काही दिवसांपूर्वी एका चौथीतील मुलाने मला एक प्रश्न विचारला, ‘‘डॉक्टर, कोंबडी अंडे देते आणि गाय दूध देते. दोन्हीतून आपल्याला प्रोटिन व कॅल्शियमच मिळते तर मग दोन्ही सारखेच ना? मग अंडे नॉनव्हेज आणि दूध व्हेज असे कसे?’’ जर का आपल्याला हे समजून घ्यायचे असेल तर यामागे दडलेले शास्त्रही समजून घेतले पाहिजे. पण दोन शास्त्रांची भेसळ केली तर त्या मुलाप्रमाणे आपलीही अवस्था होईल.
जसे आयुर्वेदीय शास्त्राप्रमाणे स्तन्य व आर्तव हे एकाच रसाचे दोन उपधातू असल्याने दूध व अंडे यात साम्य हे असणारच. म्हणून स्तन्य/ दूध देणारे प्राणी अंडे देत नाहीत व अंडे देणारे दूध देत नाहीत. दोन्ही एकत्र सुरू असल्यास शरीरात रस धातूची दुष्टी होते. उदाहरणार्थ बाळाचे स्तन्यपान चालू असताना मासिक पाळी चालू असलेल्या स्त्रिया. पण अंडे आणि दूध यांतील आधुनिक शास्त्राप्रमाणे असणारे साम्य म्हणजे कॅल्शियम व प्रोटिन. येथे दोन्हीही शास्त्र बरोबर आहेत आणि ती आपापल्या जागी योग्य आहेत. प्रथम आयुर्वेदही एक शास्त्र आहे व त्याला त्याची स्वत:ची अशी एक परिभाषा आहे हेही या निमित्ताने आपण समजून घेतले पाहजे.
आधुनिक शास्त्रात आहारीय घटकांचे वर्गीकरण ढोबळ मानाने फक्त दोनच गटांत केले जाते आणि ते म्हणजे शाकाहार आणि मांसाहार. तर आयुर्वेदात याच आहारीय द्रव्यांचे वर्गीकरण बारा प्रकारांत केले आहे जसे की शुकधान्य, शिम्बीधान्य, शाकवर्ग, फलवर्ग, दुग्धवर्ग, मांसवर्ग इत्यादी. या प्रत्येक वर्गातील आहारीय पदार्थ व त्यांचे गुण यात वर्णन केले आहेत. म्हणून आपण बारा आहारीय वर्गातील कोणता आहार घेतोय त्यानुसार त्याचे नाव पुढे जोडले जाते. उदाहरणार्थ शाकाहार, फलाहार, दुग्धाहार, मांसाहार इत्यादी काही शब्द रोजच्या वापरातील असल्याने पटकन समजतील तर काही समजून घ्यावे लागतील. मूळ मुद्दा हा आहे की आपण कोणीही निर्जीव पदार्थ खाऊन जगू शकत नाही.
‘जीवो जीवस्य आहार:’ या न्यायाप्रमाणे एक जीवच दुसऱ्या जिवाचे पोषण करू शकत असतो. म्हणूनच आपण कोणत्यातरी पदार्थाचा जीव घेतल्याशिवाय वाढू शकत नाही. आपण सगळे परावलंबी आहोत. निर्जीवातून जीव/अन्न निर्माण करण्याची ताकद फक्त वनस्पतींमध्ये आहे आणि वनस्पती या सजीव आहेत हे आता सिद्ध झाले आहे. म्हणून मेंडेलेच्या धातुसारनीतील १०० पेक्षा जास्त धातू (मूलद्रव्ये) आणि आयुर्वेदाच्या आचार्य चरक यांनी सांगितलेले शरीरातील सप्त धातू हे दोन्ही वेगळे व त्यांची परिभाषाही वेगळी. मात्र यामुळे काही एकमेकांचे शास्त्रीयत्व नाकारता येत नाही. जर शरीराला लागणारी जीवनावश्यक मूलद्रव्ये म्हणून व्हिटामिन, प्रोटिन, काबरेहायड्रेटकडे पाहायचे असेल तर त्याच पदार्थात दडलेले वात, पित्त, कफ आदी दोष व उष्ण-शीत आदी गुणसुद्धा पाहिले पाहिजेत. कारण हीसुद्धा त्या पदार्थाना जाणून घेण्याची एक भाषा आहे. एकच कॅल्शियम आपल्याला दूध, अंडे अथवा जनावरांच्या हाडातून किंवा चुन्याच्या निवळीतून अथवा कृत्रिमरीत्या केमिकल लॅबमधून मिळत असले व आधुनिक शास्त्रानुसार ते एकसारखेच असले तरी आयुर्वेदीय शास्त्रानुसार त्याचे गुणधर्म बदलतात. लक्षात ठेवा अंडे अंडे आहे आणि दूध हे दूध आहे. म्हणून तर आयुर्वेदात अन्नाची फार सुरेख व्याख्या केली आहे. ‘आपण ज्याला खातो व जे आपल्याला खाते त्याला अन्न असे म्हणतात.’ म्हणून आपण काय खातोय याकडे बारकाईने लक्ष द्या नाहीतर एक दिवस तेच अन्न आपल्याला भक्ष्य करून नष्ट करेल.
harishpatankar@yahoo.co.in
वैद्य हरीश पाटणकर