मराठी चित्रपटसंगीतात सुरेश वाडकर, रविंद्र साठे आणि श्रीधर फडके ही तिन्ही नावे ऐकली की त्यांच्या सुमधूर गाण्यांची भली मोठी यादी आपल्यासमोर येते. मग त्यांची गाणी ऐकल्याशिवाय रसिक श्रोत्याला चैन पडत नाही. या तिन्ही गायकांच्या बहारदार गाण्यांच्या मैफिलीचा आस्वाद घेण्याची संधी ‘अथर्व मल्टिक्रिएशन्स’ आणि ‘लोकसत्ता’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सुरश्री या कार्यक्रमाच्या निमित्ताने रसिकांना मिळाली. प्रभादेवीतील रविंद्र नाट्यमंदिराच्या रंगमंचावर संगीतातील हे तीन दिग्गज एकत्र आले. आणि अर्थातच, मैफलीला शुभारंभ झाला तो बाबूजींनी स्वरबध्द केलेल्या ‘गुरू एक जगी त्राता’ या गाण्याने. सुरेश वाडकरांनी हे गाणे गाऊन सुरूवातीलाच मैफिलीला जमलेल्या रसिकांच्या मनाची पकड घेतली. त्यानंतर प्रभाकर जोग यांची रचना असलेले ‘कोटी कोटी रुपे तुझी’, श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेले ‘काळ देहासी आला खाऊ’ आणि अशोक पत्कींच्या संगीताने नटलेले ‘तू सप्तसूर माझे’ अशी एकापाठोपाठ एक गाणी सादर केली आणि रसिक मंत्रमुग्ध झाले. त्याच भारलेल्या वातावरणात रविन्द्र साठे यांनी आपल्या भारदस्त आवाजात ‘कुणाच्या खांद्यावर’ आणि ‘आम्ही ठाकर ठाकर’ ही गाणी सादर केली. तर पाठोपाठ यशवंत देव यांची रचना असलेले ‘काही बोलायाचे आहे’ आणि ‘मन मनास उमगत नाही’ ही गाणी सादर करून श्रीधर फडकेंनी संपूर्ण वातावरण सूरमयी करून सोडले. एकमेकांची थट्टामस्करी करत, कौतूक करत तिन्ही गायक सुरांची ही मैफल उत्तरोत्त रंगवत नेत असतानाच संगीतकार अशोक पत्की यांचे आगमन झाले. अशोक पत्की यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘लोकसत्ता’चे महेश ठाकूर, ‘स्टेट बॅंक ऑफ इंडिया’चे नंदकिशोर मुळ्ये आणि ‘इंडियन ऑयल’चे श्रीकांत बापट यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन अशोक पत्की यांचा सत्कार करण्यात आला. श्रीधर फडके यांनी गायलेल्या ‘मना घडवी संस्कार’ आणि ‘येई वो विठ्ठले’ या संत नामदेवांच्या अभंगाच्या सूरांनी वातावरण निनादून गेले. अभंग गाता गाता सुरू झालेल्या पांडुरंगाच्या गजरातच सुरांनी रंगलेल्या या मैफिलीची सांगता झाली.  

Story img Loader