पुणे-मुंबई महामार्गावर अनेक वर्षांपासून ट्रकमधून स्टील व लोखंडाची चोरी करणाऱ्या टोळीस गजाआड करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. ग्रामीण पोलिसांच्या दोन पथकांनी शुक्रवारी पहाटे वरसोली व कान्हे फाटा येथील गोदामावर छापा टाकून तब्बल दोन ट्रकसह १८ लाखांचे चोरीचे स्टील जप्त केले. या ठिकाणी २७ ट्रकची तपासणी करून व्यापारी, चालक व इतर सहभागी असणाऱ्या ३९ जणांस अटक केली आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांना खबऱ्यामार्फत पुणे-मुंबई महामार्गावर ट्रक मधील स्टील चोरून तेवढय़ा वजनाची माती ट्रकमध्ये ठेवली जाते व यामध्ये ट्रक चालक सुद्धा सामील असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार लोहिया यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि संतोष पाटील यांची दोन पथके तयार केली.  मिळालेल्या माहितीनुसार पहाटे चारच्या सुमारास लोणावळ्याजवळील वरसोली येथे एका भंगाराच्या गोदामावर तर कान्हे फाटय़ाजवळील साई ढाब्याजवळील भंगाराच्या गोदामावर छापा टाकला.  या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात दोन लाख तीस हजार रुपयांचे स्टील जप्त करण्यात आले असून या ठिकाणाहून आठरा जणांस अटक करण्यात आली आहे. यामध्ये पवन कैलास सिंग (वय ३०) हरिहर रामदेव यादव (वय ५०) आणि फैईम अमीर खान या तीन व्यापाऱ्यांसह चौदा ट्रकच्या चालक व क्लिनर अशा १८ जणांस अटक केले आहे. या चोरीप्रकरणातील आरोपी दीपचंद प्रजापतीसह तिघे जण फरार आहेत.  या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील कान्हेफाटा येथील साईप्रसाद धाब्याच्या जवळील भंगाराच्या गोडाऊनमध्ये १३ ट्रकच्या चालक व क्लिनरसह २१ जणांस अटक करण्यात आली आहे. या ठिकाणाहून १५ लाख ६७ हजार रूपयांचे स्टील जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली. ट्रक चालकांच्या संमतीने ट्रकमधील काही माल हे व्यापारी विकत घेतात. ज्या ठिकाणी हा माल उतरवावयाचा आहे, त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना बोलवून हा माल विकला जात असे. गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. या कारवाईबाबत ग्रामीण पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती. स्थानिक पोलिसांना देखील याची माहिती देण्यात आली नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.    

Story img Loader