ठाणे रेल्वे स्थानकात येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाडय़ांच्या डब्यांची स्थिती दर्शवणाऱ्या पारंपरिक इंडिकेटरच्या जागी आता एलईडी स्क्रीन असलेले नवे इंडिकेटर बसवण्यात आले आहे. अशा प्रकारे हाय डेफिनेशन (एचडी) प्रणाली असलेले इंडिकेटर बसवण्याचा पहिला मान उपनगरीय मार्गावरील ठाणे स्थानकाला मिळाला आहे. भिवंडी स्थानकातही अशा प्रकारचे इंडिकेटर बसवण्यात आले आहेत. पुढील काळात ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते तुर्भे मार्गावरील रेल्वे स्थानकांमध्ये अशा प्रकारचे इंडिकेटर बसवण्यात येणार आहेत. सुस्पष्ट क्रमांक दर्शवणाऱ्या या इंडिकेटरमुळे लांबूनही प्रवाशांना गाडय़ांचा योग्य क्रमांक कळू शकणार आहे.
लाल रंगाच्या छोटय़ा दिव्यांचा समूह असलेले पारंपरिक इंडिकेटर रेल्वे स्थानकावर अनेक वर्षांपासून वापरले जात असून या जुन्या प्रणालीमुळे प्रवाशांना स्थानकावर पोहोचूनही लोकल गाडय़ांची माहिती मिळविताना अडचणींना सामोरे जावे लागायचे. या इंडिकेटरमधील एखादा दिवा जरी बंद पडला तर आकडय़ांमध्ये तफावत निर्माण होऊन प्रवाशांना आपल्या गाडीचा क्रमांक समजू शकत नव्हता. ही समस्या टाळण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची मदत घेणे गरजेचे होते.
मध्यंतरी रेल्वे प्रशासनाने ‘ट्रेन मॅनेजमेंट सिस्टिम’ योजनेचा शुभारंभ करून फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांना येणाऱ्या गाडीची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. ठाणे स्थानकात लांब पल्ल्यांच्या गाडय़ा ज्या फलाटांवर थांबतात त्या ठिकाणी नवी प्रणाली उपयोगात आणून तयार करण्यात आलेले इंडिकेटर उभारावेत, अशा स्वरूपाचा प्रस्ताव आखण्यात आला होता. त्यानुसार लाल दिव्यांच्या इंडिकेटरऐवजी एलईडी स्क्रीन असलेले आणि एचडी प्रणालीचा वापर असलेले इंडिकेटर नुकतेच या स्थानकात बसवण्यात आले आहेत.
ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ५, ६ आणि ७ या फलाटांवर हे इंडिकेटर बसवण्यात आले आहेत. लांब पल्ल्यांच्या मेल, एक्स्प्रेस गाडीचे क्रमांक, त्यांच्या डब्यांची स्थिती या इंडिकेटरवर पाहता येते. संगणकीय प्रणालीद्वारे या इंडिकेटरवर नियंत्रण ठेवण्यात येत असून इतर वेळी त्यावर फुलांचा फोटो दर्शवला जातो, अशी माहिती मध्य रेल्वेच्या तांत्रिक विभागाच्या वतीने देण्यात आली.
ट्रान्स हार्बर मार्गावरही नवे इंडिकेटर
ठाणे स्थानकात हे इंडिकेटर्स कार्यान्वित करण्यात आले असून यापुढे ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते तुर्भे दरम्यान येणाऱ्या रेल्वे स्थानकांमध्ये हे इंडिकेटर्स बसवण्यात येणार आहेत. भिवंडी स्थानकाच्या तीन फलाटांवरही हे इंडिकेटर सुरू करण्यात आले असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली. दरम्यान, पारंपरिक इंडिकेटरवर झळकणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे प्रवाशांना रोजचा मनस्ताप सहन करावा लागत असून जुनी प्रणाली पूर्णपणे कालबाह्य़ झाली असून ती वापरातूनही काढून टाकण्याची गरज आहे, अशी मागणी प्रवासी संघटनांच्या वतीने पुढे येऊ लागली आहे. रेल्वेने या नव्या इंडिकेटरचा वापर उपनगरीय रेल्वे मार्गावर करावा, त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होऊन त्यांना गाडय़ांची योग्य माहिती मिळू शकेल, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे.
इंडिकेटर आणि डब्यांमधील घोळ थांबवा..
डिजिटल इंडिकेटर्स बसवल्यामुळे प्रवाशांना चांगली सुविधा मिळू शकत असली तरी या इंडिकेटरनी दर्शवलेल्या जागीच गाडीचे डबे आले तर प्रवाशांना आणखी सोयीचे होईल. अनेक वेळा इंडिकेटरमध्ये दर्शवलेली डब्याची स्थिती आणि प्रत्यक्ष आलेला डबा यांच्यात मोठी तफावत असते. असे घोळ वारंवार रेल्वे प्रशासनाच्या वतीने केले जात असून हा घोळ थांबल्यास प्रवास अधिक सुखाचा होईल, असे मत कोकण रेल्वे प्रवासी संघाचे दर्शन कासले यांनी मांडले आहे.