ओस पडलेल्या घरांमध्ये मानवी आयुष्य असतं का? ‘उरलेलं’ असतंच ना काहीतरी? फक्त आठवणीच नसतात, तर कुणीतरी इथं जगलं होतं याच्या खुणाही थेट समोर दिसत असतात.. भिंतीवरला रंग कुठे विटलेला नाही हे पाहून ‘इथं कपाट होतं’ हे परक्यालासुद्धा सांगता येतं. आपण सगळेच जण स्वत:च्या जगण्यावरून परक्या, अपरिचित, कालौघात गडप झालेल्या माणसांच्या जगण्याची कल्पना उगाचच किंवा आपसूक करू शकतो. इमारत पाडायची म्हणून ती रिकामी केलेली असो, की भूकंपानं पडलेली- तिच्या आतली घरं माणसांचीच असतात कधीतरी. इंजिनीअर/ बिल्डर/ आर्किटेक्ट किंवा तत्सम भूमिका न घेता सहज म्हणून आपण या घरांत गेलो, तर माणूस म्हणून आपले डोळे आपसूकच काम करू लागलेले असतात आणि काहीही कारण नसताना आपण- केवळ दृश्यांवरून- त्या घरांमधून अदृश्य झालेल्या माणसांच्या जगण्याची कल्पना करू लागलेले असतो. दृश्यातून जीवनजाणिवेचा खेळ आपण सगळेजण खेळू शकतो.
हा खेळ पुढे कुठे जातो? कदाचित ‘पर्यटक’ म्हणून कुठल्या ऐतिहासिक स्थळांवर गेलो तर तिथेसुद्धा- म्हणजे एका अर्थानं इतिहासाकडे. पण हा पुन्हा इतिहासाच्या ‘अभ्यासकां’ना अभिप्रेत असलेला इतिहास नसतोच! तो आपल्या या ‘खेळा’तला इतिहास असतो. आता त्या खेळात शाश्वत भावनाही सहभागी झालेल्या असतात, म्हणून ‘मानवी भावनांचा इतिहास’ म्हणू शकू आपण याला. यातून मग मांडवगडला राणी रूपमतीची हुरहूर जाणवते, किंवा आग्य्राच्या किल्ल्यातल्या एका खोलीच्या गवाक्षातून ताजमहाल पाहणाऱ्या वृद्ध शाहजहानची तगमग लक्षात येते.. रायगडावरल्या भग्न बाजारपेठेकडे पाहताना ‘हे आपलं राज्य, हे आपले लोक’ अशी- स्वत:पुरतं न पाहणारी प्रशस्त ऐट काय असेल, हे त्या दगडांतून नाही जाणवलं तरी स्वत:च्याच फुललेल्या छातीतून जाणवू शकतं..
या खेळातले अनेक प्रयोग हल्लीच्या चित्र-शिल्पकलेच्या प्रेक्षकांवर सुदर्शन शेट्टी या शिल्पकारानं केले आहेत. ‘दृश्यं मी उभारणार.. जाणिवा तुमच्या’ हा या खेळाचा जणू एकमेव नियम. सुदर्शन शेट्टीच्या कलाकृती पाहताना तुम्ही ओळखीचंच काहीतरी पाहत असता. म्हणजे उदाहरणार्थ, सुमारे २० वर्षांपूर्वी त्यानं बाथटबमधल्या पाण्यात सपासप उघडझाप करणाऱ्या कात्र्या उभारल्या होत्या. यंत्रचलित कृतीमुळे त्या मोठय़ा कात्र्यांना नियमित गती होती.. पाणी वारंवार कापलं जात होतं. आणि या कृतीत अशक्यपणा ओतप्रोत भरलेला आहे, पाणी कापलं जातच नाहीए, हे तुम्हा-आम्हाला ‘नुसतं पाहून’ जाणवत होतं. पुढे अशी भरपूर उदाहरणं देता येतील. पण आपल्यासाठी आत्ता महत्त्वाचं हे, की यातून सुदर्शन शेट्टीसुद्धा काहीतरी पुढला (केवळ ‘अमक्या विषयावरचं चित्र/ शिल्प’ याच्या तर नक्की पुढला)- संकल्पनात्मक विचार करतो आहे हे प्रेक्षकाला समजा शब्दांत नाही लक्षात आलं, तरी प्रेक्षकांनीसुद्धा सुदर्शनप्रमाणेच संकल्पनांचा विचार सुरू केलेला असे. उदाहरणार्थ, अख्खी पांढरी अ‍ॅम्बेसेडर कार शेवाळलेल्या पाण्यात सुदर्शन शेट्टी बुडवून ठेवतो, तेव्हा ‘पांढरी अ‍ॅम्बेसेडर’ हे कशाचं प्रतीक आहे हे त्याला सांगावं लागत नाही. आणि मग शेवाळलेलं पाणी हेसुद्धा प्रतीकच असणार- हे तर प्रेक्षकानंच ठरवून टाकलेलं असतं!
पण ही झाली जुनी उदाहरणं. त्यावर टीकाही भरपूर झालेली होती अशी. ‘सुदर्शन फक्त चमकदार काहीतरी दाखवतो’, ‘लोकांना नुसता भुलवतो हो!’, ‘जीवनाचं आकलन कुठेय सुदर्शन शेट्टीच्या कामात?’ असा साधारण या टीकेचा सूर असायचा. त्यापैकी ‘जीवनाचं आकलन’ ही टीका अगदीच अनाठायी ठरणार, हे उघड होतं. सात-आठ वर्षांपूर्वीपासून तसंच होऊ लागलं. म्हणजे सुदर्शनचं कामही बदलू लागलं. केवळ शिल्प किंवा मांडणशिल्प न करता त्यानं मुंबईतल्या एका प्रदर्शनात (गॅलरी स्केच्या सहकार्याने हे प्रदर्शन मुंबई महापालिकेच्या भाऊ दाजी लाड संग्रहालयात २०१० साली भरलं होतं.) सुरुवातीलाच फक्त दोन स्पीकर मांडले आणि त्या ध्वनिवर्धकांमधून ‘प्रेक्षकां’ना पुरुषाच्या आवाजात एक गोष्ट आणि स्त्रीच्या किनऱ्या आवाजात ‘श्रावणात घननिळा बरसला’सह तीन गाणी ऐकता येतील अशी व्यवस्था केली. हे काय? तर म्हणे ‘मौखिक परंपरा’! ‘माझं प्रत्येक शिल्प हे ‘वस्तू’ नसून माझं गाणं किंवा मी सांगितलेली गोष्ट आहे,’ असं सुदर्शन म्हणू लागला होता. ‘‘पण ‘श्रावणात घननिळा’?’’ या प्रश्नावर सुदर्शन ठामपणे प्रश्नकर्त्यांच्या डोळय़ात पाहून समजूतदार स्मितहास्य करत (मराठीत) म्हणाला, ‘‘हो. आणि ती गाणारी मुलगी पंजाबी आहे.’’
‘श्रावणात घननिळा’सारख्या गाण्याचं ‘मौखिक परंपरे’तलं स्थान सुदर्शननं ओळखणं महत्त्वाचं होतं, हे त्याच्या गेल्या पाच वर्षांतल्या कलाकृती सांगू लागल्या. इथून पुढे त्यानं फिल्म करायला सुरुवात केली. २०१५ साली मुंबईतल्या एका छानशा चाळवजा इमारतीतलं आयुष्य त्यानं टिपलेलं फिल्ममध्ये दिसलं. याच्या पुढला टप्पा म्हणजे आत्ता तुमच्यासमोर या मजकुरासोबत असणारी दोन छायाचित्रं.. खांब-खांब दिसताहेत पाहा.. ती! हे दोन्ही फोटो ‘शून्य घर’ नावाच्या प्रदर्शनातले आहेत. जानेवारी २०१६ पासून हे प्रदर्शन दिल्लीच्या ‘एनजीएमए’मध्ये सुरू झालं. यापैकी ज्यात उभी स्त्री आणि आणखी कुणी कुणी दिसतंय, तो फोटो फिल्ममधला आहे आणि याच फिल्मचा ‘सेट’ म्हणून वापरलेलं भलंमोठं वास्तूवजा शिल्प गॅलरीच्या आत (दुसरं छायाचित्र) आहे. त्या गॅलरीतल्या ‘सेट’वर प्रेक्षक मंडळी फिरत, फोटो/ सेल्फी टिपत ‘कायै हे?’ असं एकमेकांना विचारत होती. मग गॅलरीच्याच काही भागात फिल्म.. मोठय़ा पडद्यावर आणि ६० जण एकत्र पाहू शकतील अशा दालनात. हा सेट फिल्मध्ये ‘जिवंत’ होतो. खांब ऐतिहासिक दिसताहेत खरे; पण ते अमुकच शैलीचे आहेत असं नाही सांगता येत. हिंदू मंदिरं, दिलवाडय़ासारखी जैन मंदिरं, महाल असं काहीही ते खांब पाहून आठवू शकतं.

या खांबांच्या अवतीभोवती फिल्ममधली पात्रं साध्याच आणि बऱ्यापैकी हल्लीच्याच कपडय़ांत वावरतात.. खांबा-खांबांच्या पॅसेजमध्ये जेवणावळी उठतात.. मुलगी नाचाचा रियाझ करते.. कुणीतरी तारुण्यसुलभ ओढीनं कुणाची तरी वाट पाहतं.. प्रौढ महिला आणि तरुण मुलगा यांची नजरानजर होते.. हे सगळं शब्दांविना. तब्बल ५९ मिनिटं. त्या पॅसेजच्या शेवटी एक खोली आहे. स्वयंपाकघर, पलंग, मच्छरदाणी, कपडे, शाळेचं दप्तर, क्रिकेटची बॅट अशा वस्तू त्या एकखणी घरात आहेत. पुढे कुठेतरी आसपास एक होडीसुद्धा आहे.. आणि त्या सर्व प्रकारच्या वस्तूंचा वापर ‘शून्य घर’या फिल्ममधली आबालवृद्ध पात्रं करताना दिसतात. या फिल्ममधून उलगडतं, ते ‘जगणं’! दोन भावांमधलं भांडण हे कुणा संतोष आणि संदीपमधलं असेल.. किंवा कदाचित आपल्या ओळखीच्या संदीप/ संतोषसारखे दिसणारे हे दोघे प्रत्यक्षात औरंगजेब आणि दारा शुकोहसुद्धा असू शकतील असं प्रेक्षकांना वाटावं, इतकी ‘अमूर्तता’ या फिल्ममध्ये आहे. म्हणजे काळ कुठला, ठिकाण कुठलं, काही म्हणता काही कळत नसतानाही माणसं आणि त्यांच्या कृती दिसत राहतात.. एकामागोमाग! होय दिसतं.. दिसत राहतं काही ना काही. ‘जे दिसतंय ते काय आहे?’ या पातळीवरला ‘अर्थ’सुद्धा फिल्म पाहतेवेळी कळत राहतो. पण तरीही फिल्म अमूर्तच ठरते. कारण एकतर तिला कथानक नाही, खांबा-खांबांच्या ‘ऐतिहासिक’ भासणाऱ्या सेटवर निव्वळ कृतींच्या लडी उलगडत राहतात. आणि या कृती इतक्या ‘नेहमीच्या पाहण्यातल्या’ (की जगण्यातल्या?) असतात, की हे ‘नेहमीचं’ म्हणजे कधीचं? आत्ताचं की १०० वर्षांपूर्वीचं? की ४०० वर्षांपूर्वीचं? असेही प्रश्न पडतात. त्यात भरीस भर म्हणून फिल्मच्या शेवटी गाणं ऐकू येतं.. हे निर्गुणी भजन आहे- गोरखनाथांचं. कुमार गंधर्वानी गायलेलं.. ‘शून्य गढम् शहर, शहर घर बस्ती..’ हे त्याचे बोल ऐकता-ऐकताच कॅमेऱ्याची क्रेन वर वर जात राहते आणि दृश्य मोठं होतं.. सुदर्शननं फिल्मसाठी निवडलेला तो ‘निर्जन, खडकाळ आणि होडी वल्हवण्याजोगं पाणी असलेला प्रदेश’ म्हणजे लोणावळ्याजवळची मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या बऱ्यापैकी शेजारचीच एक पडीक, भाकड दगडखाण आहे, हे आपल्या लक्षात येतं.
सगुण-साकार रूपातलं काहीतरी समोर दिसतंय.. त्यातून ‘निर्गुण’ अर्थ जाणवतोय- अशी स्थिती त्या एका तासाभरात ‘शून्य घर’ या फिल्मच्या प्रेक्षकाची झालेली असते. फिल्म पाहून बाहेर पडताना पुन्हा तो ‘सेट’ भेटणारच असतो. आणि आपण आता त्याच्याशी कमी उडाणटप्पूपणाने वागणार असतो!
तरीही फिल्ममधली मध्यमवर्गीय पात्रं लक्षात राहतातच. म्हणून फिल्म पाहिल्यानंतर काही मिनिटांत सुदर्शन शेट्टी दिसला तेव्हा त्याला म्हणालो, ‘तू एक प्रकारे आम्हा मध्यमवर्गीयांचा प्रवक्ताच आहेस रे..’
तर तो हसला. पुन्हा डोळ्यांत पाहत.. जरासा कुत्सितपणेसुद्धा कदाचित. त्याच्या त्या कुत्सितपणात मोठं कट-कारस्थान होतं.. सतत ‘आपला प्रवक्ता’ शोधू पाहणाऱ्या मध्यमवर्गाला निर्गुणाच्या खाणीत ढकलून देण्याचं कट-कारस्थान!
n abhijit.tamhane@expressindia.com

Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
javed akhtar got Asian culture award
जावेद अख्तर यांचा २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात सन्मान, ‘हा’ पुरस्कार मिळाल्यावर म्हणाले, “हल्लीच्या चित्रपटांमध्ये…”
Story img Loader