतून आलेले आहेत. त्यांना व त्यांच्या मुलाबाळांना उमेदवारी देण्याचे आश्वासन सेनेच्या उपऱ्या नेत्यांनी दिलेले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी छातीचा कोट केला जात असून ‘त्या’ जागा सोडून बोला अशी भूमिका सेना नेत्यांनी घेतली आहे. यातील काही जागा भाजपला हव्या असून विधानसभा निवडणुकीत भाजप त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर असल्याचा हवाला दिला जात आहे. त्यामुळे सेनेची मोठी पंचाईत झाली असून भाजपला हव्या त्या जागा दिल्यास पक्षात बंडखोरी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे घडय़ाळ भिरकवून सेनेचे शिवबंधन हातावर बांधणारे हे १३ नगरसेवक स्वयंभू असून त्यांना व त्यांच्या नातेवाइकांना उमेदवार न मिळाल्यास ते शिवबंधन तोडण्यास एक क्षण देखील लावणार नाहीत. त्यामुळे सेनेचे घोडे त्यांच्या उमेदवारीसाठी अडले आहे. इतर पक्षातून आलेल्या नगरसेवकांसाठी प्रतिष्ठा पणाला लावणारे सेनेचे नेतृत्व स्वपक्षातील उमेदवारांना वाऱ्यावर सोडले असून भाजपला देण्यात आलेल्या जागांसाठी त्यांच्या उमेदवारीची आहुती देण्यात आली आहे. त्यामुळे पक्षात वर्षांनुवर्षे भगवा खांद्यावर घेऊन नाचणाऱ्या कार्यकर्त्यांत नाराजी असून या नाराजीचा स्फोट येत्या दोन दिवसांत होणार आहे. त्यात काँग्रेसबरोबर विधानसभा निवडणुकीत तयार झालेला घरोबा कायम ठेवण्यासाठी काही जागांवर छुपी युती करण्यात आल्याचा आरोप केला जात असून असे दहा प्रभाग आढळून येत आहेत.
त्यामुळे सेनेने भाजपला सोडलेल्या ४३ व काँग्रेसला मदत करण्यात येणाऱ्या १० अशा ५३ जागा अगोदरच देऊन टाकल्या असून शिल्लक ५८ जागांवर जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचे आव्हान सेनेसमोर आहे. सेना-भाजपमधील या कलहानंतर आघाडीत केव्हाच बिघाडी झालेली आहे. राष्ट्रवादीने आघाडी करण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. यात काँग्रेसमध्ये तर उमेदवारांचा तुटवडा असून राष्ट्रवादीत उमेदवारी न मिळाल्याने आणखी तीन ठिकाणी फूट पडणार आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसला सरळसरळ ठेंगा दाखविल्याने या पक्षात आळीमिळी गुपचिळी सुरू आहे. दरम्यान आरपीआयने १७ उमेदवार जाहीर केले असून फॉरवर्ड ब्लॉक पक्षाने ४५ प्रभागांची तयारी केली आहे. शेकापने यापूर्वी १२ उमेदवारांचे अर्ज भरले आहेत. त्यांची मजल ३० पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Story img Loader