रशिया-युक्रेन युद्धाला १ हजार दिवस उलटून गेले असताना रशियाने प्रथमच मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिका-युरोपने युक्रेनला दिलेली लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे थेट मॉस्कोच्या उपनगरांपर्यंत पोहोचल्यानंतर रशियाने युक्रेनचा दनिप्रो शहरातील लष्करी तळावर आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा मारा केला. हा केवळ युक्रेन नव्हे, तर त्यापलिकडे वसलेल्या ‘नेटो’ राष्ट्रांना दिलेला गर्भित इशारा आहे का? या हल्ल्यामुळे युरोपला अधिक सावध होणे गरजेचे आहे का? बायडेन प्रशासनाच्या अखेरच्या दोन महिन्यांत अमेरिकेची भूमिका किती महत्त्वाची आहे, अशा काही प्रश्नांचा हा आढावा.

क्षेपणास्त्रांबाबत युरोपमध्ये संभ्रम का?

अमेरिकेने लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची अनुमती दिल्यानंतर युक्रेनने रशियाच्या भूमीत आतपर्यंत हल्ले चढविण्यास सुरुवात केली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून पुतिन यांनी सर्वप्रथम आपले अण्वस्त्र वापराचे धोरण लवचिक केले. त्यानंतर लगेचच मध्य युक्रेनमधील दनिप्रो शहरावर मोठा क्षेपणास्त्र हल्ला झाला. युक्रेनची क्षेपणास्त्रविरोधी प्रणाली भेदून आलेली ही क्षेपणास्त्रे नेहमीची नाहीत, हे लक्षात आल्यावर ती नेमकी कोणत्या प्रकारची आहेत, आंतरखंडीय आहेत का आदी चर्चा युरोपीय देशांमध्ये सुरू झाली. मात्र कधी नव्हे ते पुतिन स्वत: रशियाच्या वृत्तवाहिनीवर आले आणि त्यांनी संभ्रम दूर केला. दनिप्रोवर अत्याधुनिक आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रेच डागण्यात आल्याचे रशियाच्या अध्यक्षांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. ध्वनीच्या १० पट वेग असलेल्या या क्षेपणास्त्रांना जगात सध्या अस्तित्वात असलेली किंवा युरोप-अमेरिकेने तयार केलेली कोणतीही हवाई संरक्षण प्रणाली रोखू शकत नाही, असा सज्जड दम पुतिन यांनी अत्यंत थंडपणे दिला. या क्षेपणास्त्राचे नाव ‘ओरेश्निक’ असलेल्याचे पुतिन यांनी आपल्या दूरचित्रवाणी संदेशात सांगितले. या रशियन शब्दाचा अर्थ आहे ‘हेझलनट’चे (डोंगरी बदाम) झाड. अमेरिकेने याच प्रकारची क्षेपणास्त्रे युरोपमध्ये तैनात केल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने ओरेश्निक विकसित केले असून त्याची पहिली ‘सामरिक चाचणी’ अत्यंत यशस्वी झाल्याचे पुतिन यांनी गुरुवारच्या संदेशात स्पष्ट केले.

ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Pakistan professor claims India is developing Surya missile
अर्धी पृथ्वी टप्प्यात येईल असे ‘सूर्या’ क्षेपणास्त्र भारताकडे खरेच आहे का? पाकिस्तानी तज्ज्ञाचा दावा काय?
reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
butter theft in russia amid ukrain war
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?
ukraine israel war increase carbon emissions
युक्रेन, इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ
sex ministry in russia
‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?
Vladimir putin Narendra Modi Reuters
Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”

हेही वाचा : विश्लेषण : दिल्लीतील भीषण प्रदूषणास बाजूच्या राज्यांतील शेती कशी कारणीभूत? कृषी कचरा जाळण्याची गरज तेथील शेतकऱ्यांना भासते?

या क्षेपणास्त्राची वैशिष्टे काय?

पुतिन यांनी केलेल्या दाव्यानुसार ही क्षेपणास्त्रे माक १० (ध्वनीपेक्षा दहापट अधिक वेगवान) प्रकारातील आहेत. मध्यम-श्रेणीच्या या क्षेपणास्त्रांचा पल्ला ५०० ते ५,५०० किलोमीटर असल्याचे सांगितले जाते. युक्रेन लष्कराच्या म्हणण्यानुसार दनिप्रोवर डागलेली क्षेपणास्त्रे कॅस्पियन समुद्रातील अस्त्राखान या रशियाच्या ताब्यातील प्रदेशातून साधारणत: ८०० किलमीटरवरून डागण्यात आली होती. नेहमीपेक्षा अधिक वजनाची पारंपरिक स्फोटके (पेलोड) आणि अण्वस्त्रे वाहून नेण्याची या क्षेपणास्त्रांची क्षमता आहे. रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूटचे लष्करी विज्ञान संचालक मॅथ्यू सॅव्हिल यांच्या मते अशा प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा रणांगणावर प्रथमच वापर झाला असावा. क्रूझ क्षेपणास्त्रे किंवा कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपेक्षा याची अचूकता कमी असली, तरी प्रचंड वेग आणि एकापेक्षा अधिक वॉरहेड सोडण्याची त्यांची क्षमता त्यांना अधिक घातक बनवते. पुतिन यांच्या ही क्षेपणास्त्रे अभेद्य असल्याच्या दाव्यातही तथ्य असल्याचे सॅव्हिल यांचे म्हणणे आहे.

‘पश्चिमे’ला रशियाची कोणती धमकी?

युक्रेनने डागलेल्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी ब्रायन्स्क आणि कुर्क्स या रशियातील प्रदेशांमध्ये काही सैनिक मारले गेले होते. याला प्रत्युत्तर म्हणून पुतिन यांनी ओरेश्निकचा वापर केला. युक्रेनने युरोप-अमेरिकेची शस्त्रे वापरणे म्हणजे रशिया आणि ‘नेटो’मधले युद्ध मानले जाईल, असा इशारा पुतिन यांनी पूर्वीच दिला होता. आमच्याविरोधात शस्त्रे वापरण्यास परवानगी देणाऱ्या देशांना योग्य ते उत्तर देण्याचा आम्हाला अधिकार आहे, हे त्यांचे तेव्हाचे शब्द होते. रशियाने दनिप्रोवर डागलेली क्षेपणास्त्रे म्हणजे या इशाऱ्याची पहिली कृती असल्याचे मानले जात आहे. “तुमच्या आवाक्याबाहेर असलेल्या गोष्टी (पक्षी क्षेपणास्त्रे) आम्ही पाठवू शकतो. मध्यम श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र स्पर्धेत आम्ही आनंदाने उतरू आणि हो.. यावर अण्वस्त्रेही असू शकतात,” अशी अलिखित धमकी रशियाने संपूर्ण युरोपला दिली असल्यावर बहुतांश अभ्यासकांचे एकमत आहे. ‘नेटो’ला आणखी खिजवत रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपसचिव दिमित्री मेद्वेदेव यांनी युक्रेनवरील क्षेपणास्त्र हल्ल्याची दृश्यफीत ‘एक्स’ समाजमाध्यमावर जारी केली. त्याबरोबर ‘तर… तुम्हाला तेच हवे होते ना? तर घ्या. तुम्हाला हवे ते मिळाले आहे. हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा हल्ला…’ असा संदेशही मेद्वेदेव यांनी लिहिला आहे.

हेही वाचा :Volkswagen: अ‍ॅडॉल्फ हिटलरने स्वप्नपूर्तीसाठी ‘फोक्सवॅगन’ गाडीला आकार का दिला?

युक्रेन, युरोपची प्रतिक्रिया काय?

या हल्ल्यानंतर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की म्हणाले की, रशिया आपल्या क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यासाठी युक्रेनच्या भूमीचा वापर करीत आहे. आपल्या भाषणात त्यांनी रशियाचा उल्लेख वेडा, स्वातंत्र्य न मानणारा, घाबरलेला असा केला. अमेरिकेतील दोन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी नावे गुप्त ठेवण्याच्या अटीवर दावा केला की रशियाकडे सध्यातरी या प्रकारची केवळ काही प्रायोगिक तत्त्वावर तयार केलेली क्षेपणास्त्रे आहेत. त्यामुळे युक्रेन किंवा इतर कोणाविरोधात त्यांचा सातत्याने वापर होण्याची शक्यता नाही. मात्र अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री जॉन हॅले यांनी युक्रेन युद्धातील हा नाजूक काळ असल्याचे म्हटले आहे. येत्या दोन महिन्यांत अमेरिकेमध्ये महत्त्वाचे सत्तांतर होणार असून पुतिन यांचे ‘मित्र’ डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे सत्तासूत्रे जाणार आहेत. त्यानंतर ट्रम्प काय करतील, याची काहीच शाश्वती नाही. तोपर्यंत ‘नेटो’ आणि रशियामध्ये सुरू झालेले हे नवे ‘धमकीयुद्ध’ अधिक गंभीर रूप धारण करण्याची शक्यता दिसत नसली, तरी त्यांच्याइतकेच बभरोशी पुतिन काय करतील, याचाही कुणाला शाश्वती नाही.

amol.paranjpe@expressindia.com