आम आदमी पार्टी Photos
आम आदमी पक्ष (AAP) हा एक राजकीय पक्ष असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्यांनी २०११ साली झालेल्या सत्तारूढ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रणित केंद्र सरकारविरोधातील भ्रष्टाचारविरोधी मोहिमेनंतर २६ नोव्हेंबर २०१२ रोजी या पक्षाची स्थापना केली होती. देशात पंजाब राज्य आणि दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात आप पक्षाची सरकार आहे.
दिल्लीची धुरा सध्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल वाहत आहेत, तर पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंतसिंग मान या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत.
झाडू हे आम आदमी पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. आप पक्षाने २०१३ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाग घेतला होता. यात आप पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आला होता. पक्षाने काँग्रेसच्या समर्थनाने दिल्लीमध्ये सरकार स्थापन केली होती. केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. मात्र हे सरकार ४९ दिवसच सत्तेवर राहिले. काँग्रेसचे समर्थन न मिळाल्याने केजरीवाल यांना विधानसभेमध्ये जन लोकपाल विधेयक मंजूर करता आले नाही. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सत्ता सोडली.
२०१५ च्या निवडणुकीत केजरीवाल यांना स्पष्ट बहुमत मिळाले. दिल्ली विधानसभेतील ७० पैकी ६७ जागांवर त्यांना विजय मिळाला आणि केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. विजयाची ही घोडदौड पुढेही सुरू राहिली. २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६२ जागा जिंकत आप पक्ष पुन्हा सत्तेवर आला.
दिल्लीच्या बाहेरही आप पक्षाला आपले अस्तित्व निर्माण करता आले. २०१७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत पक्षाने २० जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने ११७ पैकी ९२ जागांवर विजय मिळवत राज्यात सत्ता स्थापन केली. सध्या आप पक्ष हा इंडिया आघाडीचा भाग आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आप पक्षाने दिल्लीत काँग्रेसबरोबर निवडणूक लढविली होती. ७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आपने ४ जागांवर तर काँग्रेसने ३ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र या चार जागांवर आप पक्षाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही.
Read More