सध्या सगळीकडे लग्नसराईचा हंगाम सुरू असून लग्नातील हळदी समारंभ हा सर्वात खास आणि धमाल समारंभ असतो. याच धमाल वातावरणात, ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटातील ‘यल्लो यल्लो’ गाणं एक नवा रंग घेऊन आलं आहे. नुकताच दाभाडे कुटुंबियांच्या घरातील हळदी सोहळा मोठ्या दणक्यात पार पडला. यानिमित्ताने ‘यल्लो यल्लो’ हे हळदीचं खास गाणंही प्रदर्शित करण्यात आलं. या सोहळ्यात दाभाडे कुटुंबाने एकत्र येऊन विविध खेळ खेळत सोनू आणि कोमलचा हळदी समारंभ अगदी थाटामाटात साजरा केला. या हळदी समारंभाला हेमंत ढोमे, क्षिती जोग, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, निवेदिता सराफ, हरीश दुधाडे, राजन भिसे आणि राजसी भावे उपस्थित होते. ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटातील ‘यल्लो यल्लो’ या गाण्याला अमितराज यांचे संगीत लाभले आहे. गाण्याचे बोल क्षितिज पटवर्धन यांचे असून नकाश अझीझ यांचा आवाज आहे. चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार म्हणतात, ‘हे गाणं म्हणजे तुमच्या आमच्या घरातील लग्नातलं चित्रण आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षक स्वत:मध्ये कुठेतरी शोधतील. प्रत्येकाला ठेका धरायला लावणारं हे गाणं आहे.’
निर्माते आनंद एल राय म्हणतात, ‘हळदीसारखा एक धमाल कार्यक्रमाचा आनंद ‘यल्लो यल्लो’ गाण्यात पाहायला मिळेल. दाभाडे कुटुंबातील हळदी समारंभाची मस्ती, प्रेम आणि नात्यांची मुरलेली गोडी या गाण्यात उत्तमरित्या दाखवण्यात आली आहे’. तर दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या हळदी सोहळ्याची धमाल ‘यल्लो यल्लो’ गाण्यात पाहायाला मिळणार असल्याचं सांगितलं. २४ जानेवारी २०२५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.