काही मालिकांची लोकप्रियता इतकी असते की या मालिका प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्यातील एक भाग बनतात. या मालिकांपैकीच एक म्हणजे झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘शिवा’ ही मालिका आहे. कणखर, धाडसी, मुलांसारखी वेशभूषा करणारी, कुटुंबाला सांभाळणारी, प्रसंगी मारामारी करणारी, तितकीच प्रेमळ, निस्वार्थपणे मदत करणारी, आशूवर जीवापाड प्रेम करणारी अशी ही शिवा आज घराघरांत पोहोचली आहे. दुसरीकडे थोडासा लाजरा, आईचा लाडका, संवेदनशील असा हा आशू प्रेक्षकांच्या लाडक्या पात्रापैकी एक आहे. मालिकेत शिवा ही भूमिका पूर्वा कौशिकने साकारली असून आशूच्या भूमिकेत शाल्व किंजवडेकर दिसत आहे. आता या मालिकेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्ताने अभिनेत्री पूर्वा कौशिकने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाली पूर्वा कौशिक?

अभिनेत्री पूर्वा कौशिकने ‘शिवा’ या मालिकेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. तिने शिवाच्या लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने लिहिले, “शिवा – एक वर्ष पूर्ण! अगदी कालच पहिल्या एपिसोडची धडधड होती. पहिल्या सीनसाठी तयारी करताना मनात उत्सुकता आणि टेन्शन दोन्ही होतं, पण बघता बघता शिवाला एक वर्ष पूर्ण झालं. हा प्रवास फक्त एक भूमिका साकारण्याचा नव्हता, तर एका वेगळ्या विश्वाचा अनुभव घेण्याचा होता. धैर्य, आत्मविश्वास आणि स्वतःवर ठाम राहण्याची ताकद, शिवाने मला खूप काही शिकवलं. तिच्या प्रत्येक संघर्षात मी स्वतःला शोधलं, तिच्या हसण्यात मी आनंद अनुभवला आणि तिच्या अश्रूंमध्ये मी नकळत गुंतत गेले.”

पुढे चाहत्यांना संबोधत अभिनेत्रीने लिहिले, “हा प्रवास तुमच्या प्रेमामुळे इतका सुंदर झाला. प्रत्येक मेसेज, प्रत्येक कमेंट आणि तुम्ही दिलेला पाठिंबा; सगळंच मनापासून स्पेशल वाटतं. तुमच्या या निःस्वार्थ प्रेमाशिवाय हे शक्यच नव्हतं, धन्यवाद आणि प्रेम”, असे म्हणत पूर्वाने चाहत्यांचे कौतुक केले आहे.

‘शिवा’ मालिकेत शिवा व आशूबरोबरच, पाना गँग, भाऊ, सिताई, दिव्या, कीर्ती, मांज्या, बाई आजी, आशूचे काका-काकू, शिवाची आई, दिव्याचा पती अशी सर्वच पात्रे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतात. सध्या मालिकेत आशूने शिवाविषयीचे प्रेम सर्वांसमोर व्यक्त केले. त्यानंतर सिताईने शिवाला घरात येण्यास मनाई केली. तेव्हा आशूने शिवाबरोबर दुसरीकडे राहण्याचा निर्णय घेतला. सध्या आशू स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी धडपडत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता आशूला त्याच्या प्रयत्नांमध्ये यश मिळणार का? सिताई शिवाला सून म्हणून कधी स्वीकारणार? मालिकेत पुढे कोणते ट्विस्ट येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.