जगातील प्रत्येक वस्तू कुणी तरी अभिकल्पित केलेली असते. नावीन्य, सौंदर्य, अभिव्यक्ती, कार्य, पदार्थ, प्रक्रिया, आशय, वर्तन या अशाच अनेक पैलूंचा वस्तूच्या रूपाशी सुसंवाद साधण्याची कसरत केलेली असते. अर्थात अभिकल्प म्हणजे तेवढेच नाही..

Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
genelia deshmukh shares her opinion on parenting
रितेशची बाबा म्हणून जबाबदारी, मातृत्व अन् मुलांचे संस्कार; जिनिलीयाने केलं पालकत्वावर भाष्य, देशमुखांची सून म्हणाली…
Grandparents got married again In 60th Wedding Anniversary
‘एक नात आयुष्यभराच…’ गजऱ्याच्या मुंडावळ्या बांधून आजी-आजोबा उभे राहिले लग्नाला; VIRAL VIDEO एकदा बघाच
Navi Mumbai, Appeal to builders Navi Mumbai,
नवी मुंबई : मतदान वाढीसाठी बिल्डरांनाही आवाहन
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
Aai Baba Retired hot ahet Marathi Serial entertainment news
आईला निरोप आणि आईबाबांचे स्वागत…

३१ डिसेंबर १९९१, म्हणजे बरोबर पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. गोष्ट तशी साधीच, पण आठवणीत राहिलेली. तोपर्यंत दर वर्षी न चुकता मी नववर्षसंध्या उत्साहाने साजरी करत असे. लहानपणी बिल्डिंगमधील सर्व कुटुंबे एकत्र येऊन भेंडय़ांचा किंवा बदाम सातचा खेळ रंगवत असू. काही वर्षांनी घरी टीव्ही आला. मग दूरदर्शनवरील वर्षांखेरचा कार्यक्रम आवर्जून बघत असू. पुढे महाविद्यालयात, मित्रांबरोबर पार्टी करत असे. तेव्हादेखील ३१ डिसेंबरसाठी रेस्टॉरण्टमध्ये टेबल आधीपासूनच राखून ठेवावे लागत असे आणि रात्री बारा वाजले की ‘हॅपी न्यू इयर’ असे ओरडण्याची परंपरा होती.

त्या वर्षी मात्र मनात असा विचार आला, की ३१ डिसेंबरला आपण पार्टी का करतो? साजरे करतो ते नक्की काय? कुणा मित्राला मिळालेली नोकरी किंवा शिष्यवृत्तीबद्दलची पार्टी मला साजेशी वाटत होती. त्यात एक ठोस कामगिरी होती. फ्रेशर्स वेलकम पार्टी, स्पर्धेत कुणी बक्षीस पटकावले तर त्याची पार्टी, किंवा वार्षिक परीक्षेनंतरची ‘कभी खुशी कभी गम्म’ची पार्टी, या सर्व पाटर्य़ा मला मान्य होत्या. मात्र ३१ डिसेंबरला केवळ आपण कॅलेंडर बदलतो म्हणून (किंवा सगळे लोक करतात म्हणून) पार्टी करावी हे ‘माहात्म्य’ काही माझ्या पचनी पडेना. मग मनात विचार आला- हा प्रश्न आपल्याला अचानक याच वर्षी का पडला? आणि एकदम प्रकाश पडला. तेव्हा मी पदव्युत्तर अभिकल्प शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षांत होतो. दीड वर्ष अभिकल्पाचे प्रशिक्षण घेऊन झाले होते. अभिकल्पाचे अनेक प्रकल्प, प्रयोग करत होतो. रोज नवा अभिकल्प घडवत होतो आणि त्याचबरोबर तो अभिकल्प मलाही घडवत होता.

हल्ली कॉर्पोरेट क्षेत्रात ‘अभिकल्पकांची विचारसरणी’चा (डिझाइन थिंकिंगचा) गुणगुणाट सुरू आहे. ही विचारसरणी आम्ही वापरतो हे दाखवण्यात कंपन्यांमध्ये सध्या चुरस आहे. या गाजावाजापलीकडे जाऊन अभिकल्पकांच्या या विचारसरणीत नक्की कोणते गुणविशेष समाविष्ट आहेत, नवीन अभिकल्पक घडवताना त्यांच्यात कोणते गुण विकसित केले पाहिजेत, ते आजच्या लेखात पाहू या.

पहिला महत्त्वाचा गुण म्हणजे अभिकल्पकांची विचारसरणी आपल्याला व्यापक विचार करायला शिकवते. प्रत्येक बाबतीत सर्वागीण विचार करायची, प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायची, गृहीत धरलेल्या, प्रस्थापित असलेल्या विचारांना आव्हान द्यायची सवय लावते. शास्त्रज्ञांच्या आणि अभिकल्पकांच्या विचारसरणीमध्ये हा एक महत्त्वाचा फरक आहे. शास्त्रज्ञ जसजसे आपल्या क्षेत्रात खोलवर जातात तसतसे ते त्या विषयात तज्ज्ञ होत जातात. ‘विशिष्ट विषयांबद्दल अधिकाधिक माहिती’ मिळवत जातात, मात्र बऱ्याचदा, त्यांचा बाहेरच्या जगाशी संबंध कमी होत जातो. याउलट अभिकल्पक आपले विचार अधिक व्यापक, अधिक समग्र बनवण्यावर भर देतात. आपल्या कारकीर्दीत अभिकल्पकाला वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात काम करावे लागते. कधी त्याला आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी वापरायचे एखादे यंत्र अभिकल्पित करावे लागते. कधी साक्षरमात्र वापरकर्त्यांसाठी मोबाइलवर एक डिजिटल पेमेंट अनुप्रयोग बनवावा लागतो. कधी लहान मुलांसाठी पुस्तके किंवा शैक्षणिक खेळ बनवावे लागतात. त्यामुळे अभिकल्पकांची विचारसरणी रुंद असावी लागते.

दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे या रुंदीतदेखील अभिकल्पकाला आपली संवेदनशीलता जपावी लागते, जोपासावी लागते. लहानपणी अनेक लोक संवेदनशील असतात. सिनेमात एखादे भीतीदायक दृश्य बघून ते घाबरून जातात. छोटय़ामोठय़ा गोष्टींचा त्यांच्या मनावर चटकन परिणाम होतो. कालांतराने बऱ्याच जणांची संवेदनशीलता बोथट होते. तसे केल्याशिवाय त्यांना समाजात तग धरून राहणे कठीण जाते. अशा समाजात वाढलेले विद्यार्थी जेव्हा महाविद्यालयात अभिकल्पकाचे शिक्षण घ्यायला येतात, तेव्हा त्यांची संवेदनशीलता पुन्हा जागृत करावी लागते. त्याशिवाय त्यांना नव्या क्षेत्रात, नवख्या संदर्भात ‘महत्त्वाचे काय आहे’ हे शोधता, ओळखता येत नाही. तोडगे शोधण्याआधी अभिकल्पकाने परिस्थितीचा सर्वागीण अभ्यास केला, तरच त्याला तिची व्याप्ती, तिथली गुंतागुंत कळू लागते.

मात्र संवेदनशील बनणे याचा अर्थ हळवे होणे असा नाही. एखादी समस्या, एखादी अडचण ओळखणे महत्त्वाचे. मात्र ती पाहून भारावून जाता कामा नये. समस्येला भावनिक प्रतिसाद देण्याऐवजी समस्या सोडवण्यासाठी कल्पना शोधणे गरजेचे असते. त्यावरून आपल्याला अभिकल्पकाचा तिसरा गुण दिसतो-तोल सांभाळणे. अभिकल्पकाला अनेक तोल सांभाळावे लागतात. अनेक सुवर्णमध्य गाठावे लागतात. कधी अभिकल्पकाला प्रस्थापित विचारांना आव्हान देत बंड पुकारावे लागते, तर कधी प्रस्थापित नियमांचे पालन सुधारण्यासाठी झटावे लागते. कधी त्याला आपल्या धोरणांमध्ये लवचीकता दाखवावी लागते, तर कधी त्याला आपल्या दृष्टिकोनावर चिवटपणे टिकून राहावे लागते. कधी त्याला संघर्ष करावा लागतो, तर कधी संनियंत्रण करावे लागते.

अभिकल्पकाच्या कल्पना नावीन्यपूर्ण असाव्या लागतातच, पण नावीन्यपूर्णतेमुळेसुद्धा अनेकदा तोल ढळू शकतात. किंबहुना कल्पना जितकी नावीन्यपूर्ण तितकी तोल ढळण्याची शक्यता जास्त. उदाहरणार्थ वस्तू नावीन्यपूर्ण असली तरी ती तयार करून बाजारात आणणे अशक्य व अवास्तव असले तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. याशिवाय ती वस्तू संस्कृतिसापेक्ष असली पाहिजे, उपयोक्त्यांच्या रोजच्या आयुष्यात उपरी वाटली नाही पाहिजे. अभिकल्पित वस्तूंतून वापरकर्ते आपली अभिव्यक्ती साकार करत असतात. अभिकल्प त्या अभिव्यक्तीशी समरस झाला पाहिजे-रसभंग होता कामा नये.

सर्जनशीलता हा अभिकल्पकाचा चौथा गुण. याविषयी मागील काही लेखांत विस्ताराने लिहिले होते. त्या लेखात सांगितल्याप्रमाणे, सर्जनशील कल्पनाविलासात सुचलेल्या अनेक कल्पनांपैकी एखादीच कल्पना अलौकिक उत्पादनाच्या रूपात प्रत्यक्षात उतरते. त्यामुळे विविध दृष्टिकोनांतून विचार करून अनेक कल्पनांची लांबलचक यादी बनवण्याची सवय अभिकल्पकाला लावून घ्यावी लागते. कुठल्याच समस्येवर फक्त एकच उपाय नसतो, त्या समस्येला अनेक पर्यायी उपाय असू शकतात, असा दृढविश्वास त्याच्या विचारसरणीत रुजायला लागतो.

कुशलता हा अभिकल्पकाचा पाचवा गुण. अभिकल्पकांना अनेक कौशल्ये अंगीकारावी लागतात. काही कौशल्ये सर्व अभिकल्पकांसाठी महत्त्वाची असतात, तर अभिकल्पाच्या निवडलेल्या शाखेप्रमाणे इतर काही कौशल्ये बदलत जातात. सर्व अभिकल्पकांना संश्लेषण (सिंथसिस) करता येणे महत्त्वाचे आहे. गोळा केलेल्या माहितीचा समग्र विचार करून, सुचलेल्या कल्पनांपैकी एकमेकांना पूरक, सर्जनशील कल्पना निवडून एक समग्र तोडगा संश्लेषित करता यावा लागतो. सर्व अभिकल्पकांकडे नवनवी सुंदर रूपे (फॉर्म) बनवण्याचे कौशल्य हवे. शिवाय अभिकल्पाच्या कंगोऱ्यांकडेदेखील लक्ष देता आले पाहिजे. प्रख्यात अभिकल्पक चार्ल्स ईम्सने म्हटले आहे की कंगोरे हे काही कंगोरे नाहीत-तोच तर खरा अभिकल्प आहे. अर्थशास्त्र, विपणन (मार्केटिंग), आणि समाज व तंत्रज्ञान यांतील प्रवाह यांची जाणसुद्धा अभिकल्पकाला हवीच.

अभिकल्पाच्या शाखेप्रमाणे वेगवेगळी कौशल्ये महत्त्वाची ठरतात. उदाहरणार्थ वस्तू अभिकल्पाला (प्रोडक्ट डिझायनरला) संकल्पित अभिकल्पनेचे प्रतिरूप (मॉडेल) बनवता आले तरच ती संकल्पना इतरांपर्यंत पोहोचू शकते. तसेच ती वस्तू ज्या पदार्थापासून बनवण्यात येणार आहे ते पदार्थ (मटेरियल) आणि ती वस्तू तयार करण्याची प्रक्रिया (प्रोसेस) यांची जाण असली पाहिजे. अन्योन्यक्रिया अभिकल्पकाजवळ (इंटरॅक्शन डिझायनर) माहिती तंत्रज्ञानाचे कौशल्ये असावे लागते. तसेच अन्योन्यसक्रिय वस्तूंच्या वापरयोग्यतेबद्दलचा अंदाज अनेकदा चुकू शकतो. तेव्हा वापरयोग्यता चाचण्या पद्धतशीरपणे घेण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असावे लागते.

यादीत शेवटचा जरी असला, तरीही तितक्याच महत्त्वाचा असा सहावा गुण म्हणजे विनयशीलता. अभिकल्पकाचा अनुभव जसजसा वाढत जातो, त्याची परिपक्वता जसजशी वाढत जाते, तसतशी त्याची विनयशीलतादेखील वाढत जाते. जग किती सुंदर आहे, समाज किती विविधतेने नटलेला आहे, उपयोक्ते किती सर्जनशील आहेत याचे राहून राहून आश्चर्य वाटत जाते आणि त्यात आपला हातभार किती कमी आहे याची जाण येऊ  लागते.

जगातील प्रत्येक वस्तू कुणी तरी अभिकल्पित केलेली असते. नावीन्य, सौंदर्य, अभिव्यक्ती, कार्य, पदार्थ, प्रक्रिया, आशय, वर्तन या व अशाच अनेक पैलूंचा वस्तूच्या रूपाशी सुसंवाद साधण्याची कसरत केलेली असते. अर्थात अभिकल्प म्हणजे तेवढेच नाही. त्याशिवाय अजून बरेच काही असते. पण ते आपल्या एव्हाना लक्षात आले असेलच.

(या लेखाबरोबरच अभिकल्पावरील हे पाक्षिक सदर संपवीत आहोत. मराठीमध्ये अभिकल्पाबद्दल वैचारिक देवाणघेवाण व्हावी, मराठीत अभिकल्प या विषयासाठी परिभाषा तयार व्हावी अशा उद्दिष्टाने आम्ही हे सदर (एकूण २७ लेख) लिहिले. सर्वप्रथम, वाचकांनी उत्साहाने अभिप्राय पाठवल्याबद्दल आभार. वाचकांच्या प्रतिसादामुळेच आम्हाला लिहायला प्रोत्साहन मिळाले. बऱ्याचदा पत्रांना उत्तर पाठवता आले नाही त्याबद्दल क्षमस्व. हे सदर लिहिण्यास आम्हाला प्रोत्साहन देण्याबद्दल आणि विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ दिल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभारी आहोत. आमची हस्तलिखिते वाचून अनेक सुधारणा सुचवल्याबद्दल डॉ. माधवी जोशी, डॉ. आसावरी बापट आणि सुशान्त देवळेकर यांचे आभार.)

(समाप्त)

लेखक आयआयटी, मुंबई येथील औद्योगिक अभिकल्प केंद्र’ (आयडीसीइंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर) येथे प्राध्यापक आहेत.

anirudha@iitb.ac.in