अस्तित्वात नसलेल्या वस्तू निर्माण करून किंवा बाजारात असलेल्या वस्तूंचा वापर सोपा करून, त्या सुंदर व किफायतशीर बनवून लोकांच्या आवडी- निवडी जोपासण्याच्या आव्हानाला अभिकल्पक सतत सामोरे जात असतात.
जॉर्ज बर्नार्ड शॉनी म्हटले आहे, ‘‘जगातल्या गोष्टी पाहून लोक विचारतात ‘त्या अशा का आहेत?’ ज्या गोष्टी नाहीत त्यावर मी मनात विचार करतो आणि विचारतो ‘त्या अशा का नाहीत?’’’
मागील लेखात चार कळीच्या प्रश्नांतून अभिकल्प प्रक्रिया कशी करतात याची माहिती आमचे सहप्राध्यापक अनिरुद्ध जोशी यांनी आपणास दिली आहे. ‘‘महत्त्वाचे काय आहे?’’ ते सिद्ध झाल्यावर त्याला ‘‘प्रतिसाद कसा द्यावा?’’ या दुसऱ्या प्रश्नाला अभिकल्पकाने अनेक कल्पना सुचवत जावे, असे म्हटले होते. या लेखात आपण कल्पना कशा बनतात, जास्तीत जास्त कल्पनांची यादी तयार करण्याची आवश्यकता का आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अभिकल्पनेतील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे.
एका साध्या उदाहरणाद्वारे सर्वसामान्य माणसांची विचारशैली समजून घेऊ या. पुढील लेख वाचण्यापूर्वी लेख बाजूला ठेवून एक पाच मिनिटांचा प्रयोग करू या. एक कागद घ्या. त्यावर ‘पेपरक्लिप’च्या वेगवेगळ्या उपयोगांची यादी करा. उपयोग नावीन्यपूर्ण आणि विविध असले पाहिजेत. नवनवे उपयोग सुचायचे बंद झाल्यावर लेख परत वाचायला घ्या.
जेव्हा हा प्रयोग आम्ही वर्गात करतो, तेव्हा सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या मनात साध्या सरधोपट कल्पना येतात : केसांची क्लिप, टाय क्लिप, शर्टाच्या दोन बाजू जोडण्याकरिता (बटणासारखी उपयोगी) इत्यादी. पुढे एकमेकांत अडकलेल्या क्लिपा पाहून, वेगवेगळे दागिने बनवण्याच्या कल्पना येतात. या सर्व कल्पना पेपरक्लिपच्या ‘पकडण्याच्या’ कृतीवर अवलंबून असतात. आपण पाहू शकतो की त्यांत पेपरक्लिपचा पेपरक्लिपपणा कमी झालेला नाहीये.
मग आम्ही त्यांना आणखी विविध कल्पना सुचवायला सांगतो. मग क्लिप उघडल्यावर होणाऱ्या ‘एस’ हुकाच्या आकारावरून मासेमारीचा हुक, फोटो टांगण्याचा हुक, रुमाल/ शर्ट टांगण्यासाठी हुक यांसारख्या कल्पना येतात. तर कोणी तरी याचा कान साफ करण्यासाठीचा विचार करतो.
अजून विचार करून आपण हा ‘एस’ हुक उघडून सरळ तार केल्यावर कुलूप उघडण्यासाठी, दात साफ करण्यासाठी, नळाची छिद्रे साफ करण्यासाठी असे पण विचार येतात. अजून डोके खाजवल्यावर लक्षात येते की, क्लिपमधील धातूची तार उष्णतावाहक, विद्युतवाहकही आहे आणि अलौकिक बुद्धिमत्ता असणारा त्याचा योग्य आणि चपखल उपयोग करून जातो. अजून बुद्धी वापरून कोणी तरी या पेपरक्लिपचे प्लास्टिकचे वेष्टन अलगद काढून त्याचा सूक्ष्म नळीसारखा (कॅपिलरी) उपयोग करतो.
सुज्ञ वाचकांच्या लक्षात आले असेल हे विचारमंथन (ब्रेनस्टॉìमग) आणि आपल्या पौराणिक गोष्टींतील समुद्रमंथनात काही साम्य आहे. समुद्रातून लक्ष्मी वर येण्याकरिता देव-दानवांना खूपच मंथन करावे लागले होते. तसेच नावीन्यपूर्ण, विविध कल्पनांकरिता अभिकल्पकाला खूप विचारमंथनाची गरज असते. अभिकल्पकाला विचारमंथन करण्यात तरबेज करणे हेच तर अभिकल्प विद्यालयांचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते.
वरील उदाहरणात आपण पाहिले की, एकदा का ‘एस’ हुकची कल्पना आली की हुकसारख्याच इतर अनेक कल्पना येऊ शकतात. सुरुवातीला मनात येणाऱ्या कल्पना या साध्या, सोप्या, धोपट, नावीन्यता नसलेल्या, सरळ पटकन वापरात आणता येण्यासारख्या असतात. सर्जनशीलतेचे गुरू एडवर्ड डी बोनो यांनी या विचारपद्धतीला ‘व्हर्टकिल थिंकिंग’ (उभा विचार) म्हटले आहे. याउलट क्लिपवरून तार, तारेवरून उष्णतावाहक, विद्युतवाहक वगरे कल्पना सुचण्याकरिता जी एक मानसिक उडी मारावी लागते त्याला ‘लॅटरल थिंकिंग’ (आडवा विचार) हे नाव दिले आहे. या विचारपद्धतीला चौकटीच्या बाहेरचे विचार (आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग) असेही म्हणतात. नुकताच सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय हेदेखील या विचारपद्धतीचेच उदाहरण आहे. अशा अपारंपरिक, वेगळ्या दृष्टिकोनातल्या कल्पना अभिकल्पकाच्या विचार करण्याच्या पद्धतीत चपखल बसतात.
मात्र प्रत्येक चौकटीबाहेरची कल्पना चांगली असतेच असे नाही. खूप विचारांती सुचलेल्या शेकडो कल्पनांपकी एखादीच कल्पना अलौकिक (आयकॉनिक) उत्पादनाच्या रूपात, प्रत्यक्षात उतरते. मग एवढय़ा कल्पना कशासाठी?
या टप्प्यात अभिकल्पक सर्जनशीलतेकरिता वेगवेगळ्या पद्धतीने कल्पनाविलास करतात. ‘किती प्रकारे मी हे साध्य करू शकतो?’ असा प्रश्न परत परत विचारीत विचारमंथन करतात. अनेक दृष्टिकोनांनी विचार करून लांबलचक बनवलेली कल्पनांची यादीच नावीन्यपूर्ण आविष्काराकरिता महत्त्वाची ठरते. त्यात काही वेडय़ा, हास्यास्पद, अशक्यप्राय वाटणाऱ्या कल्पनादेखील असू शकतात. एखाद्या समस्येवर १५-२० कल्पना शोधल्यामुळेच त्यांतून एक उत्तम, चपखल तोडगा निवडणे शक्य होते.
काही वेळा प्रथमदर्शी हास्यास्पद किंवा बालिश वाटणाऱ्या कल्पनाही अचाट आविष्कारास कारणीभूत ठरतात. एडवर्ड लॅण्ड या केमिकल अभियंत्याला त्याच्या लहान मुलीने विचारले की, ‘छायाचित्रे पाहण्यासाठी इतकी प्रतीक्षा का करावी लागते?’ या तिच्या प्रश्नामुळेच त्याने ‘झटपट फोटोग्राफी’ तंत्र विकसित करून १९४८ मध्ये ‘पोलोरॉइड कॅमेरा’ बाजारात आणला. सोनी कॉर्पोरेशनच्या अकिओ मोरितांच्या वेडय़ा अफाट कल्पनेतून १९७८ मध्ये ‘वॉकमन’ जन्मास आला. २००७ मध्ये अशाच एका भन्नाट कल्पनेतून बनलेल्या बिनबटणाच्या फोनने (अॅपलच्या ‘आयफोनने’) जगाला चकित केले.
काही वेळा अभिकल्पक १०-१५ जणांचा गट करून सामूहिक विचारमंथन तंत्रही वापरतात. या गटातील लोकांचा अनुभव वैविध्यपूर्ण व समृद्ध असेल तर येणाऱ्या कल्पना अगदी निरनिराळ्या असतात. या मंथन प्रकारात सगळ्यात महत्त्वाचे असते ते म्हणजे अनेक कल्पना तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवणे, कल्पनाविस्तार करत राहणे, प्रत्येकाने स्वतंत्र विचारचक्र चालू ठेवणे, कल्पनांचे मूल्यमापन न करणे आणि कोणत्याही कल्पनेवर कोणाचाही मालकी हक्क नसणे. या सामूहिक मंथन प्रकारात तोच साधा-सरळ प्रश्न परत परत विचारला जातो- ‘किती प्रकारे, मी हे साध्य करू शकतो?’ आणि शेवटी काही वेडय़ा/ हास्यास्पद कल्पनांनी हे सामूहिक मंथन संपवले जाते.
स्केचपेन अभिकल्पित करताना, एका सामूहिक मंथनातून आम्ही आयडीसी अभिकल्प विद्यालयामध्ये अशाच काही वेडय़ा कल्पनांद्वारे काही नावीन्यपूर्ण स्केचपेन आविष्कारित केली होती.
विचारमंथनाच्या अजून अनेक पद्धती अभिकल्पक वापरतात. त्यातील एक म्हणजे मनातल्या मनात वस्तूचे परिवर्तन करून कल्पनाशक्ती प्रेरित करणे. एखादी वस्तू अजून कुठल्या प्रकारे वापरता येईल? तिची सुधारित आवृत्ती कशी करता येईल? ती लहान किंवा मोठी कशी करता येईल? तिचे कोणते वेगवेगळे पर्याय शोधता येतील? असे अनेक प्रश्न विचारत नावीन्यपूर्ण कल्पना करीत नवीन आविष्कार करता येतात.
अजून काही पद्धती म्हणजे एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या गोष्टींचा संबंध जोडून केलेले मंथन (कनेक्टग द अनकनेक्टेड), सहा विचारांच्या हॅट्स वापरून केलेले मंथन, रूपकांच्या साहाय्याने केलेले मंथन, निसर्ग-प्रेरणेतून केलेले मंथन, अशा अनेक प्रकारांनी अभिकल्पक कल्पनाविस्तार करू शकतो. यात यश मिळण्यासाठी सुरुवातीच्या फसव्या सरळ साध्या कल्पनांना न भुलता, सुंदर, नावीन्यपूर्ण कल्पनांकरिता प्रयत्नपूर्वक राहावे लागते.
या कल्पनाविलासाच्या शेवटी नावीन्यपूर्ण, एकमेकांना पूरक, सर्जनशील आणि तांत्रिकदृष्टय़ा व्यवहार्य अशा काही कल्पना निवडल्या जातात. ‘प्रतिसाद कसा द्यावा?’ हे ठरल्यावर त्यानंतर होते ते कल्पना मूर्त स्वरूपात आणण्याचे कार्य. त्याकरिता अभिकल्पक वेगवेगळ्या रेखाकृती काढतो. या वेळी तो वस्तूचा रंग, रूप, बारकावे, साहित्य, पदार्थ यांचे विविध पर्याय तयार करतो. त्या कल्पना उपयोक्त्यांच्या समस्या सोडवणाऱ्या आहेत की अजून काही दुरुस्त्या पाहिजे आहेत, यावर संशोधन करीत अभिकल्प पूर्ण करतो. वेगवेगळी परिमाणे पक्की करीत आणि ज्यापासून ती वस्तू तयार करतात ते साहित्य आणि बनवण्याची प्रक्रिया नक्की करतो. त्यानंतर ती वस्तू बाजारात येते.
अस्तित्वात नसलेल्या वस्तू निर्माण करून किंवा बाजारात असलेल्या वस्तूंचा वापर अजून सोपा करून, त्या सुंदर व किफायतशीर बनवून लोकांच्या आवडीनिवडी जोपासण्याच्या आव्हानाला अभिकल्पक सतत सामोरे जात असतात.
तीनही लेखक हे आयआयटी मुंबई येथील ‘औद्योगिक अभिकल्प केंद्र’ (आयडीसी- इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर) येथे प्राध्यापक आहेत.
विजय बापट, उदय आठवणकर आणि अनिरुद्ध जोशी
bapat.vijay@gmail.com