बुवांचं म्हणणं हृदयेंद्रला अगदी मनापासून पटलं. नेहमीच्या जीवनात सद्गुरूंची जाणीव अचानक निसटते आणि लोकांशी व्यवहार करताना आपली प्रतिक्रियात्मकतेची सवय उफाळून येते.. ज्या ज्या क्षणी सद्गुरूंची जाणीव टिकते त्यावेळी लोकांच्या वागण्या-बोलण्याची प्रतिक्रिया मनात उमटत नाही.. ज्या ज्या वेळी प्रतिकूल परिस्थिती उद्भवली त्या त्या वेळी त्याला अगदी ठामपणे जाणवे की, अनंत कोटी ब्रह्मांड नायक ज्यांना म्हणतो ते पाठिशी असताना कुणाची भीती, कसली चिंता? विचारमग्न हृदयेंद्रला बुवा काहीतरी बोलत आहेत, याची जाणीव झाली.. त्यांच्या सांगण्यातलं काहीतरी हुकलंच, या जाणिवेनं त्याला थोडं वाईट वाटलं.. बुवा बोलत होते..
बुवा – .. तर असं सद्गुरू ध्यान पाहिजे.. जीवनातल्या कोणत्याही प्रसंगात ते ओसरता कामा नये.. पण हे साधावं कसं? तर सोपानदेव सांगतात, ‘‘हरि हरि जाला प्रपंच अबोल। हरि मुखीं निवा तोचि धन्य।।’’ बघा हं.. प्रपंच अबोल झाला, काय सुरेख उपमा आहे पहा! प्रपंच म्हणजे काय? तर पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं याद्वारे जगाकडे असलेली ओढ आणि त्यातून वाढणारी जगाची आसक्ती हाच तर सारा प्रपंच आहे! आणि हा आपला प्रपंच बोलका आहे बरं का.. आपण प्रत्यक्षात एकवेळ कमी बोलू, पण अंतर्मनात इतकी बडबड इतकी बडबड सुरू आहे की या आंतरिक बोलण्याला जराही विश्रांती नाही.. एखादा वाईट वागला की कितीतरी दिवस मनात थैमान माजलं असतं.. त्याला पुढल्या वेळी मी असंच बोलीन, चांगलंच ऐकवीन, मग तो जर तसं बोलला तर मी त्याउपर असं असं ऐकवीन.. सगळी आत सुरू असलेली फुकाची बडबड.. प्रत्यक्षातलं बोलणंही परनिंदा आणि आत्मस्तुतीनं भरलेलं.. तोंडालाही निवणं म्हणजे शांत होणं माहीतच नाही जणू..
अचलदादा – अगदी खरं आहे.. जन्मापासून मरेपर्यंत सगळा शब्दांचा पसारा.. कल्पना असो, विचार असो, चिंता असो.. सारं शब्दांच्या आधारावर सुरू आहे.. हा पसारा आवरण्यासाठीच तर प्रथम शब्दरूपच भासणारं नाम आलं!
बुवा – म्हणूनच तर सोपानदेव सांगताहेत.. प्रपंचाची ही आंतरिक आणि बाह्य़ बडबड थांबवायची तर मुखाला, वाणीला हरिनामातंच गुंतवावं लागेल.. एकदा का हरिनामात मन गोवलं की मग खरी आंतरिक आणि बाह्य़ विश्रांती आहे.. ‘‘हरि हरि जाला प्रपंच अबोल। हरि मुखीं निवा तोचि धन्य।।’’ मग काय सांगतात? तर, ‘‘हरि हरि मन संपन्न अखंड। नित्यता ब्रह्मांड त्याचे देहीं।।’’ या हरिमयतेनं मन अखंड भरून जाईल.. संपन्न होईल.. जगाच्या आसक्तीनं चिंता, काळजीनं पोखरून विपन्नावस्था भोगत असलेलं मन हरिमयतेनं खऱ्या अर्थानं सुखसंपन्न होईल! मग याच देहात.. माउली म्हणतात ना? ‘‘तें सुख येणेंचि देहें। पाय पाखाळणिया लाहे’’ अगदी त्याप्रमाणे याच हाडामांसाच्या देहात नित्य ब्रह्मांड भरून राहील..
योगेंद्र – पिंडी ते ब्रह्माण्डी, असं म्हणतातच ना?
अचलदादा – हो, पण त्याची जाणीव कुठे असते?
हृदयेंद्र – पण बुवा ब्रह्माण्ड हा शब्दही तोकडा वाटत नाही का? कारण अनंत कोटी ब्रह्माण्ड नायक सद्गुरूच्या ध्यानात जो रमला आहे त्याच्या देहात एका ब्रह्माण्डाची जाणीव नित्य टिकणं, हे थोडं उणंच वाटतं..
बुवा – तुम्ही फार बारकाईनं शब्दाचा विचार करता.. छान.. इथे ब्रह्माण्ड हा शब्द तोकडा आहे, तरी तो बरोबरच आहे.. कारण अनंत कोटी ब्रह्माण्ड नायक अशा सद्गुरूचा मी अंशमात्र आहे, हीच तर खरी जाणीव आहे! या जाणिवेनंच सगळी देहबुद्धी लयाला जाते आणि सर्व जीवनव्यवहार व्यापक होतो.. नव्हे कोणताही व्यवहार करताना देहबुद्धी उरतच नाही.. म्हणून तर सोपानदेव म्हणतात, ‘‘सोपान विदेही सर्वरूपी बिंबतु।’’ विदेहभावानंच सोपानदेव सर्व रूपांमध्ये त्या परमतत्त्वालाच पाहू लागतात आणि ‘‘हरिरूपीं रतु जीव शिव।।’’ म्हणजे हरिच्या अर्थात सद्गुरूच्या रूपातच रममाण होतात.. जीव म्हणजे साधक आणि शिव म्हणजे परमात्मा.. हे दोन्ही त्याच एका सद्गुरूरूपाच्याच आधारानं परमसुख भोगत आहेत, या जाणिवेचा हा उच्चार आहे! ‘सगुणाची शेज’च्या अखेरच्या चरणात माउलीही हीच सद्गुरूमयता मांडताना म्हणतात, ‘‘निवृत्ति निघोट ज्ञानदेवा वाट। नित्यता वैकुंठ कृष्णसुखें।।’’

Story img Loader