‘सगुणाची शेज निर्गुणाची बाज’ या अभंगांच्या चार चरणांतून वाणीच्या अंगानं चार स्थितींचा बुवांनी केलेला ऊहापोह हृदयेंद्रच्या मनाला भिडला. योगेंद्रही त्याच्याशी सहमत होत म्हणाला..
योगेंद्र : खरंच बुवा, या अभंगाचा असा अर्थ कधी जाणवलाच नव्हता..
बुवा : (हसून) अचलानंद दादांप्रमाणे मलाही अभंगांचा किंवा सत्पुरुषांच्या वचनांचा अनेक अंगांनी विचार करण्याचा छंद आहे बरं का! आता ‘सगुणाची शेज’मध्ये मला ध्यानाची चार अंगंही दिसतात बरं का!
योगेंद्र : (कुतूहलानं) ध्यानाची चार अंगं? ध्यानानं तर एकाग्रता आणि मग ऐक्यता येते.. त्याचे चार प्रकार?
बुवा : (हसून) ध्यान एकच असतं, पण प्रत्येक जण चतुर्विध ध्यानातलं त्याच्या आवडीनुसारचं ध्यान स्वीकारतो आणि अखेरीस एकाशीच एकरूप होतो..
योगेंद्र : चतुर्विध ध्यान? म्हणजे?
बुवा : भक्तिशास्त्रावर अनेक ग्रंथ आहेत.. त्यातला ‘भक्तिरसामृतसिंधु’ हा एक. त्यात ‘ध्यानं रूपगुणक्रीडा सेवा दे: सुष्टुचिंतनाम्।’ असे ध्यानाचे चतुर्विध प्रकार वर्णिले आहेत.. रूपध्यान, गुणध्यान, क्रीडाध्यान आणि सेवाध्यान!
हृदयेंद्र : मग या अभंगात ते आहेत?
बुवा : (हसून) मी आधीच म्हटलं ना? हा माझा छंद आहे! पाहा.. रूपध्यान म्हणजे भगवंताच्या रूपाचं ध्यान. हे सगुण रूपाचं आणि निर्गुण रूपाचं ध्यान, ‘सगुणाची शेज निर्गुणाची बाज। सावळी विराजे कृष्णमूर्ति।।’ या पहिल्या चरणात आहे.. आता रूपापेक्षा गुण अधिक सूक्ष्म.. ‘मन गेले ध्यानी कुष्णचि नयनी। नित्यता पर्वणी कृष्णसुख।।’ यात कृष्णाच्या अनंत गुणांच्या ध्यानात मन रंगलंय, असाच भास होतो.. क्रीडा म्हणडे लीला.. ‘हृदयपरिवारी कृष्ण मनोमंदिरी। आमच्या माजघरी कृष्णबिंबे।।’ यात जे बिंबणं आहे, बिंबण्याची जी कृती आहे ती अनंत लीलांतून साधणारी आहे.. आणि सेवाध्यान हे दास्यभावातून होणारं आहे.. सद्शिष्याच्या मनात अखंड श्रीसद्गुरूंच्या चरणसेवेचाच भाव असतो! श्रीसद्गुरूंच्या सांगण्यानुसार वाटचाल करणं, त्यांच्या मार्गानं जाणं, ही त्यांची खरी चरणसेवा आहे.. अशा चरणसेवेनंच अखंड ऐक्यतेची, सर्व कुंठितपणाचा, संकुचितपणाचा, द्वैताचा जिथं निरास होतो, लोप होतो अशा वैकुंठाची प्राप्ती होते.. म्हणूनच ‘निवृत्ति निघोट ज्ञानदेवा वाट। नित्यता वैकुंठ कृष्ण सुखे।।’ हा चरण मला सेवाध्यानानं रंगलेला वाटतो..
अचल दादा : वा बुवा! वा !!
हृदयेंद्र : श्रीसद्गुरूकृपेशिवाय काहीच साध्य नाही, हा माउलींचा भाव मनाला भिडणारा आहे.. सद्गुरूमयतेचा मार्ग सांगणाऱ्या ‘हरिपाठा’च्या अभंगांमध्येही हाच भाव अनेकवार प्रकटला आहे.. मग ते ‘ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण। दिधले संपूर्ण माझे हाती।।’ असो की ‘ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाधले। निवृत्तिने दिले माझ्या हाती।।’ या शब्दांत असो.. श्रीसद्गुरूंनी आत्मज्ञान माझ्या हाती दिले, असंच ते सांगतात..
बुवा : एकनाथ महाराजही सद्गुरूमाहात्म्य विलक्षण शब्दांत सांगतात बरं का! ‘भागवता’त ते काय म्हणतात? ‘चैतन्य नित्य निराधार। निर्धर्मक निर्विकार।’ काय शब्द आहेत पाहा! चैतन्य कसं आहे? ते नित्य आहे, सर्व धर्मापलीकडचं आहे, निर्विकार आहे, पण निराधारसुद्धा आहे!! पुढे काय म्हणतात? ‘त्याचा केला जीर्णोद्धार। सत्य साचार सद्गुरू।।’ त्या निराधार चैतन्याचा सत्य साचार अशा सद्गुरूंनी या जगात जीर्णोद्धार केला! चैतन्याचा हा मार्ग लोपला होता तो पुन्हा वहिवाटीत आणला.. ‘निवृत्ति निघोड ज्ञानदेवा वाट!’
अचलदादा : अगदी खरं आहे. जोवर चैतन्य आहे तोवर या देहाला किंमत आहे. चैतन्य ओसरताच देहाला काय किंमत? तो भस्मसात केला जाणार.. इतका जो देह नश्वर आहे त्याच्या ‘सुखा’साठी जन्मभर किती धडपडतो आपण! तो देह ज्या चैतन्य शक्तीवर वावरतो त्या शक्तीचं भान किती गमावतो आपण! अनेक रूपात प्रकट होत श्रीसद्गुरू देहासक्तीत रमलेल्या जीवांना जागं करू पाहतात.. त्यांच्यातील जीर्ण झालेल्या आत्मजाणिवेचा जीर्णोद्धार करतात.. नश्वराच्या आसक्तीतून सोडवत ईश्वराकडे वळवतात..
बुवा : माउलींच्या आरतीत म्हटलंय ना? ‘लोपले ज्ञान जगीं। हित नेणती कोणी।।’ जगातलं आत्मज्ञान लोपलं आणि खरं आत्महित कशात आहे, याची जाणही उरली नाही तेव्हा ‘प्रगट गुह्य़ बोले। विश्व ब्रह्मचि केले।।’ जे गुह्य़ झालेलं, लोपलेलं-लपलेलं शुद्ध आत्मज्ञान होतं ते प्रगट करून या विश्वाला ब्रह्मभावात सद्गुरूंनीच स्थिर केलं!
अचल दादा : म्हणजेच ब्रह्मभावात स्थिर व्हायचं असेल तर सद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही!

– चैतन्य प्रेम