नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिसरामध्ये राहणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी कडक धोरण अवलंबिले आहे. त्याची सुरुवात कामोठे परिसरापासून सुरू झाली आहे. सुषमा पाटील विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या बैठकीत एकाकी राहणाऱ्या २० ज्येष्ठ नागरिकांना सूचना वही देण्यात आली. दररोज एक पोलीस या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणार असून, त्यांची विचारपूस करणार असल्याचे कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार यांनी जाहीर केले.
कामोठे येथील बैठकीमध्ये नालंदा ज्येष्ठ नागरिक संघ आणि ज्येष्ठ नागरिक संस्था या दोनही ज्येष्ठांच्या संघटनांमधील सदस्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी जेष्ठ नागरिकांनी त्यांच्या समस्या व सूचना येथे मांडल्या. कामोठे परिसरात रस्त्याकडेला दुचाकी व चारचाकी मोटारी उचलणारे वाहतूक पोलीस दिसतात, मात्र पदपथावर फेरीवाल्यांना आणि रस्त्यातील फेरीवाल्यांना हाकलणारे पोलीस दिसत नसल्याची खंत यावेळी ज्येष्ठांनी व्यक्त केली. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे ज्येष्ठांना रस्त्याच्या मधोमध चालावे लागते. त्यामुळेच अनेक अपघात होतात असे ज्येष्ठ नागरिक म्हणाले. सिडकोने किमान फेरीवाल्यांच्या जागी पदपथावर बसण्याचे बाक लावावे अशाही सूचना यावेळी ज्येष्ठांनी मांडल्या. सिडकोने कामोठे येथे एकही सार्वजनिक शौचालय न सुरू केल्याने ज्येष्ठांना लघुशंकेची गैरसोय होते. ज्येष्ठ नागरिकांना अनेक आरोग्याच्या समस्या आहेत, त्यामध्ये लघुशंका थांबविल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते, त्यामुळे सिडकोने तातडीने यावर उपाय करावा अशा समस्या या बैठकीत मांडण्यात आल्या. सिडकोकडे विरंगुळा केंद्राची मागणी केली आहे. त्यावर पोलिसांनी पाठपुरावा करून हे विरंगुळा केंद्र लवकर उभे राहण्यासाठी सिडको दरबारी प्रयत्न करावेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या विरोधात एखादी तक्रार आल्यास त्यावर खात्री करूनच ती तक्रार पोलीस ठाण्यात नोंद करावी, असे विविध विचार या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांनी मांडले. पोलीस अधिकारी मुल्लेमवार यांनी या बैठकीमध्ये ज्येष्ठांसाठी कामोठय़ातील पोलीस सज्ज असल्याचे सांगून, हे शहर सुरक्षित असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.
ज्येष्ठांची हेल्पलाइन बंद
नवी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाइन क्रमांक १८००२००२१२२ सुरू केली होती. त्यावर तक्रारी येत होत्या. मात्र आजमितीला ही हेल्पलाइन बंद आहे. आयुक्त अहमद यांच्या बदलीनंतर ज्येष्ठांच्या सुरक्षेला तेवढे प्राधान्य दिले गेले नाही. आयुक्त रंजन यांनी ज्येष्ठांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडल्याने पुन्हा एकदा पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. त्यामुळे जुन्या ज्येष्ठांच्या हेल्पलाइन क्रमांकाची आठवण पोलीस यंत्रणेला झाली. सध्या नवी मुंबई पोलिसांच्या शंभर (१००) क्रमांकाव्यतिरिक्त ७७३८३९३८३९, ७७३८३६३८३६ हे हेल्पलाइन क्रमांक सुरू आहेत.