‘अॅडव्हांटेज विदर्भ’पासून पर्यटन क्षेत्राला आशा
विदर्भात उद्योजकांना आकर्षितकरण्यासाठी सरकार विविध उपक्रम राबवित आहे. ‘अॅडव्हांटेज विदर्भ’ हासुद्धा सरकारने विदर्भाच्या विकासासाठी आखलेला एक उपक्रमच आहे, पण विकास जलद गतीने होण्यासाठी सरकारने एकरकमी पॅकेज द्यावे, अशी अपेक्षा महेश ट्रॅव्हल्सचे संचालक मिलिंद देशकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
कृषी, पर्यटन, आरोग्य, शिक्षण अशी विविध क्षेत्रांतील विकासाच्या योजनांसाठी सरकारकडून निधी दिला जातो, पण हा निधी टप्प्याटप्प्यात मिळत असल्यामुळे विकासाच्या योजना तातडीने पूर्ण होत नाहीत. उलट त्या रखडत असल्यामुळे त्यावरील खर्चात दिवसेंदिवस वाढच होते. सरकारने एकरकमी पॅकेज दिल्यास योजना तातडीने पूर्ण करता येतील आणि विकासाची गती निश्चितच वाढेल. ‘अॅडव्हांटेज विदर्भ’च्या निमित्ताने सरकारने विदर्भातील पर्यटन क्षेत्राच्या विकासाकडे लक्ष द्यावे, अशी आशाही देशकर यांनी व्यक्त केली.
पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी रस्तेही चांगले असणे आवश्यक आहेत. मध्यप्रदेश राज्य विदर्भाला लागूनच आहे. काही वर्षांपूर्वी रस्ते पाहून राज्याची ओळख पटायची. महाराष्ट्रातील रस्त्यांपेक्षा मध्यप्रदेशातील रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट होती. आता हे चित्र उलटे झाले आहे. विदर्भातून मध्यप्रदेशकडे जाताना रस्त्यांच्या स्थितीतील फरक पर्यटकांच्या लक्षात येतो. महाराष्ट्र शासनाने विदर्भातील पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी रस्ते चांगले करावेत. मेळघाट, सीमाडोह या सारख्या दुर्गम भागात पोहोचण्यासाठीसुद्धा चांगले रस्ते असावे. विदर्भात काही ठिकाणी प्राचीन गुहा आहेत. पुरातत्व विभागाने काही ठिकाणी उत्खनन करून प्राचीन मंदिरे शोधून काढली आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने अशा वास्तू व मंदिरांनाही मोठे महत्त्व आहे. अशा स्थळांना पुरेसा निधी देऊन त्यांचा विकास करायला हवा.
देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नागपुरात एक ‘प्लॅनेटोरियम’ उभारण्याची गरज आहे. शहरातील जुन्या तलावांचे सौंदर्यीकरण करून वॉटर स्पोर्ट्सला चालना द्यावी. ‘अॅडव्हांटेज’च्यानिमित्ताने सरकारने पर्यटन उद्योगाच्या विकासाकडे लक्ष दिले तर यातून पुरक उद्योग सुरू होतील आणि मोठय़ा प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. नव्या उद्योगांच्या उभारणीकडे लक्ष देत असताना जुने प्रकल्प पूर्ण करण्याकडेही तेवढेच गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. पर्यटकांसाठी सरकारकडून दरवर्षी ‘पुणे महोत्सव’ आयोजित करण्यात येतो, त्या प्रमाणेच ‘नागपूर महोत्सव’ आयोजित करावा. येथेही सेलिब्रिटीज्ना बोलाविल्यास पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने विदर्भात विविध ठिकाणी सव्र्हिस अपार्टमेंट्स उभारावी.
पर्यटकांच्या प्रवासासाठी वापरात येणाऱ्या मोठय़ा वाहनांवर आकारला जाणारा परिवहन कर इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त आहे. या करामध्ये तीनशेपट वाढ झाल्याने वाहतूकदार व पर्यटकांवरच त्याचा भार पडत आहे.
पर्यटन विकासासाठी वाहनांवरील परिवहन कर सरकारने कमी करावा, असे देशकर म्हणाले.
विकासासाठी एकरकमी पॅकेज हवे -मिलिंद देशकर
विदर्भात उद्योजकांना आकर्षितकरण्यासाठी सरकार विविध उपक्रम राबवित आहे. ‘अॅडव्हांटेज विदर्भ’ हासुद्धा सरकारने विदर्भाच्या विकासासाठी आखलेला एक उपक्रमच आहे, पण विकास जलद गतीने होण्यासाठी सरकारने एकरकमी पॅकेज द्यावे, अशी अपेक्षा महेश ट्रॅव्हल्सचे संचालक मिलिंद देशकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
First published on: 20-02-2013 at 04:14 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One fund package is require for development milind deshkar