जेएनपीटी बंदरातील अवजड वाहने तसेच प्रवासी वाहतुकीसाठी असलेल्या करळ पूल रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. तीन वर्षांपूर्वी या पुलाच्या दुरुस्तीपोटी कोटय़वधी खर्च करण्यात आले, परंतु खड्डय़ांमुळे या पुलाच्या रस्त्याची चाळण झाली आहे. खड्डय़ामुळे जड वाहनांच्या अपघाताच्या धोक्यासह वाहनचालकांसह प्रवाशांना पुलावरील वाहतूक कोंडीचाही त्रास सहन करावा लागत आहे.
करळ पुलावरील रस्त्यांवरील खड्डय़ांविरोधात चार वर्षांपूर्वी येथील अनेक राजकीय व सामाजिक संस्थांनी आंदोलन केलेले होते. त्यामुळे जेएनपीटीने २०१२ साली दहा ते बारा कोटींचे पुलाच्या रस्ता दुरुस्तीचे काम केले होते. त्यानंतर दरवर्षी पुलाच्या रस्त्यावर खड्डे पडण्याचे प्रमाण वाढत आहे. पुलाच्या दुरुस्तीनंतर पुलावरील खड्डे भरण्यासाठी मे महिन्यातच आधुनिक तंत्राचा वापर करून पुलावरील संपूर्ण थर काढून रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले होते. पुलावरील वाढत्या वाहनांमुळे पुलाचे नुकसान होऊ नये म्हणून पुलाचे मजबुतीकरण करण्यात आले होते. मात्र तरीही अवघ्या काही महिन्यांतच खड्डे पडल्याने नागरिकांकडून याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. या संदर्भात जेएनपीटीचे सार्वजनिक विभागाचे मुख्य व्यवस्थापक ए. जी. लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता कंत्राटदारावर रस्ता दुरुस्तीचे तीन वर्षांची जबाबदारी आहे. खड्डे भरण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader