हलक्या वाहनांकडून टोल वसुल करता यावा यासाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या सायन पनवेल टोलवेज कंपनीच्या सायन पनवेल या नव्या कोऱ्या रस्त्यावरील खड्डे जैसे थे असून दोन दिवस मिळालेल्या पावसातही हे खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना ही खड्डे चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
भाजपा सरकारने राज्यातील ५३ टोलनाक्यावरील टोल वसुली बंद केली असून त्यात सायन पनवेल महामार्गाचा समावेश आहे. ह्य़ा नाक्यावर टोलमुक्ती मिळावी यासाठी विविध पक्षांनी आंदोलने केलेली आहेत. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी तर चक्क आमदारकीचा राजिनामा दिला होता. त्यामुळे हा टोलनाक राज्यात अधिक चर्चेला आला. या टोलनाक्यावर हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळाली आहे. सायन पनवेल महामार्गावरील रुंदीकरण व सिमेंट क्रॉक्रिटीकरणावर बाराशे कोटी रुपये पेक्षा जास्त खर्च झाला असून या प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या कर्जाचे हप्त्यांची देखील वसुली होत नसल्याची बाब पुडे करुन टोलकंपनी न्यायालयात गेली आहे. त्यांचा न्यायालयीन लढा सुरु असताना टोल भरणाऱ्या जड वाहनांना या मार्गावरील खड्डयांचा सामना करावा लागत आहे. हलक्या वाहनांना टोलमुक्ती दिल्याने ह्य़ा रस्त्याला कोणी वाली राहिलेला नसून दुरुस्ती करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे बेलापूर खिंडीतील उड्डाणपूलावर पडलेल्या खड्डयामुळे सुसाट वेगात आलेल्या वाहनांना करकचून ब्रेक मारावे लागत आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून अपघातांची देखील शक्यता निर्माण झाली आहे. हीच स्थिती इतर उड्डाणपूलावरील आहे. संततधार पडणाऱ्या पावसाने दोन दिवस थोडीशी उघडीप घेतली होती. त्यावेळी इतरत्र रस्ता कंत्राटदारांनी खड्डे भरण्याचे काम केलेले आहे पण या मार्गावर ही काम टाळण्यात आले असल्याचे दिसून येते.

सायन पनवेल महामार्गावरील उड्डाणपूलांची कामे सायन पनवेल टोलवेज कंपनीने केलेली नाहीत. त्यामुळे त्यावरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी आमची नाही. याव्यातिरिक्त सायन पनवेल मार्गावरील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम कंपनीचे दोन युनिट करीत असून पाऊस थांबल्यानंतर ही कामे केली जात आहेत.
विजेयेंद्र भावसार, जनसंर्पक अधिकारी, सायन पनवेल टोलवेज

Story img Loader