उर्दू ही अदबशीर, नाजूक आणि नादमय भाषा आहे. उर्दू ही जशी प्रेमाची भाषा आहे तशीच ती क्रांतीचीही भाषा आहे. ‘इन्किलाब झिंदाबाद’ची ज्वलंत घोषणा भगतसिंगानं याच भाषेत दिली होती. प्रेमभंगाच्या अगणित व्याकूळ करणाऱ्या काव्यरचनांसहच रक्त सळसळवणारी अनेक क्रांतिगीतंही या लोकभाषेत लिहिली गेली. उर्दू भाषा लिहिता-वाचता-बोलता येणं, हे या देशात एकेकाळी श्रीमंतीचं आणि खानदानीपणाचं लक्षण समजलं जाई. उर्दूनं अनेक शायर केवळ या देशालाच नव्हे तर जागतिक साहित्यवर्तुळाला दिले. त्यांच्यापैकीच एक शिखरस्थ नाव म्हणजे ़फैज़ अहमद ़फैज़.

उर्दू भाषेत ़फैज़ या शब्दाला, मुबलक, खूप, पुष्कळ, अमाप, सफल, विजेता, अनुग्रह, लाभ अशा अनेक अर्थच्छटा आहेत. थोडक्यात समृद्धीदर्शक असा हा शब्द/ नाव आहे. ़फैज़ अहमद ़फैज़ यांनी आपल्या आयुष्यात जी वैविध्यपूर्ण काव्यरचना केली, ती पाहता आपलं नाव त्यांनी सार्थ ठरवलं, असंच म्हणता येतं. प्रीती आणि क्रांती यांच्यातला साकव/ पूल असलेल्या ़फैज़ यांचा शेर दुरूनही ओळखता येतो. शेरोशायरी, उर्दू-हिंदी साहित्यातल्या पंडितांनाच नव्हे तर अगदी कवितेच्या निव्वळ रसिक असलेल्या आणि साहित्याबद्दल थोडीबहुत जाण असलेल्या व्यक्तीलादेखील तो लगेचच कळतो! ‘हम देखेंगे’, ‘बोल के लब आज़ाद है तेरे’, ‘आए कुछ अब्र’, ‘मुझसे पहली सी मुहब्बत मेरे महबूब न माँग’, ‘आज बाज़ार में पा-ब-जौलाँ चलो’, ‘़गम की शाम’, ‘़गुलो में रंग भरे’ या रचना आपण सतत, विविध निमित्तानं ऐकल्या आहेत. तरुणांपासून ते बुजुर्गांपर्यंत प्रत्येकाला आपल्या भाषेत लिहिणारा शायर म्हणून ़फैज़ परिचित आहे. तरुणांना त्यांची भाषा आणि सेन्सिबिलिटी आपली वाटते. विविध मागण्यांसाठी, न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरणारे आंदोलक ़फैज़ गातात आणि आपला आवाज बुलंद करतात. बुजुर्गांना आपल्या मुद्द्याचा खुंटा बळकट करायचा असेल तर ते जातात ़फैज़च्याच आसऱ्याला आणि सर्वसामान्य माणसाच्या उदासपणाला, व्याकूळतेला वाणी देतो तो ़फैज़च! सर्व स्तर-वर्गातील, वयोगटातील लोकांना ़फैज़ आपला वाटतो. अशी स्वीकारार्हता आणि लोकप्रियता क्वचितच कुणाला लाभत असते. ़फैज़ हा काही हस्तिदंती मनोऱ्यातला कवी नव्हता. आयुष्य आसुसून भोगलेला माणूस होता. सत्तेविरोधात सरळसरळ थेटपणे भूमिका घेणारा कवी होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शब्दन् शब्दाची जबाबदारी घेणारा निर्भय साहित्यिक होता. त्या सगळ्याची पुरेपूर किंमतही त्यानं आयुष्यभर चुकवली. त्याचं जगणं आणि लेखन वेगवेगळं नव्हतंच मुळी. ‘जिंदगी का निचोड़’ त्याच्या शब्दाशब्दांतून प्रपातासारखा कोसळत राहतो.

Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Director and artist Pravin Tarde gifted novel Fakira to Gautami Patil
दिग्दर्शक आणि कलाकार प्रविण तरडे यांनी गौतमी पाटील यांना ‘फकिरा’ कादंबरी दिली भेट
Women World, Feminist Thought ,
स्त्री ‘वि’श्व : लोकल भी, ग्लोबल भी!
Atul Parchure
“जायच्या अगदी दोन महिन्यांआधी मला फोन करून …”, मिलिंद गवळींनी सांगितली अतुल परचुरेंची आठवण; म्हणाले, “फारच वाईट…”
shivani rangole tula shikvin changalach dhada fame actress
“विमान प्रवासात मास्तरीणबाई म्हणून हाक मारली…”, हवाईसुंदरीने लिहिलं शिवानी रांगोळेसाठी खास पत्र, शेअर केले फोटो
Kavita Medhekar
“चांगल्या घरातील मुली नाटकांत…”, कविता मेढेकर यांनी अभिनयात काम करण्याची परवानगी मागितल्यावर वडिलांची ‘अशी’ होती प्रतिक्रिया; म्हणाल्या…
Maharashtrachi Hasyajatra Fame shivali parab share special post of mangala movie
“…आणि हे घडलं”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं…”

हेही वाचा…विकलांगतेचा स्त्रीवादी विचार

फैज़चं हे विलक्षण आयुष्य त्यांचाच नातू अली मदिह हाश्मी यांनी इंग्रजीत शब्दबद्ध केलं. त्याचा मराठी अनुवाद ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार शेखर देशमुख यांनी केला आहे. ‘लव्ह अँड रेव्होल्यूशन ़फैज़ अहमद ़फैज़ : अधिकृत चरित्र’ या शीर्षकाचं हे पुस्तक लोकवाङ्मय प्रकाशन गृहानं प्रकाशित केलं आहे. छायाचित्रांसह असलेल्या चारशे पृष्ठांत ़फैज़ नावाच्या कार्यकर्त्या कवीचं सांगोपांग जगणं वाचकासमोर उलगडत जातं. एका लोकोत्तर आणि प्रचंड लौकिक यश मिळालेल्या कवीचं अधिकृत चरित्र लिहिणं ही काही सोपी गोष्ट खचितच नव्हे. मुळात चरित्रलेखन ही सोपी गोष्टच नाही. बऱ्याचदा आत्मचरित्र ही जशी आत्मसमर्थनं होत जातात, तशीच चरित्रं भलामणं होत जातात. नायकाची प्रतिमा विशाल करण्याच्या नादात इतरांना अर्कचित्रात्मक रंगवलं जातं आणि मुळात नसलेले खलनायक जन्माला घातले जातात. फैज़सारख्यांच्या बाबतीत हे घडण्याची शक्यता अधिक. सदासर्वकाळ सार्वजनिक जीवनात रमणाऱ्या माणसाचं आयुष्य मनुष्यश्रीमंत असतं. इथं बरी-वाईट दोन्ही प्रकारची माणसं मुबलक, पण अली मदिह हाश्मी यांनी चरित्र मेलोड्रॅमॅटिक करण्याचं शिताफीनं आणि काळजीपूर्वक टाळलं आहे. आजोबांचं चरित्र लिहिताना ते वास्तवदर्शी आणि सत्याशी प्रामाणिक राहून लिहिलं आहे. विशेषत: भारत-पाकिस्तान फाळणीचे दिवस, ़फैज़ यांना भोगावा लागलेला दमनकाळ यांबद्दल अतिशय संयतपणे आणि ‘जे घडलं तसं’ सांगितलं आहे. कुणी धवल नाही अन् कुणी काळंबेरं नाही.

अली मदिह हाश्मी यांना आपल्या आजोबांचा प्रदीर्घ सहवास लाभला. त्या दोघांत घट्ट मैत्र होतं. नातवाच्या तोंडून जणू आजोबाच आपल्या जिंदगीची दास्तान आपल्याला ऐकवताहेत, असं हे ओघवतं आणि वेगवान लेखन आहे. त्याची अचूक लय शेखर देशमुख यांनी मराठी अनुवादातही राखली आहे.

या अनुवादाची सर्वांत जमेची बाजू म्हणजे ़फैज़ यांच्या मूळ काव्यरचनांचा मराठी वृत्तबद्ध कवितांत टाळलेला अनुवाद. जिथे जिथे मूळ उर्दू-पर्शियन काव्यरचना आहेत, त्या तशाच ठेवून कंसात त्याचा गद्या भावार्थ लिहिलेला आहे. त्यामुळे मूळ रचनांचं सौंदर्य पातळ होत नाही आणि त्याचा मथितार्थही सुस्पष्टपणे कळतो. काय अनुवादित करायचं आणि काय नाही, याचं अनुवादकाराला जे पक्कं भान असावं लागतं ते देशमुखांकडे आहे. ़फैज़वरच्या निखळ प्रेमापोटी आणि त्यांच्या विचारांशी, कवितांशी आपली नाळ जोडली गेल्यानं त्यांना हे पुस्तक मराठीत आणण्याची निकड वाटली. अनुवादात सहजता आणण्यासाठी अनुवादकारांनी प्रचंड कष्ट उपसले, विविध संदर्भ शोधले. ़फैज़चंच झपाटलेपण घेऊन काम केलं. शिवाय हे काही फक्त ़फैज़ नावाच्या एका कवीचंच चरित्र नाही, तर हा एका प्रचंड धगधगत्या ऐतिहासिक काळाचा दस्तऐवज आहे. ़फैज़ वाचताना आपण हा काळही वाचत जातो, या दृष्टीनेही हे पुस्तक महत्त्वाचं आहे.

सदर पुस्तकामुळे ़फैज़ यांच्याबद्दलचे अनेक गैरसमज वा त्यांची विविध माध्यमांतून जी चुकीची अर्थनिर्णयनं करण्यात आलेली आहेत, त्यांना बसणारा आळा ही एक महत्त्वाची उपलब्धी म्हणता येईल. ‘पाकिस्तानी’ साहित्यविश्वात रमणारे, मंटोविरोधात साक्ष देणारे वगैरे जे आळ ़फैज़ यांच्यावर लावण्यात येतात, त्याचं निराकरण हे पुस्तक करतं. भारत-पाकिस्तानचा सांधा आपल्या योगदानातून बळकट करणारी जी सर्जनशील मंडळी होती त्यांच्यापैकीच एक ़फैज़ होते. फाळणीनंतर पाकवासी होण्यामागे जी कारणं होती, तीदेखील या चरित्रातून वाचकाला कळतात. मुळात ते सियालकोटचेच होते. सियालकोट फाळणीनंतर पाकिस्तानात गेलं. आपल्या जन्मभूमीपासून त्यांना आपली नाळ तोडायची नव्हती. शिवाय ते पाकवासी झाले असले तरीही आयुष्यभर ते एक ‘जिप्सी’च राहिले. त्यांच्या पायाला चक्र होतं. सतत फिरतीवर असत. फाळणीनंतर त्यांनी अनेकदा भारत दौरे केले. भारताविषयी त्यांना आत्यंतिक ममत्व होतं. आयुष्याच्या एका टप्प्यावर तर सरदार पटेलांना भेटून काँग्रेस पक्षात प्रवेश करायची आणि आयुष्यभर काँग्रेसचं काम करण्याची त्यांनी तयारीही दाखवली होती. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू ते अटलबिहारी वाजपेयी- अशा व्यापक मैत्रीचा पट होता त्यांचा. अटलबिहारी वाजपेयी हिंदुत्ववादी असले तरी त्या दोघांच्या मैत्रीआड हा विरोध कधीच आला नाही.

सआदत हसन मंटो या आपल्या समकालीन लेखक मित्राबद्दलच्या असीम जिव्हाळ्याचे दाखलेही या चरित्रात आहेत. मंटोला त्यांनी वेळोवेळी केलेली निरपेक्ष मदत, त्याच्याबद्दलचा कळवळा याबद्दलचे प्रसंग हुरहुर लावणारे आहेत. ़फैज़ना एकदाच मंटोला मदत करता आली नाही, कारण त्या वेळी ते स्वत:च तुरुंगात होते, याबद्दलची कबुलीही इथे आवर्जून नोंदलेली आहे. त्याशिवाय फक्त एक कवी म्हणूनच नव्हे तर ़फैज़ यांच्या अन्य पैलूंचा वेधही हे चरित्र घेतं. त्यात रस्त्यावर उतरून कामगारांसाठी लढणारे ़फैज़, संपादक ़फैज़, मित्रांच्या वर्तुळातले ़फैज़ ते कुटुंबप्रमुख ़फैज़ याबद्दलही साद्यांत माहिती मिळते. आजवर पडदानशीन असलेला एक कवी ठसठशीतपणे वाचकांसमोर येतो. त्याच्या जगण्याच्या असोशी, काव्यातल्या रसरशीतपणाबद्दल इत्थंभूत माहिती मिळतेच, पण मुख्य म्हणजे ़फैज़ यांच्या साहित्याकडे वळण्याची इच्छा जागृत होते. दीपस्तंभ प्रकाशवाट दाखवतो, दिग्दर्शन करतो- ़फैज़चं साहित्य असंच आहे. ते सर्वसामान्यांची भाषा बोलतं, ज्यांना आवाज नाही, त्यांचा आवाज होतं, दु:ख, यातनेचा काळ सरेल याची ग्वाही देतं आणि ठाम भूमिका घेण्याचं बळही देतं.

हेही वाचा…नव्या वर्षाचं स्वागत करताना…

लोकवाङ्मय प्रकाशन गृहानं अत्यंत आत्मीयतेनं मराठीत आणलेल्या चरित्राची निर्मितीमूल्यंही श्रीमंत आहेत. विशेषत: मिलिंद कडणेंचं मुखपृष्ठ वाचकाला पुस्तकाकडे अक्षरश: खेचून घेतं. त्यांनी रेखाटलेली ़फैज़ची प्रतिमा अतिशय सजीव. शेखर देशमुखांनी व्रतस्थपणे केलेलं हे काम मराठी वाचकांना एका जागतिक कवीचा मुळातून आणि पुन:परिचय तर करून देईलच, पण वर म्हटल्याप्रमाणे ़फैज़च्या साहित्याकडे वळायला लावेल. पर्यायानं उर्दू भाषेकडेही वळायला लावेल. ़फैज़ त्यांच्या मानगुटीवर बसला आहे. तो आपल्या सर्वांच्या मानगुटीवर बसेल. काही भुतं आयुष्यभर मानगुटीवर बसणं उपकारक असतं. त्यामुळे आपलं जगणं समृद्ध होतं.

सरतेशेवटी ़फैज़ म्हणतो तसं –
और क्या देखने को बा़की है
आप से दिल लगा के देख लिया
‘लव्ह अँड रेव्होल्यूशन ़फैज़ अहमद ़फैज़ : अधिकृत चरित्र’, मूळ लेखक – अली महिद हाश्मी, अनुवाद- शेखर देशमुख, लोकवाङ्मय गृह, पाने-३९५, किंमत – ७०० रुपये. akshayshimpi1987@gmail.com

Story img Loader