क्रांतिकारकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि देशभरातील क्रांतिकारक यांच्या जीवनचरित्रावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे स्मृती संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयाच्या निधी संकलनासाठी प्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस यांनी एक अनोखा उपक्रम राबवायचे ठरवले आहे. जी व्यक्ती या संग्रहालयासाठी एक हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देईल, त्याचे अर्कचित्र स्वत: सबनीस काढून देणार आहेत.
स्मारकातर्फे सशस्त्र क्रांतिकारकांचे संग्रहालय, अंदमान येथील कोलू आणि सावरकर यांना येथे ज्या कोठडीत ठेवण्यात आले होते, त्याची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. सावरकर स्मारकाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक ती माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. देश-विदेशातील अभ्यासकांना याचा उपयोग व्हावा आणि आजच्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांची व देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांची ओळख व्हावी, या संग्रहालयापासून त्यांना प्रेरणा मिळावी, असा उद्देशा हे संग्रहालय उभारण्यामागे आहे.
संग्रहालयाठी निधी उभारण्याकरिता वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून व्यंगचित्रकार सबनीस यांनी हा अनोखा प्रयोग करण्याचे ठरविले आहे. येत्या २४ मार्च रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम) येथे सकाळी ११ ते २ आणि दुपारी ४ ते ७ या वेळेत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सबनीस हे या ठिकाणी देणगी देणाऱ्याचे अर्कचित्र काढून देणार आहेत. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे आणि सावरकर स्मृती संग्रहालयासाठी मोठय़ा प्रमाणात आर्थिक मदत करावी, असे आवाहन स्मारकाने केले आहे.
सावरकर स्मृती संग्रहालयाच्या निधी संकलनासाठी व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचा अनोखा उपक्रम
क्रांतिकारकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि देशभरातील क्रांतिकारक यांच्या जीवनचरित्रावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे स्मृती संग्रहालय उभारण्यात येणार आहे.
First published on: 18-03-2013 at 11:42 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unique project from vikas sabnis for raising fund to build savarkar memorial