अज्ञानाची पट्टी बांधूनच तर आपण जगत आहोत, ती पट्टी काढून खऱ्या दृष्टीनं पाहू लागलं पाहिजे, असं अचलानंद दादा म्हणाले. अचलानंद दादांचं बोलणं असंच ओघवतं असे. त्या बोलण्यात रूपकं, अनेक शब्दांचे अर्थ मधेच असे चमकून जात की हृदयेंद्र भारावून जात असे. ‘सौंदर्य पाहून ‘डोळ्यां’ना सुख होत नाही की सडकं प्रेत पाहून ‘डोळ्यां’ना दु:ख होत नाही.. सर्व मनाचाच खेळ,’ हे अचलानंद दादांचं वाक्य त्याच्या मनावर असाच प्रभाव पाडून गेलं होतं.. खरंच आपलं पाहणंही क्षणिक आणि त्यातून होणारा ‘आनंद’ही क्षणिक.. जे क्षणिक आहे, त्याचा आनंदही क्षणिकच असणार आणि जो शाश्वत आहे, त्याचा आनंदही शाश्वतच असणार, हे त्याला जाणवलं.. तोच त्याचं लक्ष गेलं, दादांची नजर त्याच्यावरच रोखली गेली होती.. जणू त्याचं आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष तर नाही, याचा शोध ती घेत होती! त्यानं दादांकडे पाहताच मग दादा बोलू लागले.. आपलं नीट लक्ष नसेल, असं वाटून आता ते आधीचंच वाक्य पुन्हा उच्चारणार, हे सवयीनं हृदयेंद्रला माहीत झालं होतं. दादा म्हणाले..
अचलदादा – तर डोळ्यांवरची अज्ञानाची पट्टी काढून खऱ्या दृष्टीनं पाहायला लागलं पाहिजे. जे शाश्वत आहे, तेच पाहिलं पाहिजे.. म्हणून तर तुकाराम महाराज सांगतात, ‘‘तुम्ही घ्या रे डोळे सुख। पाहा विठोबाचे मुख।।’’ असं पाहा, आपलं जगणं साठ-सत्तर वर्षांचं.. त्यात अनंत जन्मांच्या वासनासंस्कारानं मन जगामागे जाणारच.. थोडं कुठे कळू लागलंय तर अभ्यास का न करावा? त्यात यश येईल किंवा नाही, पण करून तर पाहू! मग तुकोबा म्हणतात, ‘‘तुम्ही ऐका रे कान। माझ्या विठोबाचे गुण।।’’ हे फार महत्त्वाचं आहे बरं का! माणूस एकवेळ परनिंदा करणार नाही.. आत्मस्तुतीही करणार नाही.. पण त्याला परनिंदा आणि स्वस्तुती ऐकायला आवडते बरं का! दळभद्री जिवात कसले आलेत हो गुण? तरी तो गुण उधळू पाहतो आणि स्तुती ऐकू पाहतो.. ते थांबवायला तुकोबा सांगतात आणि म्हणतात- ‘‘मना तेथें धांव घेई। राहें विठोबाचे पायीं।।’’ हे मना जगाची गुलामी नको करूस.. जगाला शरणागत नको होऊस.. द्वैतमय जगाच्या विषम चरणांमागे धावत राहू नकोस.. त्या समचरणांकडेच धाव घे! त्या समचरणांमागेच चालत रहा.. त्यानंच खरी आंतरिक शांती, समता लाभेल.. (वाक्य संपताच अचलानंद दादांनी विठ्ठल बुवांकडे नजर टाकली. बुवांची मुद्रा भावगंभीर होती. एखाद क्षण मौनातच सरला असेल, पण तेवढय़ा क्षणांत सर्वाच्याच मनात विचारांचे अनेक तरंग उमटत होते. बुवांच्या शब्दांनी जणू ते तरंग स्थिरावले. बुवा म्हणाले..)
बुवा – जगाच्या विषम चरणांमागे धावणारं मन इतक्या सहजासहजी समचरणांमागे लागणार नाही.. जगामागे जायची सवय मन सहजासहजी सोडणार नाही, हे खरं.. पण आपण थोडा विचार करावा. नामदेव महाराज म्हणतात ना? ‘‘क्षण एक मना बैसोनि एकांती। विचारी विश्रांति कोठे आहे।।’’.. एक क्षण तरी हे मना, शांत हो आणि विचार कर की खरी विश्रांती कुठे आहे? तुझी जी अहोरात्र धडपड सुरू आहे त्यानं खरी विश्रांती मिळते का?
हृदयेंद्र – एकदा गुरुजी इथं आले होते. गावी परतताना त्यांना सोडण्यासाठी आम्ही सर्वजण रेल्वे स्थानकात गेलो होतो.. सकाळची गर्दीची वेळ. नोकरदारांची धावपळ सुरू होती.. वारूळ फुटावं आणि त्यातून मुंग्यांचा लोंढा चहूदिशांनी बाहेर पडत जावा, तशी सगळीकडे माणसांची गर्दी ओसंडत होती.. गाडी पकडणारे धावताहेत, गाडीतून उतरलेले धावताहेत! या सगळ्या लगबगीकडे बघून हसून महाराज म्हणाले, ‘‘मी एवढं लिहून ठेवलंय, पण वाटतं ते वाचायला क्षणभर तरी ही माणसं थांबतील का?’’ या वाक्यावर हसून अचलानंद दादा म्हणाले होते की, ‘‘गुरुजी हे धावून धावून दमतील ना, तेव्हा फक्त तुमचंच वाचतील!’’
बुवा – अगदी खरं आहे.. आणि याच रगाडय़ात, याच धावपळीत आम्ही खरं प्रेम, खरी नाती, खरं सुख शोधण्यासाठी आणि टिकवण्यासाठीही धावत असतो! खरंच ज्याला खरी विश्रांती हवी आहे, त्याला ती मिळवण्याचा खरा मार्गच शोधावा लागेल.. त्यासाठी संतांच्या शब्दांचं बोट धरावंच लागेल..
चैतन्य प्रेम