हवाई दलाच्या प्रमुखपदी १९७३ ते १९७६ अशा- शांततेच्याच काळात राहिलेले एअर चीफ मार्शल ओमप्रकाश मेहरा यांनी महाराष्ट्राचे राज्यपालपदही १९८० ते १९८२ या (प्रामुख्याने अ. र. अंतुले मुख्यमंत्री असतानाच्या) काळात भूषविले होते आणि त्यानंतर राजस्थानच्या राज्यपाल पदावर ते १९८५ पर्यंत होते. वयाच्या ९६ व्या वर्षी, सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाल्याच्या बातमीनंतर राष्ट्रपती व पंतप्रधानांपासून अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिल्याच्या बातम्या आल्या. पंतप्रधानांनी तर ‘ते देशभक्त होते’ हेही अधोरेखित केले; परंतु एअर चीफ मार्शल मेहरा यांची ओळख अपुरीच राहिली..

फाळणीपूर्व पंजाबात, लाहोरमध्ये त्यांचा जन्म झाला. पदवीचे शिक्षण लाहोर महाविद्यालयातून तर इतिहास या विषयातील पदव्युत्तर पदवी पंजाब विद्यापीठातून घेतल्यानंतर वयाच्या एकविसाव्या वर्षी- ३० नोव्हेंबर १९४० रोजी तेव्हाच्या ब्रिटिश हवाई दलात ते दाखल झाले. वाल्टन आणि अंबाला येथे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मेहरा यांना १९४२ साली पहिली जबाबदारी मिळाली ती थेट पूर्वेकडे- तेव्हाच्या ब्रह्मदेशात. दुसऱ्या महायुद्धात, जपान्यांच्या फौजांनी हा प्रदेश बुजबुजून जात असताना मेहरा ‘स्क्वाड्रन क्र. ३’ मधील युद्धवैमानिक होते. साहजिकच, अगदी दीड-दोन वर्षांतच त्यांनी सर्व तऱ्हेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरे चालविली. उड्डाणाचे ४००० तास त्यांनी १९४६ मध्ये पूर्ण केले होते आणि ‘स्क्वाड्रन क्र. ३’चे प्रमुख (कमांडंट) पदही त्याच वर्षी मिळवले होते. हा अनुभव पाहून, हवाई प्रशिक्षण केंद्रात त्यांना प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले आणि स्वातंत्र्यानंतरही, ‘भारतीय हवाई दला’साठी वैमानिक घडविण्याचे काम त्यांनी १९५४ पर्यंत केले. १९५८ ते ६० या काळात त्यांना हवाई प्रशिक्षण केंद्रांच्या सामाईक ‘लढाऊ सामग्री संशोधन विभागा’च्या प्रमुखपदाची जबाबदारी मिळाली. पुढे १९६७ पासून केंद्रीय मुख्यालयात, लढाऊ हवाई सामग्री देखभाल (मेंटेनन्स) विभागाचे प्रमुखपद सांभाळताना, आपल्या जुन्या विमानांनाही युद्धसज्ज ठेवण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत फळास आली. यामुळेच, १९६८ साली ‘परम विशिष्ट सेवा पदक’ त्यांना देण्यात आले.

हवाई दलाचे उपप्रमुखपद त्यांच्याकडे १९७१ मध्ये आले. यथावकाश हवाईदल प्रमुखपदी आल्यावर, निवृत्तीनंतरच्या पुढल्याच वर्षी (१९७७) ‘पद्मविभूषण’ किताबही त्यांना मिळाला होता. मेहरा ऑलिम्पिक असोसिएशन आणि आशियाई खेळ महासंघ या संघटनांचे प्रमुख होते. अगदी अलीकडे, २०१२ मध्ये लाहोरच्या पंजाब विद्यापीठाने ‘सर्वात ज्येष्ठ माजी विद्यार्थी’ म्हणून त्यांना सत्काराचे निमंत्रण दिले, ते प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी नाकारले होते.

Story img Loader