घराला कुलूप लावताना अनावधानाने एखादी किरकोळ चूक होते. परंतु आपल्या घरावर बारकाईने लक्ष ठेवून असलेला एखादा भुरटा चोर त्या चुकीचा बरोबर फायदा उठवतो. अॅण्टॉप हिल येथील एका बंगल्याच्या मालकाच्या अशाच एक क्षुल्लक चुकीचा फायदा उठवत चोराने सहज घरात प्रवेश मिळवला. वर तो आला होता मोबाईल चोरायला पण उघडय़ा कपाटातील दहा लाखांचे दागिने घेऊन पसार झाला.
अॅण्टॉप हिल परिसरातील पंजाबी कॅम्प येथे एका बार मालकाचा दुमजली बंगला आहे. या बंगल्याची सुरक्षा व्यवस्था तशी कडक आहे. संपूर्ण बंगल्याभोवती उंच भिंत आणि लोखंडी मुख्य दार. त्यामुळे कुलूप तोडून आत शिरणे तसे कठीणच. पण हे मुख्य दार सकाळी ७ वाजता उघडले जाते. बंगल्यातील माणसे सकाळी बाहेर पडतात, आदी बाबी एका चोराने बरोबर हेरल्या. नजर चुकवून बंगल्यात सहज प्रवेश करता येईल, हे त्याच्या ध्यानात आले. घरमालकाची एक मुलगी बाहेर पडताच हा चोर बंगल्यात शिरला. त्याने तळमजल्यावरील दाराचे लॅच फिरवले. दार सहजच उघडले. घरमालक पलंगावर झोपला होता. त्याची दुसरी मुलगी आंघोळ करीत होती, तर पत्नी वरच्या मजल्यावरील स्वयंपाकघरात होती. वास्तविक समोर जे काही मिळेल ते उचलून पळ काढायचा, असा चोराचा डाव होता. त्याने पटकन खिडकीजवळचा ‘आयफोन’ उचलला. तो बाहेर पडणार इतक्यात त्याला कपाट उघडे दिसले. त्या उघडय़ा कपाटातील एक खणही उघडा होता. त्या खणाला चावीही तशीच होती. त्या चोराने तो खण उघडताच प्लॅस्टिकच्या डब्यातील दागिने त्याला दिसले. निघता निघता त्याला मोठेच घबाड मिळाले होते.
या बंगल्याला ‘ऑटोलॅच’ (सहसा बाथरूमला असते तसे आतून बंद करता येणारे, मात्र बाहेरून लावता न येणारे) नसते तर कदाचित चोर घरात घुसूच शकला नसता. एरवी बंगल्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करूनही छोटय़ाश्या चुकीमुळे बंगल्यात चोराने हात साफ केला होता.
पल्लवी पुरकायस्थची ‘ती’ चूक
९ ऑगस्ट २०१२ रोजी वडाळ्याच्या भक्ती पार्क संकुलातील ‘हिमालयन हाइट्स’मध्ये राहणाऱ्या पल्लवी पुरकायस्थ (२६) या तरुणीची हत्या घरात शिरलेल्या सुरक्षा रक्षकाने केली होती. बलात्काराच्या उद्देशाने तो घरात शिरला होता. पल्लवी दाराच्या बाजूला असलेल्या खिळ्याला किल्ली ठेवत होती. बऱ्याच घरांमध्ये अशाच प्रकारे किल्ल्या ठेवल्या जातात. घटनेच्या आधी सज्जाद शेख नावाच्या सुरक्षारक्षकाने वीज दुरुस्तीच्या बहाण्याने पल्लवीच्या दाराची बेल वाजवली आणि घरात गेला. तेव्हा दाराशेजारच्या खिळ्यावरील चावी त्याने काढून घेतली होती. रात्री पल्लवी झोपल्यावर याच किल्लीने दार उघडून तो घरात शिरला. पल्लवीने विरोध करताच त्याने तिची हत्या केली. ती किल्ली जर अन्यत्र, आतला एखाद्या खोलीत असती तर कदाचित पुढचा अनर्थ टळला असता.
एटीमसोबत पिन क्रमांक
दोन महिन्यांपूर्वी जे. जे. रुग्णालयात एक महिला आपल्या आईच्या तपासणीसाठी गेली होती. एक्स-रे विभागात ती आईला घेऊन गेली. प्रत्यक्ष एक्स-रे काढण्यासाठी आईला आत घेऊन जाताना तिने आपली पर्स बाहेर ठेवून इतर रुग्णांना त्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. या पर्समध्ये तिचे छोटे पाकीटही होते. थोडय़ा वेळात ती बाहेर आली तेव्हा तिची पर्स कुणीतरी लंपास केली होती. विशेष म्हणजे शोधाशोध सुरू असताना तिच्या मोबाईलवर एटीएममधून पैसे काढल्याचा मेसेजही आला. म्हणजे ज्याने बॅग चोरली त्याने त्यातील एटीएममधील पैसेही काढले होते. या महिलेने ज्या पर्समध्ये एटीएम कार्ड ठेवले होते त्यातच एका कागदावर एटीएम पिन क्रमांक लिहून ठेवला होता. चोराला ती आयतीच संधी मिळाली होती.
छोटय़ा चुका चोरांच्या पथ्यावर
घराला कुलूप लावताना अनावधानाने एखादी किरकोळ चूक होते. परंतु आपल्या घरावर बारकाईने लक्ष ठेवून असलेला एखादा भुरटा चोर त्या चुकीचा बरोबर
First published on: 27-11-2013 at 07:57 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Public small mistakes helps out to thieves