कधी कधी काही घटना दुरुस्त होण्याजोग्या नसतात. त्यातल्या आपल्या कृतीचा आपल्याला खेद झाला असेल तर त्या ‘ठीक आहे- असं घडलंय.’ म्हणून स्वच्छपणे स्वीकारून आयुष्य मात्र नदीच्या प्रवाहासारखं पुढे वाहातं ठेवणं आवश्यक आहे.
मैत्रिणींच्या गप्पा रंगात आल्या होत्या. राधिका आणि सोनाली शाळा सोडल्यानंतर प्रथमच भेटल्या होत्या. ‘‘ए तुला आठवतो का तो रोहन? कसला स्मार्ट होता ना गं तो?’’ राधिका.
‘‘हो आठवतो ना!’’ सोनालीचं तुटक उत्तर ऐकून राधिकाला आश्चर्य वाटलं.
‘‘म्हणजे काय? आवडायचा ना तो तुला! अगदी पत्रबित्रं लिहिलं होतंस म्हणे त्याला! मग भेटला का नंतर कधी तुला?’’ या प्रश्नावर सोनाली एकदम गप्प झाली. डोळे भरून आले तिचे.
‘‘काय गं- एवढी का सेंटी झालीयेस?’’
‘‘अगं, मी कुणालाच बोलले नाही आजपर्यंत, पण शाळा सुटल्यावर एकदा आम्ही ग्राऊंडवर भेटलो तेव्हा त्यानं मला ‘आय लव्ह यू’ म्हटलं. मी खूपच घाबरले होते. मला तो आवडायचा, पण हे एवढं.. मला झेपलंच नाही. मी त्याला खूप रागावले. त्या भरात खूप वाईट बोलले, ‘चप्पल काढीन’ म्हटलं! नंतर तो वडिलांच्या बदलीच्या गावी गेला. तिथून त्यानं पत्र पाठवलं, तेव्हाही मी त्याला खूप खरमरीत पत्र पाठवलं. मग काही दिवसांनी कळलं ओळखींच्याकडून, की त्याचा अॅक्सिडंट झाला आणि त्याचे दोन्ही पाय गेले म्हणे. आता तो खूपच परावलंबी झालाय. डिप्रेशनमध्ये असतो. मला सारखं असं वाटतं की, मी त्याला फाडफाड बोलले नसते, तर तो गाव बदलून गेलाच नसता, मग हे पुढचं सगळं टळलं असतं. कुठेही अपघात किंवा कुणी अपंग माणूस दिसला नं की मला रोहनच आठवतो. इतकं अपराधी, वाटतं गं! पण मी काय करणार? नुसती देवाकडे ‘मला माफ कर’ म्हणत बसते.’’ सोनालीचं हमसून रडणं तिच्या मनात किती ‘अपराधीपण’ साठलं होतं याची साक्ष देत होतं.
माणूस म्हणून अनेकदा आपल्याला अनेक गोष्टींबद्दल असं ‘सॉरी’ वाटत असतं; त्या क्षणिक चुकीचं ओझं पूर्ण भविष्यकाळावरचं काळं सावट झालेलं असतं.
‘‘हातपाय हलेपर्यंत तीर्थयात्रेला जायचं म्हणत होती म्हातारी, पण मीच फार उत्साह दावला नाही. ते एवढं सगळं कोण पळापळ करणार! त्यातून तिला ब्लडप्रेशर. म्हणून तिला बजावलं- आता इथंच बघा काशी! नाही तर जाऊ म्होरल्या वर्षी. आता मला काय ठावं का म्हातारी दोन दिवसांत वैकुंठालाच जाईल म्हणून! तिची इच्छा अपुरी ठेवली याची लई टोचणी लागली बघा जिवाला.’’ सतीशची मनापासूनची तळमळ.
‘‘माझ्या हातून पासिंग करताना दोन वर्षांत एकही चेक बाऊन्स झाला नाही आणि परवा एकदमच पाच लाखांच्या रकमेचा गफला! का तर, कोड घालायला चुकला म्हणून! आता प्रत्येकीचे पंधरा हजार भरल्याशिवाय गत्यंतरच नाही. असं झालंच कसं माझ्या हातून?’’ विद्याचं कायम चिंतातुर प्रश्नाचं भांडार.
‘‘श्रीकर स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये नक्की पहिला आला असता, पण नेमकी मी स्कूटरवरून पडले आणि हेअर क्रॅक निघाला. त्याचा डबा, खाणं सगळंच डिस्टर्ब झालं गं! केवळ माझ्यामुळे त्याची ट्रॉफी हुकली. त्याचा उदास चेहरा पाहून पोटात तुटतं गं माझ्या!’’ वैशालीची भावपूर्ण मांडणी.
अगदी छोटय़ा छोटय़ा चुकांबद्दल चुटपुट वाटण्यापासून पराकोटीचा अपराधीपण वाटण्यापर्यंत अशा प्रसंगांची साखळी आपल्या आयुष्यात असते. हे ‘वाटणं’ कायम ‘नकोसं’, ‘निरुपयोगी’, ‘मनाला थकवणारं’ असंच असतं का?
आयुर्वेदातील औषध अभ्यासाचे मूळ जनक चरक ऋषी म्हणतात- ‘नास्ति मूलं अनौषधम्’ – जगातील कुठलीच वनस्पती अशी नाही, की जिच्यात औषधी गुण नाहीत! अगदी विषारी वनस्पतीच्या काही मात्रासुद्धा काही औषधांत उपयुक्तच असतात. भावनांचंही अगदी तसंच आहे ना! आपल्याच वागण्यावर आपण नंतर जेव्हा विचार करतो, त्याचे परिणाम पाहातो, तेव्हा कधी कधी ‘आपलं चुकलं’ ही जाणीव (कधी साक्षात्कार!) होतेच. वाईट वाटतं, रुखरुख वाटते. ही ‘पश्चात्-ताप’ जाणीव अपराध भावनेची पहिली पायरी असते आणि ती खूप उपयुक्तही असते. आपल्या ‘माणूसपणाची’ साक्ष पटवणारी ती एक खूण असते, तशीच आपल्याच वागण्यात बदलांच्या जागा सुचवणारी होकायंत्र सुईपण असते. आपलंच वागणं तपासून बघायला ढकलणारीही असते. कधी कधी मात्र ही चुटपुट तात्पुरती न राहता सारखी सारखी वाटायला लागते. आपली मानसिक ऊर्जा खाऊन टाकायला लागते. फोकस बदलतो आणि आपण चुटपुटीकडून अपराधगंडाकडे प्रवास करायला लागतो. असं घडण्याची खूप सारी कारणं आहेत.
* ईशानच्या पालकांनी छोटय़ा वयापासूनच त्याला कडक शिस्तीत वाढवलं. त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना, ‘बाप रे! हे असं कसं घडलं माझ्या हातून? आता आई-बाबा काय म्हणतील?’ असे विचार (आणि भावना) ईशानच्या मनात पेरले गेले. जरा काही वेगळं अपेक्षेपेक्षा कमी दर्जाचं झालं की, त्याचं मन विषण्णतेनं भरून जातं. पूर्वी आई-बाबांनी शिक्षा केलेली असायची. आता स्वत:च काही तरी शिक्षा करून घेतल्याशिवाय बरं वाटत नाही.
* पूर्वी लहानपणापासून पूर्वा तिच्या काकांच्या व्यक्तिमत्त्वाला आदर्श मानणारी. हे ‘मानणं’ इतकं टोकाचं की, सगळं सगळं त्यांच्याप्रमाणेच करायचं तिच्या डोक्यात असायचं. ते स्टॅण्डर्ड जर टिकलं नाही, त्यांना आवडणार नाही असं काही चुकून जरी घडलं तरी ‘धरणी दुभंगून पोटात घेईल तर बरं’ असं वाटायचं.
या दोन महत्त्वाच्या कारणांशिवाय अजून काही गोष्टीसुद्धा मनात ‘अपराधभाव’ निर्माण करतात. लहानपणापासून ‘हे चांगलं-ते वाईट’, नैतिक-अनैतिक, पाप-पुण्य- अशा कल्पना आपल्या मनात कळत-नकळत रुजतात. आसपासच्या लोकांचं वागणंही आपण उचलत असतो, स्वत:चं वागणं ताडून बघत असतो आणि मग ते ‘चुटपुट लावणारं’ आहे का नाही हे ठरवतो. एकमेकांशी बोलताना अत्यंत ऋजू, संयमित भाषेत बोलणाऱ्या एखाद्या घरात चुकून जरी एखादी ‘शिवी’ उच्चारली गेली तर जी प्रतिक्रिया येईल आणि ‘उच्चारणाऱ्या’च्या मनात जो भाव येईल तो दुसऱ्या एखाद्या घरात- जिथे अशा भाषेबाबत फार बाऊ केला जात नाही तिथे येणार नाही. कधी कधी आपली ज्या गोष्टीवर पराकोटीची श्रद्धा असते, तिचा चुकून अपमान झाला, दुर्लक्ष झालं, कमतरता दिसली तरीही खूप त्रास होतो. मनात सारखी टोचणी लागून राहाते. ‘आपल्या हातून असं का झालं?’ ‘वेळेवर लक्षात का आलं नाही? ‘आता आपण या चुकीचं परिमार्जन कसं करणार.. इत्यादी.
असं ‘वाटणं’ हे खरं तर अगदी स्वाभाविक, मानवी स्वभावाचा नैसर्गिक भाग आहे, पण ते जर प्रमाणाबाहेर झालं, वारंवार होऊ लागलं, त्याच चक्रात अडकायला झालं, तर मात्र ते विक्राळ रूप धारण करतं. अशा वेळी आलं मन:स्वास्थ्य पणाला लागतं.
* स्वत:विषयी प्रचंड राग वाटायला लागतो. मग कुणी स्वत:लाच फाडफाड थपडा मारून घेतं, कुणी ब्लेडनं हाताची नस वर कापून घेतं, कुणी दिवस दिवस जेवण नाकारतं, तर कुणी स्वत:च्याच एखाद्या निर्मितीचा क्रूरपणे विध्वंस करतं.
* काही वेळा प्रचंड नैराश्य भावनेनं, शून्य भावानं मन भरून जातं. माणसात असूनही ‘आपलं कुण्णी नाही’ असा विलक्षण एकाकीपणा वाटतो. तो टोकाला गेला तर जगणं व्यर्थ वाटून आत्महत्येचाही प्रयत्न होतो.
* कधी अपराधाचं परिमार्जन करण्यासाठी इतरांबद्दल नको इतकं हळवं होऊन भरपाई करावीशी वाटते तर कधी कासवासारखं अंग आत ओढून घेऊन प्रसंगापासून पळ काढावासा वाटतो.
* अपराधाची भावना आपल्या ‘मी’ला छळायला लागते, इगो दुखावला जातो, तेव्हा कळत नकळत चुकीची मालकी दुसऱ्या कुणावर तरी ढकलून आपण मनाची समजूत घालतो किंवा अगदी दुसऱ्या टोकांची भावना व्यक्त करतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला खूप तिरस्कार वाटतो, पण आपलं ‘नैतिक मन’ तसं करण्याची परवानगी देत नसतं. तेव्हा मग आपण त्या व्यक्तीबद्दल प्रचंड उमाळा आल्यासारखं वागतो, अगदी प्रेमाचा वर्षांव करत सुटतो!
या सगळय़ा प्रतिक्रिया आपला अपराधी भाव खोल चिरत जात आहे हे दर्शवणाऱ्या असतात. त्या वेळीच ओळखून आपण त्यावर मात करायला हवी. ते सहज शक्य नसलं तरी कष्टसाध्य नक्कीच आहे. शेवटी ‘पश्चात्ताप’ ही भावना एका टप्प्यापर्यंत आपल्याला मदत करायचीच आहे हे जाणून तिचा ओव्हरडोस होणार नाही हे बघायला नको का? त्यासाठी काय करता येईल?
१) आपल्याला नक्की कशाबद्दल अपराधी वाटतंय आणि त्यांचा हेतू काय हे ओळखणं शक्य आहे. कारण कधी कधी हा भाव केवळ आपल्या विशिष्ट परिस्थिती किंवा दृष्टिकोनामुळे निर्माण झालेला असतो. प्रसूतीनंतर ७/८ महिन्यांनी नवी आई ऑफिसला जाते तेव्हा तिला किती त्रास होतो! पण काही काळ गेल्यावरही ‘आपण अक्षम्य दुर्लक्ष करतोय’ असं वाटत राहिलं तर तो खूपच संकुचित दृष्टिकोनाचा परिणाम असू शकतो!
हा भाव जर खरा म्हणायचा, तर जगभरच्या सर्व नोकरीवाल्या आया कायम ‘दु:स्वप्नात’च दिसायला हव्यात आणि त्यांची मुलं भलतीच ‘अच्यारी की बिच्यारी’ बनायला हवीत; पण तसं ते नसतं, असं संशोधनही सांगतं. म्हणून आपला अपराधी भाव वस्तुस्थितीच्या दगडावर घासून तपासायला हवा.
२) एखादी चूक खरोखरच घडली असेल, नुकसान डोळ्यासमोर असेल तर ‘अपराधराग’ आळवत न बसता शक्य तितक्या लवकर तिची जमेल तेवढी दुरुस्ती, डागडुजी करणं शक्य असतं. ‘खाईन तर तुपाशी’ असा बाणा इथे चालणार नाही.
अशा घटना/चुकांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी दक्ष राहायला हवं. अगदी जवळच्या नात्यांमध्येसुद्धा अशा काही चुका लक्षात येणं म्हणजे नातं ‘रिपेअर’ व्हायला हवं याची घंटा वाजणं आहे हे कळलं तर सहजपणे शब्दाने/कृतीने ‘सॉरी’ म्हणून वागण्यात ठामपणे आवश्यक तो बदल रुजवायला हवा.
* कधी कधी काही घटना दुरुस्त होण्याजोग्या नसतात. त्यात जर आपल्या कुठल्या कृतीचा आपल्याला खेद झाला असेल, तर त्या ‘ठीक आहे- असं घडलंय’ म्हणून स्वच्छपणे स्वीकारून आयुष्य मात्र नदीच्या प्रवाहासारखं पुढे वाहातं ठेवणं आवश्यक आहे. शब्दांचे तीर सुटून गेले असले तरी जखमांची निगराणी करता येते. त्या भरून यायला पुरेसा वेळ मात्र द्यायला हवा. पाण्यानं भरलेला ग्लास ताठ हातात धरूनच ठेवायचा ठरवला तर त्याच ग्लासचं वजन पहिल्या पाच मिनिटांत जाणवतं. त्यापेक्षा शतपटीनं जास्त पुढच्या पाच मिनिटांत जाणवतं. एकमेव कारण म्हणजे धरून ठेवण्याचा अट्टहास! तो ग्लास खाली ठेवला की क्षणार्धात खांदा-हात-दंड ताणमुक्त होतात! तसंच काहीसं हे आहे.
* अत्युकृष्टता किंवा १०० टक्के अचूकता हे एक मिथक आहे, याचा नीट स्वीकार करायला हवा. उत्तमता उत्तरोत्तर प्रयत्नांनी वाढू शकते, पण मिळालेल्या गोष्टीचं महत्त्व नगण्य ठरवून न मिळालेल्यावर कुचकुचणं, स्वत:ला दोषी मानणं यातून काय मिळणार? पुढे जाण्याचा उत्साह नक्कीच नाही मिळणार!
‘अपराधीपणा’ हा महाभारत युद्धातील जयद्रथ वधाच्या वेळी ग्रहणानं काळवंडलेल्या आकाशासारखा असतो. मनाच्या चैतन्याचा सूर्य झाकोळला जातो, पण काही क्षणच! आपण जर त्या पूर्ण स्वरूप श्रीहरी सारखं आपलं वज्र सज्ज ठेवलं तर त्या ढगांना पांगवून आपलं प्रबल, तेजस्वी मन:स्वास्थ्य पुनश्च उगवू शकतं, टिकून राहू शकतं, यात शंका नाही.
डॉ. अनघा लवळेकर
anagha.lavalekar@jnanaprabodhini.org