भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.
संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.
पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)
१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.
१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.