हृदय परिवारी आणि मनाच्या मंदिरात श्रीसद्गुरूंचंच अखंड ध्यान हवं. त्यांचंच अढळ स्थान हवं, असं बुवा म्हणाले. विचारमग्न हृदयेंद्र त्यावर म्हणाला..
हृदयेंद्र : साधनामार्गावर पाऊल टाकण्याआधीही हे मनच तर खरं नाचवत असतं. मनाच्याच ओढीनुरूप आपण जगत असतो. मनच आपल्याला खेळवत असतं. त्याची स्पष्ट जाणीव मात्र नसते. साधना सुरू झाली, मग ती कितीही तोडकीमोडकी का असेना, या मनानं निर्माण होणारे अडथळे जाणवू लागतात. ‘साधक’ तर म्हणवतो, ‘भक्त’ तर म्हणवतो, पण खरी साधना होतच नाही, खरी भक्ती होतच नाही.. सारं यंत्रवत् सुरू आहे. अंत:करणापासून नाही, हे जाणवू लागतं. मन आजही जगाच्या प्रभावाखाली आहे, यामुळे असं होतं का, या प्रश्नानं मन खिन्नही होतं..
कर्मेद्र : ज्या मनाच्या ओढीमुळेच जगाचा प्रभाव टिकून आहे, तेच मन खिन्न कसं होईल? का दोन मनं आहेत आपल्याला?
अचलदादा : मनं दोन नाहीत, पण साधनेच्या संस्कारामुळे जी थोडी थोडी जाग येऊ लागते, तिनं मनाला प्रेयाबरोबरच श्रेयाचीही जाणीव होऊ लागते. प्रेय म्हणजे जे प्रिय असतं, भौतिकात जी आसक्ती असते ती सुटत नाही, पण जे श्रेय आहे, माझ्या खऱ्या हिताचं आहे, आध्यात्मिक आहे ते पकडता येत नाही, याचीही जाणीव होते. ही जाणीव म्हणजे जणू आच असते. मनुष्यजन्माचा खरा हेतू तर उमगला आहे. तरीही देहासक्तीनं जगणं काही सुटत नाही, ही जाणीव एका आंतरिक युद्धाला कारणीभूत होते. तुकाराम महाराजांनी या युद्धाचं वर्णन केलंय..
‘रात्रं दिन आम्हां युद्धाचा प्रसंग।
अंतर्बाह्य़ जग आणि मन!’
मग हृदयेंद्र तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ‘साधक’ तर झालो, पण खरी साधना होत नाही.. ‘भक्त’ तर झालो, पण खरी भक्ती घडत नाही, या जाणिवेनं तळमळ सुरू होते. मग साधनेचं कर्तेपणही आपल्या हाती नाही, हे समजलं की शरणागती येते.. सद्गुरूंच्या आधाराशिवाय जप, तप, व्रत काहीच साधणार नाही, या भावनेनं त्यांच्या आधारासाठी खरी व्याकुळता येते..
बुवा : तुकाराम महाराजांचाच एक अभंग आहे.. फार सुंदर आहे.. ते म्हणतात,
‘‘कैसे करूं ध्यान कैसा पाहो तुज।
वर्म दावीं मज पांडुरंगा।।
कैसी भक्ति करूं सांग तुझी सेवा।
कोण्या भावे देवा आतुडसी।।’’
अचलदादा : ‘आतुडसी’! काय शब्द योजना आहे.. अगदी आतडं पिळवटून करुणा भाकत आहेत!
बुवा : काय म्हणतात तुकोबा? ज्या ध्यानानं केवळ तुझं अवधान येतं, चराचरांत भरलेल्या तुला पाहता येतं त्या ध्यानाचं वर्म, रहस्य सांग रे! सर्व इंद्रियांद्वारे तुझंच सेवन साधणारी जी भक्ती आहे ती कशी करू? ज्या एका भावबळानं तू गवसतोस तो या अभावग्रस्त अंत:करणात कुठून आणू, सांग रे..
‘‘कैसी कीर्ती वाणू कैसा लक्षा आणूं।
जाणूं हा कवण कैसा तुज।।
कैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चित्तीं।
कैसी स्थिती मती दावीं मज।।’’
.. तुझी कीर्ती कशी गाऊ, तुझ्यावर लक्ष कसं केंद्रित करू, तुला कसं जाणू, भजनात कसा गोवू, चित्तात कसा धारण करू? हे सारं साधण्यासाठी माझी आंतरिक स्थिती आणि मनाची बैठक कशी असावी, हे सारं तूच मला दाखव! मग म्हणतात..
‘‘तुका म्हणे जैसें दास केलें देवा।
तैसें हें अनुभवा आणीं मज।।’’
.. हे देवा जगाचा दास असलेल्या मला तू आपला दास बनवलंच आहेस तर आता या साऱ्याचा अनुभवही दे!
अचलदादा : तू दास बनवलं आहेस! खरंच, या मार्गाची जाणीवही आपल्या बुद्धीनं झालेली नाही.. त्याच्याच कृपेनं आपण या मार्गात आलो आहोत.. मुक्कामाला नेण्याची जबाबदारी त्यांचीच तर आहे! चालत राहणं फक्त आपल्या हातात आहे!
चैतन्य प्रेम

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Story img Loader